बोगस बियाण्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट
X
यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. या दुबार पेरणीनंतर जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, साखरा आजेगाव या महसूल मंडळातील बहुतांश गावांत शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा सोयाबीनची पेरणी करण्याची वेळ आली आहे.
या भागात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश शेतात दुसऱ्यांदा पेरलेले सोयाबीन उगवलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तिसऱ्यांदा सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे.
आधीच दुबार पेरणीमुळे शेतकरी जेरीस आला आहे. त्यात तिसऱ्यांदा पेरणी म्हणजे मोठं संकट कोसळले आहे. परंतु शेत रिकामं तरी कसा ठेवावं असा सवाल विचारत, सेनगाव तालुक्यातील चोंढी खुर्द येथील गयाबाई काळे यांनी तिफणीवर मूठ धरली आहे. निदान तिसऱ्यांदा पेरलेलं तरी उगवेल ही त्यांची आस कायम आहे.
मुलगा दिलिप व पती विश्वनाथ काळे हे तिघेजण मिळून कष्टाने शेती करतात. यंदाच्या खरिपात एकट्या सोयाबीनच्या पेरणीसाठी त्यांना आतापर्यंत जवळपास साठ हजार रूपये खर्च आल्याचे शेतकरी दिलिप यांनी सांगितले.
सोयाबीनची उगवण का झाली नाही,याची पाहणी व चिकित्सा करण्यासाठी हिंगोली जिल्हा स्तरावर सहा पाहणी पथक तैनात केली आहेत. परंतु अजून प्रशासनातील कोणीच फिरकले नसल्याची तक्रार विश्वनाथ काळे यांनी दिली आहे. कृषी व महसूल विभागातील कर्मचारी तसेच कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या या पाहणी पथके गावागावांतील तक्रारी आलेल्या शिवारात भेटी देत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातून बोगस बियाणांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या अडीच हजारांहून अधिक तक्रारी आजपर्यंत कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अजूनही तक्रारींचा ओघ सुरू असल्याचे हिंगोलीचे जिल्हा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले.