भाजप नेते पाहणीसाठी आले, अन् शेतकऱ्याचं पीक तुडवून गेले!
X
औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान पाहणीसाठी गेल्या आठवडाभर सर्वच पक्षातील नेते आणि मंत्री पाहणी दौरे करत होते. एखादा नेता आपल्या शेतात येऊन गेला म्हणून काहीतरी मोबदला आपल्याला मिळणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या आठवड्यात भाजप नेत्यांनी केलेला दौरा एका शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरला आहे.
त्याचं झालं असे की, 17 ऑक्टोंबरला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पैठण तालुक्यातील डोणगाव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रोहिदास चव्हाण या शेतकऱ्यांच्या कापसाची पाहणी केली. मात्र, याचवेळी नेते कमी अन् कार्यकर्ते जास्त असल्याने मोठी गर्दी झाली होती.
चव्हाण यांनी 3-4 गुंठ्यांत 10 किलो मेथी लावली होती. त्याला खत, फवारणी करत त्यांना 3 हजारापेक्षा अधिक खर्च आला होता. यातून त्यांना 15 हजार रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा होती. मात्र, पाहणी दरम्यान मेथीचे अर्धा पेक्षा जास्त नुकसान झाल्याचं आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने जाहीर केली असली तरीही नेत्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.