Home > मॅक्स किसान > वेध खरीपाचे ;नियोजन गुंतवणुकीचे: माणिकराव खुळे

वेध खरीपाचे ;नियोजन गुंतवणुकीचे: माणिकराव खुळे

ओलाव्याशिवाय पेरणी करु नये तसेत पुढील शेतीचे नियोजन कसे करावे याविषयी हवामान अंदाजाच्या (Whether forecasting)दृष्टीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं आहे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी...

वेध खरीपाचे ;नियोजन गुंतवणुकीचे: माणिकराव खुळे
X

अखिल भारत वर्षातील शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे ( Monsoon2023) लागले असतानाच खरिपाचे (Kharip)तयारी देखील सुरू झाली आहे. अलनिनो आणि सरासरी पाऊस अंदाजावर ओलाव्याशिवाय पेरणी करु नये तसेत पुढील शेतीचे नियोजन कसे करावे याविषयी हवामान अंदाजाच्या (Whether forecasting)दृष्टीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं आहे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी...

एल-निनोचे वर्ष आहे, सरासरी इतका पाऊस देशात तर सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय जुन महिन्यात पाऊस कमी व उष्णता अधिक असुन मान्सूनचे आगमनही उशिरात आहे. असे भाकीत पुढे आले आहे.

त्याप्रमाणेच जून महिन्याच्या च्या सुरवातीलाच लक्षणे दिसू लागलीत. ४ ते ८ जून पर्यन्त संपूर्ण विदर्भ व लातूर नांदेड परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती कदाचित जाणवू शकते, असे वाटू लागले. म्हणजेच जुन महिन्यात कमी पाऊस व अधिक उष्णता असे भाकीतानुसार सुरवातीलाच दिसू लागले.



मान्सून अंदमानातच काही काळ खिळलेला दिसला. त्याच्या मार्गक्रमणाचा वेग जसा अपेक्षित हवा तसा अजून जाणवला नाही. देशातील भू - भागावर भाकीताच्या अचूक तारखेला आगमनाच्या शक्यतेलाही नकळत चकवा बसत आहे. केवळ वातावरण अनुकूल असुन चालत नाही. मान्सूनने झेप घेणेही गरजेचे वाटते. तसेच अरबी समुद्रात बुधवार दि.७ जून ला कमी दाब क्षेत्र निर्मितीची शक्यता व त्यानंतर त्याच्या पुढील विकसनावर मान्सूनचे कदाचित वेगात आगमन किंवा आगमना नंतर प्रगतीला खंड अशा काहीही शक्यता नाकारता येत नाही.

सध्या सुरवातीला काही भागात पूर्व मोसमी हंगामात तयार होणारे स्थानिक पातळीवर उष्णतेतून हवेचे घडणारे उरध्वगमन व नंतर अधिक उंचीवरील सांद्रीभवन प्रक्रियेतुन पाऊस दिसतो आहे. पूर्व-मोसमी पडल्यावर लगेचच हुरळून जाऊ नये. त्या पावसावर जमीनमशागत पर्यन्त ठिक आहे. वातावरण बदलले तर आता असेच पावसाळी वातावरण टिकून राहणार आहे, अश्या भ्रमात शेतकऱ्याची विचार करण्याची मानसिकताही लगेचच बदलते. परंतु कधी लख्ख ऊन पडून केवळ भूर-भूर वारे वाहु लागते, तेही कळत नाही, अन मग मन भ्रम निरसतेकडे घेऊन जाते. खरीप पेरणीचा विचार हा चांगल्या विवेकी विचार कसोटीच्या बैठकीवरच व्हावा. असे वाटते

मान्सूनच्या हंगामी पावसानंतर शेतीसाठी महत्वाचा दुसरा काहीसा उपयोगी पडणारा जलस्रोत म्हणजे उपलब्ध धरणजल साठा होय.

परंतु हा स्रोतही सर्व लाभधारकासाठी एकसमान नसतो. त्यात आठमाही, बारमाही प्रकार तर आहेतच. पण एखाद्या धरणाचे नदी जलआवक क्षेत्र त्याच्या निर्मितीपासूनच किती बळकट वा कमकुवत आहे, हे आतापर्यंतच्या डेट्यावरून ठरलेलेच असते. त्या ताकदीनुसारच त्या धरणात पाणी साठा संवर्धित होत असतो. त्या धरणाची ती एकप्रकारे कुंडलीच समजावी.

शेतकऱ्यांना माहीत असते कि आपण कोणत्या प्रकारच्या धरण लाभक्षेत्रात मोडतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या धरणाची अवगत असलेली कुंडली स्वतः जाणून घेऊन, ह्या वर्षीच्या एल-निनो वर्षात येत्या खरीपात त्यांच्या लाभक्षेत्रात त्यांना किती पाटपाणी आवर्तन मिळू शकतात, कि मिळणारच नाही, ह्याचा येत्या खरीप पिकांचे नियोजन करतांना जरूर विचार करावा, असे वाटते.

त्यातही शेतकऱ्यांची अगोदरच उभी असलेली ऊस व फळबागासारखी बारमाही पिकांची पाऊस होवो अगर ना होवो त्यांची हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याला जपणूक करावयाची असते. येत्या खरीप हंगामात पिकांचे नियोजन करतांना ह्या बारमाही पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची राखवण शाबूत ठेवून नंतरच एल -निनो वर्षात खरीप पिकांच्या नियोजनाचा विचार करावा लागणार आहे.

थोडक्यात ह्या वर्षी खरीपातील पाटपाणी आवर्तनास फटका बसु शकतो. असे वाटते. बघू या काय होते ते?

आता खरीप हंगामानंतरच नंतरच्या येणाऱ्या रब्बी हंगामातील पाट-पाणी सिंचनाचा विचार करता येणार आहे. म्हणजेच कदाचित परिस्थिती पाहून जायकवाडीची न्यूनतम टक्केवारी पूर्ण झाल्यावरच, मिळाले तर एखादेच पाटपाण्याचे आवर्तन रब्बी हंगामात मिळू शकते, असे वाटते. त्यानुसारच मग पुढील रब्बी पीक नियोजनाचा विचार करावा लागणार आहे.

उगीचच भविष्यात घडून येईल अश्या वाढीव व चुकीच्या पाट-पाणी सिंचनाच्या अपेक्षांचे सोयीने आणि मनानेच जमेस धरून जर रब्बी पीक हंगामात अगोदर मोघम गुंतवणूक केली तर कदाचित पश्चातापाची वेळही येऊ शकते. असे वाटते. त्यावेळी मग तुम्ही जर पाण्यासाठी शासनाभोंवती आरडा -ओरड चालु केलीत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, असे वाटते.

शिवाय खरीपातच जर कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता जाणवणार असेल तर रब्बी पिकासाठी जमिनीत पाणओलीची अपेक्षा तरी कुठून करणार? त्यामुळे खरीपाबरोबर रब्बीतही गुंतवणुकीची पावलेही सावध टाकावी लागणार आहे, असे दिसते.

ह्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे काय नियोजन करावे असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनी सध्या दिसतो आहे. महाराष्ट्रात कपाशी, तूर सोयाबीन मका भाजीपाला लाल कांदा भुईमूग व इतरही कडधान्य पिके खरीपात घेतली जातात.

सध्याच्या अवस्थेत मान्सूनचे आगमन व एकंदरीत परिस्थिती पाहता, खरीप पेरण्या उशिरा होवु शकतात कि काय असे वाटू लागले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देऊन उलट कमी वयाची व कमी पाण्याच्या पिकांचे नियोजन करावे कि काय असे आत्ताच वाटू लागलेत.

ह्या वर्षी भाजीपाल्याच्या पिके राबवतांना जरी दमट व कमी पाऊस ह्या वातावरणात कदाचित टोमॅटो कोथिंबीर गाजर वालवड ही पिके जमतीलही परंतु नंतर त्यांचाही हवामानानुसार शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे होणाऱ्या अतिलागवडीमुळे अतिपुरवठा बाजारात होवु शकतो. तो होणार नाही, हेही बघावे लागणार आहे.

होणारा कमी पाऊस शक्यता व पूर्वीचा व सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा ह्याची सांगड बांधतांना ह्या वर्षी तुषारसिंचनाची गरज नक्कीच भासणार आहे. त्याचा अधिक वापर करावा लागेल, असे वाटते.

बरेच शेतकरी नेहमीप्रमाणे दरवर्षी करतात तशी कपाशीची धूळ-पेर लागवड कदाचित करतील. खरं तर बागायती क्षेत्रात ह्यावर्षी असे धाडस शेतकऱ्यांनी केले तर ते शेतकरीही अपेक्षित १००% हंगामी पिकाची अपेक्षा करू शकतील, असे वाटत नाही.



जिरायती कपाशी पिकासाठी मात्र ह्या वर्षी चांगल्या ओलीची खात्री झाल्याशिवाय लागवड करता येणार नाही. नाही तर ती गुंतवणूक धोक्याची ठरु शकते.

मका पिकाचा विचार करतांना असे वाटते कि प्रकाश संश्लेषणास कितीही सूर्यप्रकाश मिळाला किंवा सांद्रीभवनात रूपांतरित न होणारी अशी कमी दवांक तापमानाची कितीही आर्द्रता वातावरणात उपलब्ध असली तरी अश्या जाणवणाऱ्या दमटपणातून मका पिकावर होणारे लष्कर अळीचे अधिक आक्रमण मका पिकाच्या कोंबात पावसाचे पाणी गेल्याशिवाय आटोक्यात येतच नाही. म्हणजेच पिकाचे १००% चांगले भरण पोषण चांगल्या व सततच्या पावसाशिवाय होतच नाही. म्हणून कितीही मूळ पाणी साठा उपलब्ध असला तरी चांगल्या पावसाशिवाय खरीप मका पिकाचा हंगाम ह्यावर्षी जिंकताच येणार नाही. असे वाटते.

सोयाबीन पिकाबाबतीत मात्र पाण्याचा स्रोत उपलब्ध असेल व शिवाय एल-निनो वर्षात भले पाऊसमान कमी असु दे, पण पावसाळी ढगाळ आर्द्रतायुक्त दमट वातावरण टिकून राहिले तर पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत अथवा सपाट काळ्या, तांबसर जमिनीतही पाट वा दंडातून फ्लॅडींगनेही चोपट असे पाणी देऊन पीक जगवता येईल. भलेही १००% हंगामीवर्षासारखे सोयाबीनचे पीक जिंकता येणार नाही तरी पण पीक जगवता येईल. त्यातून अल्पसा का होईना पिकातून फायदा उठवता येवु शकतो, असे वाटते.

हे सर्व जरी खरं असले तरी खरीप हंगाम हा वर्षाचा मुख्य हंगाम असतो. देशात तसेच महाराष्ट्रातही ७०% पेरण्या ह्या खरीप हंगामातच होतात. त्यामुळे काटेकोरपणे आहे त्या परिस्थितीत म्हणजे भले एल निनो वर्षातही शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा व दुर्लक्ष न करता खरीप हंगाम दक्ष राहून राबवणे गरजेचेच असते. त्यातील एक्सक्युजेसला माफी नसते. कारण रब्बी हंगामाची शक्यता एल निनो वर्षात कमी किंवा जेम-तेम असण्याची शक्यता अधिक असते. तसाही ह्यावर्षी एल-निनोच्या विकसनाची शक्यता ही जुन ते सप्टेंबर ह्या ४ महिन्यातील हंगामाच्या उत्तर्धात म्हणजे १५ जुलै नंतरच अधिक असण्याचा सुर आळवला जात आहे. त्यामुळे लक्ष ठेवून खरीप हंगामात संधी मिळते आहे, असे दिसताच फायदा उठवावा, असे वाटते.

हंगाम वाया जाऊ शकतो किंवा तशी परिस्थिती उद्भवली तर शेतकऱ्यांकडून 👇 खाली सांगितल्याप्रमाणे सोयीचाही विचार व्हावा असे वाटते.

म्हणजे जसे शरीराला लंघनातून पचनसंस्थेला विश्रांती हवी असते पण निमित्त असते ते उपवासाचे. कारण तसंही आज उपवास आहे असं कळल्याशिवाय आपण सक्तीने पचनसंस्थेला लंघनातून विश्रांती देत नाही.

त्याचप्रमाणे आपण एल-निनो रुपी उपवासाचे विश्रांतीसाठी लंघनच समजुन शेतजमीनीला, जर कदाचित नापेर होणारच असेल तर लंघन घडवून शेतजमीन विश्रांतीचा ह्यावर्षी आपण विचार का करू नये, असा विचार मनात येऊन जातो.

अन्यथा तशीही तुम्ही जमिनीला विश्रांती स्वतःहोवून देवु शकत नाही. आणि इतर अति पावसाळी वर्षात तुम्ही जरी विश्रांती देण्याचा प्रयत्न केला तरी जोर करणारे खरीप हंगामातील तण तुम्हाला व जमिनीला विश्रांती घेऊ देणारच नाही.

मग एल निनोच्या वर्षात चांगली ओल उपलब्ध नाही व पाऊसमान परिस्थिती पाहून जमिनीला पीकाविना शक्य झाल्यास परिस्थितीचा अंदाज घेऊन विश्रांती देण्याचा प्रयत्न का करू नये. ह्या निमित्ताने शेतजमीन क्षारपड, गाळ व ओलावामुक्त, तणमुक्त व विश्रांतीसाठी एल निनोच्या निमित्ताने निसर्ग संधी देत आहे असाच सकारात्मक विचार शेतकऱ्यांनी करून विश्रांती घडवून आणावी, असे वाटते.

मान्सूनचे आगमन कधी होते व आगमनानंतर त्याचे टिकणारे अस्तित्व व त्यात पाऊस कोसळण्यासाठी किती ताकद असेल ह्या तीन गोष्टीवर प्रथम प्राधान्याने स्वतः लक्ष ठेवून, हवामान विभाग वेळोवेळी देत असलेल्या अपडेट व माहितीवरूनच पीकपेरणी अथवा पीक लागवडीचा विचार शेतकऱ्यांकडून व्हावा,असे वाटते. स्वयंशिस्त सक्तीने पूर्ण ओल मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी ह्या वर्षी पेरणी करावी. असे वाटते.

खरीपात तसेही हंगामी वेळेऐवजी जर उशिरा पेरणी झाली तर पीकातून मिळणारे (यिल्ड)धान्यझड वा धान्यरास ही कमीच मिळते. तेंव्हा एल- निनो वर्षात धूळ अथवा कमी ओलीवरची, दुबार, किंवा उशिरा अश्या सर्व पेरण्या घातक ठरु शकतात. एकदा पाऊस पडता झाला कि आता पडेलच अश्या पारंपारिक गृहीतकावर एल -निनोच्या वर्षात पेरणी निर्णय अविवेकी होवु नये,असे वाटते.

लक्ष ठेवून पूर्ण ओल मिळाल्यावरच पेरणी व्हावी. म्हणून दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार नाही अश्या पूर्ण ओलीवरच शेतकऱ्यांनी तारतम्यानेच पेरणीचा निर्णय घ्यावा, अन्यथा पेरणी करू नये ,असे वाटते. भारतीय हवामान खात्याबरोबरच महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आपल्या पाठीशी आहेतच.

घोडामैदान जवळच आहे. वरील चर्चेचा आशय मनी पक्का रुजवून आणि विवेकाच्या कसोटीवर परिस्थितीचे आकलन करून घेऊन, येणाऱ्या खरीप हंगामाच्या पीक नियोजनात शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक उडी घ्यावी असे वाटते.

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune.


Updated : 5 Jun 2023 1:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top