शेतकरी आंदोलनाचा आवाज फेसबुकने दाबला
कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज वर फेसबुकने कारवाई केली आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली आहे. रात्री उशिरा याबाबत सोशल मीडिया वरून फेसबुकवर टीका झाल्यानंतर पुन्हा ते पेज पुन्हा रिस्टोर करण्यात आले.
X
किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद करण्यात आले. किसान मोर्चाने मोदी सरकारचे नाव न घेता जेव्हा लोक आवाज उठवतात तेव्हा हे तेच करू शकतात असा आरोप केला आहे. सोशल मीडियावर आपली बाजू मांडण्यासाठी तसेच ट्रोलर्सना उत्तरे देण्यासाठी शेतकऱ्यांनीच हे पेज बनविले होते. हा शेतकरी आंदोलकांचा आयटी सेल होता. यावर ६० शेतकरी काम सांभाळत होते.
भारतीय जनता पार्टी येनकेनप्रकारे हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला या आंदोलनात खलिस्तानवादी शेतकरी आरोप घुसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलनाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या. आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे फेसबुक पेज बंद करण्यात आलं मोठ्या प्रमाणात यावर सोशल मीडियातून टीका झाल्यानंतर फेसबुकने तीन तासानंतर हे पेज पुन्हा रिस्टोर केले.
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेले शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. त्यातच आज शेतकऱ्यांनी एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली आहे. दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचं निमंत्रण पाठवलं असून बाततीचसाठी आपल्या सोयीनुसार तारीख निश्चित करण्यास सांगितलं आहे.
आज शेतकऱ्यांचं एकदिवसीय उपोषण
आज एक दिवसाचं उपोषण करण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. सोबतच 25 ते 27 डिसेंबरपर्यंत हरियाणामधील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करु देणार नाही असंही शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे. याशिवाय भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी जनतेला आवाहन केलं आहे की 23 डिसेंबरला म्हणजेच शेतकरी दिवसाला एक दिवसाचा उपवास करावा. स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सिंघू बॉर्डरवर मीडियाशी संवाद साधताना म्हटलं की, "सोमवारी (21 डिसेंबर) सर्व आंदोलनस्थळांवर शेतकरी एक दिवसांचं उपोषण करणार आहेत. याची सुरुवात इथल्या आंदोलनस्थळांवर 11 सदस्यांचा एक ग्रुप करेल."