फळबाग लावली आणि तिसऱ्या वर्षांत मोडून काढली असे नको - दीपक चव्हाण
शेती करत असताना फळबागांमुळे समृद्धी येते, पण ती टिकवण्यासाठी सतत व्यवहार्य संशोधन, निरीक्षण, भेटी-गाठी, दीर्घकालीन दृष्टी, नैसर्गिक कलानुसार नियोजन, फळबाग पीक विविधता आवश्यक असल्याचं मग कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी केसर आंबा उत्पादक शेतकरी संजय सामंत यांच्या शेती मॉडेलवरुन मांडले आहेत...
X
केसर आंबा उत्पादक संजय दौलत सावंत यांच्या निरीक्षणांवर आधारित नोट
1. संजयनाना यांनी 2008 मध्ये आघार (ता. मालेगाव) येथे चार एकरात केसरची रोपे लावली. बारा वर्षांत बाग जतन करण्यात यश आलेय. मागील सात वर्षांपासून टप्प्या-टप्याने उत्पन्नात वाढ मिळत आहे. झाडांतील अंतर -14×12 आहे. तर आजघडीची झाड संख्या 960 आहे. यंदा केसरला लवकर बहार आलाय. फळबाग लावली आणि तिसऱ्या वर्षांत मोडून काढली असे नको पहा..संजयनानांची दूरदृष्टी- दीपक चव्हाण
2. संजयनाना यांचा दृष्टिकोन : केसर संदर्भात दीर्घकालीन विचार आहे. 2008 मध्ये ज्या वेळी , तेल्या रोगामुळे शेतकरी पॅनिक होवून डाळिंब बागा उपटत होते, त्यावेळी नानांनी पर्यायी पीक म्हणून केसरची निवड केली. सुरवातीचे पाच वर्ष आंतरपिके घेतली. पुढे सातव्या वर्षांपासून केसरचे उत्पादन मिळू लागले आहे.
3. कसमादे - म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा - या चार तालुक्यांची भौगोलिक रचना ही दख्खन (नाशिक) आणि खान्देश (जळगाव-धुळे) यापेक्षा वेगळी आहे. या भागात डाळिंब-द्राक्षाबरोबरच केसर आंबासारखे पर्यायी पीक रूजवता येऊ शकते, हे संजयनाना यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. कसमादेत - बारा वर्ष आंब्याची बाग जगणे हेच मुळी अशक्य वाटत असताना, आघारच्या शिवारात एक रेप्लिकेबल केसर आंबा मॉडेलची देण त्यांनी नव्या पिढीला दिली आहे.
4. 90 च्या दशकापर्यंत कसमादे भागात आमराया दिसत होत्या. आज आमरायाच काय, पण जूनी आंब्याची झाडेही दिसेनाशी झाली आहेत. अशा स्थितीत आंबा शेतीचे व्यावसायिक मॉडेल दिसणे हीच मोठी गोष्ट आहे. संजयनाना सांगतात,"येथून पुढे फळबागा जतन करताना, एका पिढीकडून दूसऱ्या पिढीला त्या हस्तांतरित कशा होतील, असे नियोजन करण्याची गरज आहे. आज बाग लावली आणि तिसऱ्या वर्षांत मोडून काढली, अशा पद्धतीनेच चुकीचे नियोजन करू नये."
5. ज्यांच्याकडे कसायला अधिक जमिन आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील काही क्षेत्र हे दीर्घकालीन पिकांमध्ये गुंतवणे अधिक सयुक्तिक ठरते. सर्वच शेती एक दोन पिकांखाली वळती केल्याने काय नुकसान होते, हे कसमादेतील शेतकरी आज अनुभवत आहेत. फळबागांमुळे समृद्धी येते, पण ती टिकवण्यासाठी सतत व्यवहार्य संशोधन, निरीक्षण, भेटी-गाठी, दीर्घकालीन दृष्टी, नैसर्गिक कलानुसार नियोजन, फळबाग पीक विविधता आदी गोष्टींवर संजयनानांनी भर दिला आहे. त्यामुळेच कसमादेत आंबा शेतीचे एक चांगले मॉडेल उभे राहताना दिसत आहे.