Home > मॅक्स किसान > असा लागला HMT तांदळाचा शोध

असा लागला HMT तांदळाचा शोध

असा लागला HMT तांदळाचा शोध
X

आपण आपल्या दैनंदिन आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाचे नेहमीच सेवन करतो, ज्यामध्ये चाँदतारा, बासमती, आणि इतर प्रकारच्या तांदुळांचा आपल्या नियमित आहारात सातत्याने समावेश असतो. याव्यतिरिक्त भाताच्या काही प्रजातींचा शोध लागला, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका मराठी माणसाने भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढल्या आहेत, ते म्हणजे कृषी संशोधक दादाजी रामाजी खोब्रागडे.

दादाजी खोब्रागडे यांनी भाताच्या कोणत्या प्रजातींचा शोध लावला? याची आपण माहिती घेऊया

आपल्या धानाच्या शेतात दादाजींना एका तांदळाच्या लोंबीचा आकार मोठा आहे हे जाणवलं. त्यांनी त्या लोंबीच निरीक्षण केलं. तेवढ्याच लोंबीला कुंपण लाऊन संरक्षित केलं. त्यातून मिळालेल्या धानाचे परे टाकून पुन्हा लागण केली. पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक धान उत्पादन झाले. असे करत करत त्यांनी एका शेतीत या धानाची लावणी केली. इतर धानापेक्षा याचे उत्पादन तांदळाची लांबी जास्त आहे हे त्यांच्या लक्षात आले. उत्पादित केलेले धान घेऊन ते मार्केटमध्ये गेले. हे धान वेगळे आहे हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. खरेदी केल्यावर त्यांनी दादाजींना या वाणाचे नाव विचारले. दादाजींनी याला कोणतेही नाव दिलेले नव्हते. त्या क्षणी त्यांना व्यापाऱ्याच्या मनगटावर (hmt) एच एम टी घड्याळ दिसलं. त्यांनी व्यापाऱ्याला याचे नाव एच एम टी असल्याचे सांगितलं. आपल्या दररोजच्या आहारात असलेल्या एच एम टी तांदळाच्या वाणाचा शोध अशाप्रकारे दादाजी खोब्रागडे यांनी लावला.

दादाजी खोब्रागडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत तांदळाचे पुढील वाण शोधून काढले.

  • नांदेड हीरा
  • विजय नांदेड
  • दीपक रत्न
  • डीआरके म्हणजेच दादाजी रामजी खोब्रागडे' (सध्या या वाणाला जय श्रीराम या नावानेही ओळखले जाते.)
  • काटे एच.एम.टी.
  • डीआरके सुगंधी
  • नांदेड चेन्नूर
  • नांदेड 92

दादाजी आपल्या तीन एकर शेतीत सातत्याने तांदूळ पिकावर संशोधन करत असायचे. मोठमोठ्या विद्यापीठात सो कॉल्ड एक्स्पर्ट ना जे जमले नाही ते एकट्या दादाजींनी करून दाखवले.

दादाजींनी शोधलेले वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चोरल्याचा आरोप देखील झाला होता.

दादाजींच्या संशोधनामुळे अनेक शेतकरी, व्यापारी श्रीमंत झाले. मात्र, दादाजींचं आयुष्य अधिकाधिक खडतर होत गेलं. त्यांचे नाव फोर्ब्स यादीत आल्यानंतर ते उजेडात आले. महाराष्ट्र सरकारने कृषी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

एकीकडे त्यांच्या नावाची चर्चा देशभरात होत होती आणि दुसरीकडे मुलाच्या आजारपणासाठी त्यांना तीन एकर जमीन विकावी लागली. ज्या शेतात ते संशोधन करायचे ते शेतच विकल्याने संशोधनाचे काम पूर्ण थांबले.

त्यांच्या सुनेच्या वडिलांनी पुन्हा त्यांना शेती दिली. त्या शेतात पुन्हा प्रयोग करायला त्यांनी सुरवात केली.

तांदळाचे संशोधन करणाऱ्या या संशोधकावर आर्थिक परिस्थितीमुळे सुवर्ण पदक विकायची वेळ आली. बाजारात गेल्यावर मिळालेले सुवर्णपदक नकली असल्याचे समजले. सरकारने पुन्हा ते बदलून दिले. त्यांचे शेवटचे आयुष्य अतिशय हलाखीत गेले. अगदी उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत. दादाजी उपचारासाठी तडफडत राहिले. गंभीर आजारी झाल्यावर डॉ अभय बंग यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर शोधग्रामला उपचार सुरू केले. पण फार उशीर झाला होता. दादाजी कायमचे या जगातून निघून गेले. भारत एका मोठ्या संशोधकाला मुकला. त्यांनी या देशासाठी इतकं मोठं काम केलं. पण आपण त्यांना काय दिलं? दारिद्र्य, दुःख. त्यांच्याकडे अगोदरच लक्ष दिले असते तर, ते अजूनही जगले असते. आज तांदूळ पाहिलं की, चष्मा घातलेले दादाजी दिसतात. या माणसाची जिवंतपणी उपेक्षा झाली. ती झाली आणि मेल्यावरही होतेय. दादाजींच्या नावाने कृषी विद्यापीठ काढून सरकारने आता तरी त्यांचा सन्मान करायला हवा. विदर्भातील हा अस्सल हिरा त्यांचे अध्यासन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू व्हायला पाहिजे. दादाजींच्या कुटुंबियांना सरकारने मदत करून त्यांचे जीवन सुसह्य करायला पाहिजे. त्यांच्या संशोधनाचा इतिहास पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करुन सरकारने त्यांचा सन्मान करावा, अशा पध्दतीची त्यांची व्यक्तीप्रतिमा आहे.


Updated : 8 April 2024 6:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top