खरेदीपूर्वी मूळ जमीन कोणाच्या नावे? ब्रिटिशकालीन जमिनीचा तपशील एका क्लिकवर…
X
जमीन खरेदी करताना नागरिक लाखो रुपये मोजून जमीन खरेदी करतात. त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीबाबतची कागदपत्रे गहाळ झाल्यास न्यायालयीन लढाई लढावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी मूळ जमीन कोणाची, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले, याबाबतची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा आणि खाते उतारे आदी अभिलेख मिळवावे लागतात. सरकारी कार्यालयात ही कागदपत्रे वेळेत मिळतातच, असे नाही. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने संकेतस्थळावर जुने अभिलेख नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूमी अभिलेखांची संगणकीकरण केले आहे. त्यासाठी या जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील मुंबई शहर वगळता उर्वरित ३५ जिल्ह्यांतील सर्व तहसील, भूमी अभिलेख आणि नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे.
आज घडीला २२ जिल्ह्यातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात येऊन ते संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. अपलोड करण्यात आलेल्या जुन्या अभिलेखांमध्ये सातबारा उतारे, जुनी फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा, टिपण, आकारबंद, योजना पत्रक, क.जा.प., आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही हे असांक्षाकित अभिलेख केवळ पाहण्यासाठी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळ(Website) वर उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक सरिता नरके यांनी दिली.