Max Maharashtra Impact : बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीला शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश
मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट....बोगस बियाण्यांनी त्रस्त शेतकऱ्यांना मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीमुळे दिलासा मिळाला आहे
X
कॉटन बेल्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यात अनेक कंपन्यांची बियाणं बाजारात आली आहेत. मात्र काही कंपन्यांच्या खराब बियाणांच्या तक्रारीही यायला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिंदाड या गावाच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले. मात्र या बियाणांची उगवण क्षमता पाहिजे त्या प्रमाणात झालीच नाही. यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील अशोक गिरीधर चौधरी तसेच आसपासच्या शेतकऱ्यांनी प्रभात सीडस कंपनीचे वाण PCH-15 B2 सुपर कॉटन लावले. मात्र त्याची उगवण 50 टक्केच झाली, तर 50 टक्के खराब झाली विशेष म्हणजे या बियाण्यांचे पाकीट उघडले तेव्हा बियांणांना कीड लागलेली होती. तसेच पाकिटातील अनेक सिड्स खराब आढळून आल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणं आहे, बियाणं कंपनीला कळवूनही वेळेवर दखल घेतली नसल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणे आहे.
या गावातील शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने शेतात जाऊन वस्तुस्थिती सगळ्यांसमोर आणली.
कोरोनामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यातही शेतकरी सज्ज असतांना खराब बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे बियाणे खराब निघाले होते. या खराब बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरण्या करण्याची वेळ आली होती. बोगस सोयाबीन बियाणं कंपन्यांना भरपाई देण्याचे आदेश असतांनाही अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.
शिंदाड येथील शेतकरी अशोक चौधरी यांनी प्रभात सीडस कंपनीचे वाण PCH-15 B2 सुपर कॉटन म्हणून गावातीलच श्री आशापुरी कृषी केंद्रातून 18 पाकीटे घेतली होती. त्यापैकी 8 पाकीट प्रभात सुपर कॉटन बियाणांची पाकीट घेतली होती. पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांनी पेरणी केली. विशेष म्हणजे बियाणं पेरल्यानंतर पावसाने जर हुलकावणी दिली, तर बियाणं वाया जाईल म्हणून ठिबकद्वारे कापसाला पाणी देण्यात आलं. मात्र तरीही या बियाणांची उगवण क्षमता 50 टक्क्यांपेक्षाही कमी आलेली आढळून आली. यासंदर्भात कंपनीच्या ट्रोल फ्री नंबरवर वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही, असे अशोक चौधरी यांनी सांगितले आहे. बियाणं वाया गेले मात्र हंगाम वाया जाऊ नये म्हणून उगवण क्षमता कमी असलेल्या बियाणांच्या जागेवर नाईलाजाने दुसरे बियाणं लागण्याची वेळ त्यांच्यावर आली. पुन्हा खर्च करून बियाणं पेरले असे अशोक चौधरी यांनी सांगितलं.
दरम्यान प्रभातचे सुपर कॉटन बियाण्याचे काही पाकीट उघडले तर त्यातील किडलेले बियाणं निघाले. पेरणीसाठी मजूर लावलेले असतात म्हणून आहे तसे बियाणं मजुरांनी पेरून टाकलं आले, असंही शेतकरी यांनी सांगितले.
चौधरी यांच्या बाजूलाच असलेल्या दोन शेतकऱ्यांनीही असाच अनुभव आल्याचे सांगितले. आमच्या शेतातही हेच बियाणं पेरलं मात्र 50 टक्केच उगवण क्षमता आल्याने आमचं मोठं नुकसान झालं. नाईलाजाने आपले हंगाम वाया जाईल यामुळे ज्या ठिकाणी उगवण क्षमता कमी त्या ठिकाणी दुसऱ्या कापूस बियाणांची लागवड करावी लागली. नुकसान झालेल्या बियाण्यांची भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली.
मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्ताची कृषी विभागाने घेतली दखल
शेतकऱ्यांनी खराब बियायांची तक्रार असेल तर तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केला आहे. शिंदाड परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारची गंभीर दखल घेऊन पंचनामा करण्यात येईल खराब बियाणे खराब असतील तर बियाणे कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असं कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.
50 ते 55 टक्के उगवण क्षमता कमी - बियाणं कृषी केंद्र
शिंदाड गावातील श्री अशापुरी कृषी केंद्राचे चालक अनिल कोठावदे यांनी सांगितले की गावातील प्रभात सीडस कंपनीचे वाण PCH-15 B2 सुपर कॉटन हे बियाणं काही शेतकऱ्यांनी नेले आहे. यातील काही शेतकऱ्यांनी उगवण क्षमता कमी आल्याच्या तक्रारी केल्या. तशीच तक्रार अशोक चौधरी यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली, तेव्हा उगवण क्षमता 50 टक्के आली होती. तशी माहिती आपण कृषी विभागाला दिल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. कंपनीनेने त्यांचा स्थानिक प्रतिनिधीही पाठवला होता. त्याला सर्व प्रकार आपण सांगितला आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याला बियाणे पाकीटानुसार भरपाई देऊ असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले पण शेतकऱ्यांनी भरपाई घेतली नाही असं असंही कोठावदे यांनी सांगितलं.
कंपनीचे म्हणणे काय?
"शिंदाड येथील शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे आली तसे आपण त्या भागातील बियाणे विक्रेता कृषी केंद्रचालक तसेच कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीला शेतकऱ्यांकडे पाठवले. त्या भागातील जास्त शेतकऱ्यांच्या तक्रारी नाही मोजक्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यातही तक्रारदार शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्याला बियाण्यांच्या पाकिटांची भरपाई म्हणून पैसे देण्याबाबत आमच्या प्रतिनिधीने सांगितले. मात्र शेतकऱ्याने पैसे घेण्यास नकार दिला. मात्र आमचं बियाणं खराब नसून त्या भागात पाऊस कमी झाल्याने उगवण क्षमता कमी आली असेल, असे बियाणे कंपनीच्या जळगाव येथील मॅनेजर प्रवीण पाटील यांनी सांगितले. बियाणं खराब आहे की नाही याबाबत चौकशीनंतर सत्य समोर येईल. त्यानंतरच अधिक काही बोलता येईल असं बियाणे कंपनीचे जळगाव येथील मॅनेजर प्रवीण पाटील यांनी म्हटलं आहे.
कोणत्याच सरकारचा धाक आता बियाणं कंपन्यांवर राहिलेला नाही, हे गेल्या काही वर्षांपासून दिसून आले आहे. 'शुद्ध बियाणं द्या' ही माफक अपेक्षा शेतकऱ्यांची असते, मात्र तीसुद्धा या कंपन्या पूर्ण करू शकत नाहीत. बियाणं कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. सरकारमधील बडे अधिकारी आणि नेते काही कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचं आता खुलेआम बोललं जातं. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोगस बियाणं कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं तरच ह्या कंपन्यांना चाप बसेल. कृषी विभागाने शेतात जाऊन पंचनामा करावा तसेच कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असे कृषी विभागाने स्पष्ट केलंय.