Home > मॅक्स किसान > स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी : शेतकऱ्यांवर योजनांचा पाऊस, महायुतीचा शेवटचा बजेट...

स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी : शेतकऱ्यांवर योजनांचा पाऊस, महायुतीचा शेवटचा बजेट...

शेतकऱ्यांच्या प्रश्ना कडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला होता. यातून धडा घेत दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुती सरकारने शेतकऱ्यांवर विविध योजनांचा, सवलतींचा पाऊस पाडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी ह्या सरकारच्या अखेरचा अंतरिम बजेट मांडला आहे. राज्यातील शेतकरी किती खूष होतील हे येणारा काळच ठरवेल.

स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी : शेतकऱ्यांवर योजनांचा पाऊस, महायुतीचा शेवटचा बजेट...
X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातंच जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या ‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले... उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे | ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर... ऐसा विटेवर , देव कोठे || ऐसे संतजन , ऐसे हरिचे दास... ऐसा नामघोष , सांगा कोठे | तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें... पंढरी निर्माण, केली देवें... ||’ या अभंगाने केली.

महाराष्ट्राचा इतक्या कोटींचा अंतरीम बजेट :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महसूली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये तर, महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे. वार्षिक योजना कार्यक्रम खर्चासाठी एक लाख 92 हजार कोटी रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 15 हजार 893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेकरीता 15 हजार 360 कोटी रुपये तसेच जिल्हा वार्षिक योजनेसाठी 18 हजार 165 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. महसुली तूट 20 हजार 51 कोटी रुपये, राजकोषीय तूट 1 लाख 10 हजार 355 कोटी रुपये आहे.

'स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी' बजेटचं वैशिष्ट्ये :

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, “स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी” हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याच अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

बी-बियाणांसाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादीबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. “नमो शेतकरी महासन्मान निधी योजने” अंतर्गत आजतागायत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. “एक रुपयात पीक विमा योजने” अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने” अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने” अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. यासाठी चालू अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी विविध योजना :

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत

नोव्हेंबर - डिसेंबर, २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २4 लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटी रुपयांची मदत

नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत

खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ तर १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू

नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान

‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा

‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप

‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6 हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांत राबविण्यात येणार

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजूरी- सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना लाभ

विदर्भ आणि मराठवाडयातील 14 विपत्तीग्रस्त जिल्हयातील केशरी शिधापत्रिकाधारक 11 लाख 85 हजार शेतकरी लाभार्थींना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा

राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात २ लाख 14 हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1 हजार 239 कोटी रुपये अनुदान

‘गाव तेथे गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती

कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी

आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधीची तरतूद केली आहे.

कापूस,सोयाबीन, कांदाला अनुदान :

खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान

कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी

खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांप्रमाणे 1 हजार 350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान होणार आहे.

दुधासाठी प्रति 5 रुपये लिटर अनुदान :

नोंदणीकृत 2 लाख 93 हजार दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरीत ,राहिलेले अनुदानही त्वरित वितरीत करणार असेल्याची घोषणा कारण्यात आली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरीता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’

शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प

मत्स्यबाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अटल बांबू समृद्धी योजना :

10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान

राज्यातील पडीक जमीनीवर मोठया प्रमाणात बांबूची लागवड नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात भरपाई :

नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांवरून 7 लाख 50 हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1 लाख 25 हजारावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये अशी वाढ , शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे

सिंचनासाठी विशेष मोहिम :

108 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुमारे 3 लाख 65 हजार हेक्टर सिंचन क्षमता असणार आहे.

155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा -येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे 4 लाख 28 हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्याची तरतूद केली आहे

मागेल त्या शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप :

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार.

शेतकऱ्यांच्या प्रश्ना कडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला होता. यातून धडा घेत दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुती सरकारने शेतकऱ्यांवर विविध योजनांचा, सवलतींचा पाऊस पाडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी ह्या सरकारच्या अखेरचा अंतरिम बजेट मांडला आहे. राज्यातील शेतकरी किती खूष होतील हे येणारा काळच ठरवेल.

Updated : 28 Jun 2024 7:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top