वातावरण बदलाचा शेत पिकाला फटका?
कधी नव्हे अशा बेभरवशाच्या निसर्गाने यंदा शेती आणि शेतकऱ्याला प्रचंड फटका दिला उन्हाळा पावसाळा आणि आता हिवाळ्यातही वातावरण बदलाच्या संकटाने शेतकऱ्याची पुरती अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे वाढत्या थंडीचा आणि वातावरण बदलाचा मुकाबला शेतकऱ्यांनी कसा करावा? प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट
X
थंडीचा जोर वाढणार!कमाल व किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने घटणार असून हवामान तज्ञाचे मत अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.
बदलत्या वातावरणामुळे पिकांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजरी लावल्याने द्राक्ष,डाळींब या फळबागांचे नुकसान झाले होते.बदलत्या वातावरणात कधी जास्त उन्ह जाणवत आहे.तर कधी जास्त थंडी याचा परिणाम पिकांवर झाला आहे.हवामानात बदल होत असल्याने अचानक ढगाळ वातावरण ही निर्माण होत आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत असून या वातावरणामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.द्राक्ष बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
तापमानात 2 अंश ते 4 अंश सेल्सिअसने होणार घट
हवामान खात्याच्या विस्तारित स्वरूपाच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात आगामी आठवड्यात किमान व कमाल तापमानामध्ये सुमारे 2 ते 4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढून किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. सुरज मिसाळ यानी व्यक्त केली आहे.
वाढत्या थंडीत शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी
शेतकऱ्यांनी थंडी पासून संरक्षणासाठी फळबागांना आणि पिकांना शक्यतो संध्याकाळी विहीरीच्या पाण्याने ओलीत करावे, कारण कालव्याच्या पाण्याच्या तापमानापेक्षा विहिरीच्या पाण्याचे तापमान काहीसे जास्त असते.त्यामुळे फळबागेमधील जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होईल. थंडीपासून संरक्षणासाठी केळी बागेतील घडास २ ते ६ % सच्छीद्रतेचे पांढऱ्या प्लॅस्टिक बॅगचे आवरण करावे. यामुळे पिकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.थंडी परतल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यंदा डिसेंबर अर्धा उलटल्यानंतर देखील थंडी नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत होती.त्यातच गेल्या काही दिवसांपासून असणाऱ्या ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. मात्र आता थंडी परतल्याने रब्बी पिके जसे की गहू, हरभरा आदि पिकांना याचा फायदा होणार आहे.असे कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथील विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) डॉ. शरद जाधव यांनी केले आहे.
कडाक्याच्या थंडीत पशुधनाची कशी घ्याल काळजी
जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार असल्याने थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे. थंडीमुळे जनावरांना न्युमोनिया हा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान वाढते व त्यांचे खाणे - पिणे कमी होते.यासाठी थंडीपासून जनावरांचे संरक्षण करावे.थंड वातावरणात कोंबड्या जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यासाठी शेडमध्ये ७ दिवसांपर्यंत पक्षी व्यवस्थित ब्रूडिंग करावीत. तापमान वाढवण्यासाठी १०० वॅटचे बल्ब लावावेत आणि शेडला पडदे लावावे. पक्षांना उर्जा व प्रथिनेयुक्त पशु आहाराचा समावेश करून आहार वाढवावा. अश्या प्रकारे जनावरे आणि कोंबड्यांची थंडीपासून काळजी घेण्याचे आव्हान कृषि विज्ञान केंद्र, मोहोळचे प्रमुख तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले आहे.
बदलत्या वातावरणाचा पिकांवर होणार परिणाम
यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना हवामान तज्ञ डॉ. सूरज मिसाळ म्हणाले की,सध्या वातावरण बदलाची स्थिती आहे.मराठवाड्यातील व विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पश्चिम चक्रवातामुळे अवकाळी पाऊसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात थंडी वाढणार असून किमान तापमानात घट होणार आहे.कडाक्याच्या थंडीचा काही पिकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होणार आहे.याचा गहू,हरभरा,करडई या पिकांवर परिणाम होणार आहे.हवामान खात्याकडून विस्तारित हवामान सल्ला देण्यात आला आहे.
थंडीचा रब्बी पिकांवरील सकारात्मक व नकारात्मक परिणाम व उपाययोजना
येणाऱ्या थंडीचा रब्बी पिकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होणार आहे.त्याअनुषंगाने विचार केल्यास करडई पीक सध्या फ्लोरा अवस्थेमध्ये आहे. या पिकावर येणाऱ्या थंडीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर यावर पडणाऱ्या किडीवर शेतकऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.थंडीमुळे करडईवर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय-योजना करणे आवश्यक आहे.सोलापुर जिल्ह्यात ज्वारीखालील क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. सध्या ज्वारीचे पीक फ्लोरा अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.किमान तापमानात होणारी घट या पिकासाठी उपयुक्त आहे.पिकाच्या पुढील वाढीसाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे.पण तापमान किमान अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास या पिकासाठी अनिष्ट परिणाम करणारे ठरणार आहे.दाणे भरण्यासाठी अडचण ठरणार आहे. गहू पीक सध्या मुकुट मुळी फुटण्याच्या अवस्थेत ते काडी धरण्याच्या अवस्थेत आहे.या पिकासाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे. या पिकावर मावा,कुडकूडे वाढण्याची शक्यता आहे.हरभरा पीक सध्या फ्लोरा अवस्था ते घाटे धरण्याच्या स्थितीत आहे.ही थंडी या पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे.मागील 10 ते 15 दिवसाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण होते.या हिवाळी ऋतूमध्ये अचानक ढगाळ तर कधी थंडी जाणवत आहे.हा हवामान बदलाचा परिणाम रब्बी पिकांवर जाणवत आहे.तो काही प्रमाणात सकारात्मक व नकारात्मक आहे.
द्राक्ष,डाळींब,केळी या फळबाग पिकांवरील वातावरण बदलाचा परिणाम व उपाय
जिल्ह्यात फळबागा पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.यामध्ये केळी, द्राक्ष,डाळींब याचे क्षेत्र जास्त आहे. मागे ढगाळ वातावरण तयार झाले होते,त्याचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला आहे. त्यामुळे डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता.येणाऱ्या काळात 4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी होणार आहे.सध्या द्राक्ष मणी धरण्याच्या अवस्थेत आहे.द्राक्षांमध्ये शर्करा निर्माण होण्यास जास्त थंडी अपायकारक आहे.त्यामुळे शर्करा कमी प्रमाणात निर्माण होते.तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर केळीमधून बाहेर पडणाऱ्या केली फुलांसाठी अडचणी निर्माण होतात.कडाक्याच्या थंडीने फळपिकास नुकसान होते.त्यासाठी सच्छिद्र अशा प्लास्टिक पिशव्यांचे आवरण घडाला शेतकऱ्यांनी घालावे.त्यामुळे कमी प्रमाणात नुकसान होईल.डाळींब पिकाची थंडीच्या दिवसात कार्यक्षमता थांबते.तापमान कमी झाल्याने अन्नद्रव्य शोषणासाठी अडचणी निर्माण होतात.यामुळे फळांची पक्वता लांबण्याची शक्यता निर्माण होते.थंडीचा पारा जास्त खाली गेला तर डाळींबाचे फळ तडकण्याची शक्यता असते असे हवामान तज्ञ यांनी सांगितले.