Home > मॅक्स किसान > #Chana हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू : किसान सभा

#Chana हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू : किसान सभा

#Chana  हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू : किसान सभा
X

खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आले आहेत. राज्यात नाफेड द्वारे ५२३० रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात ४२०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. नाफेडकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस. पाठविण्यात आले होते. रीतसर एस.एम.एस. आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करून आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. २३ मे रोजी अचानक खरेदी बंद झाल्यामुळे केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे.

केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरू करावी तथा राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेचे डॉ.अजित नवले दिला आहे.

Updated : 28 May 2022 8:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top