कर्नाल: शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त शेतकरी रस्त्यावर, महामार्ग-रस्ते जाम
X
हरियाणाच्या कर्नालमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी लाठीचार्ज केला. लाठीचार्जमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग तसेच अनेक रस्ते अडवले आहेत. दरम्यान, हरियाणातील इतर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे केंद्र सरकारने केलेले कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 9 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी अडवलेल्या रस्त्यांमुळे दिल्ली-अमृतसर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून कितीतरी किलोमीटर पर्यंत रस्ता जाम झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हरियाणा भाजप अध्यक्ष ओपी धनखड़ यांच्या ताफ्याला विरोध करण्यासाठी शेतकरी येथे जमले होते, धनखड़ यांचा ताफा बस्तारा टोल प्लाझावर पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच धनखड़ ज्या ठिकाणी सभा घेणार होते. त्या ठिकाणी देखील पोहोचण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला असता या दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.
मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, ते शांतपणे बसले होते पण पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यात अनेक शेतकऱ्यांच्या डोक्याला मार लागला आणि शेकडो शेतकरी जखमी झाले.
किसान मोर्चाचे आवाहन
संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले आहे. शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनी यांनी म्हटले आहे की, पोलीसांची ही गुंडगिरी आहे आणि आम्हाला त्याचा ठामपणे विरोध करावा लागेल. आजूबाजूचे सर्व रस्ते आणि टोल जाम करून टाका.
दरम्यान, लाठीचार्ज करण्यापूर्वी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की पोलिसांनी लाठीचार्ज करून शेतकऱ्यांचा दूरदूरपर्यंत पाठलाग केला.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरत, आतापर्यंत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील रस्ते जाम आहेत आणि या सरकारांना या समस्येवर तोडगा काढावा लागेल.
पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलनासंदर्भातही खूप गदारोळ झाला होता आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी संपूर्ण अधिवेशनादरम्यान संसद परिसरात कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने केली होती आणि सरकारला हे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली होती. यादरम्यान, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले होते तर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जंतर -मंतरवर सुरू असलेले शेतकरी संसद गाठून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता.
बातचीत बंद आहे
पंजाबमधील शेतकरी 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले आणि नंतर हरियाणा-राजस्थानमध्येही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. यानंतर शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण काही उपयोग झाला नाही. दरम्यान, 26 जानेवारी रोजी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारापासून सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा थांबलेली आहे.
मुझफ्फरनगरमध्ये पंचायत होणार
संयुक्त किसान मोर्चा आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील निवडणुकांमध्ये हुंकार भरणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे आणि या राज्यांमध्ये 6 महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांचा हा हुंकार 5 सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर येथून सुरू होईल, जिथे या दिवशी राष्ट्रीय महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महापंचायतीनंतर उत्तर प्रदेशातील 17 मंडळांमध्ये आणि उत्तराखंडमध्ये 2 मंडळांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बैठका होतील. तर याला 'मिशन यूपी-उत्तराखंड' असे नाव देण्यात आले आहे. यावेळी मोर्चाचे नेते लोकांमध्ये जातील. असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.