पावसाचा मोठा खंड: पीकं जळाली
X
पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शेतकऱ्यांची मागणी
संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 75 टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून लावलेली पिके जगवायची तरी कशी असा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील धुळे शहरासह जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाचे हजेरी लागलेली नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकीकडे गंभीर होत असताना दुसरीकडे खरीप हंगामाची पिके देखील धोक्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आली असून, पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच दूबार पेरणीची वेळ देखील आता निघून गेली असल्याने नव्याने पेरणी करण्याची वेळ आली तर पैसा कुठून आणणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यात कपाशी, बाजरी, हरभरा यांची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र पावसाअभावी ही पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्याने लावलेली पिके जगवण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यास हा पाण्याचा प्रश्न देखील अधिक गंभीर होणार आहे. बाजरीची पिके जळून चालली असून पाण्याची सोय नसल्याने इतर पिकांना देखील त्याचा फटका बसत असल्याचे शेतकरी चेतन भदाने यांनी सांगितले.