दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, सरकार ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करणार
X
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाल्यानं ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दुधाची विक्री १७ लाख लिटरने कमी झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून २ महिन्याकरिता ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर दुध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे खर्च करण्यात येईल.
अतिरिक्त दुध भुकटी व लोणी एनसीडीएफआयच्या ई पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यास आणि त्यासाठी सेवा शुल्कापोटी ०.३% खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंद) यांच्यामार्फत राबविली जाईल. शासन आणि सहकारी संथा यांच्याकडून दुध संकलित केले जाईल. अतिरिक्त दुधाचे रूपांतरण करण्यासाठी दुध भुकटी प्रकल्पांना पॅकिंग व जीएसटीसह 25 रुपये प्रती किलो व लोण्याच्या पॅकिंगसाठी १५ रुपये असा दर देण्यात येईल.