सिंधू बॉर्डरवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची
X
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत गेली १८ दिवस सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत असून आज सकाळी दिल्ली सिंधू बॉर्डर वर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना दिल्ली टोलनाक्यावर राहण्याची परवानगी दिल्यानंतर तणाव निवळला.. दिल्लीतील या घडमोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी.....
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यावरुन गेली अठरा दिवस शेतकऱ्यांनी सिंधु बॉर्डरवर ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारशी चर्चा आणि वाटाघाटी झाल्यानंतर अजून तोडगा निघालेला नाही. आंदोलनांच्या ठिकाणापासून दिल्लीच्या दिशेने जाणा-या रस्त्यावरून आंदोलकांना काल शनिवार १२ डिसेंबरला पोलिसांनी हटवले होते. मात्र, काल पंजाबमधून २००० ट्रॅक्टर दिल्लीच्या दिशेने आले आहेत. आता या ट्रक्टरला उभं राहण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने शेतक-यांनी हटवलेला जागेवर पुन्हा राहण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. मात्र, पोलिसांनी शेतक-यांना या ठिकाणी राहण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर बॅरिकेट्स लावलेल्या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले.
आता आम्ही दिल्लीला जाणार... अशा घोषणा दिल्या. नंतर वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि शेतक-यांमध्ये बातचीत झाली. या बातचित नंतर शेतक-यांना दिल्ली टोलनाक्याजवळ राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.