सोयाबीन तहसील कार्यालयात ओतून केंद्र सरकारचा राज्यभर निषेध होणार : किसान सभा
X
केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले म्हणाले, सोयाबीनचे दर 11111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेने घेरले गेले आहेत.
27 सप्टेंबर रोजी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने भारत बंद ची हाक दिली आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून जाऊन पॅनिक सेलिंग करू नये. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा असे, आवाहन किसान सभेने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.