Home > मॅक्स किसान > केळी आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, सरकारने तातडीने लक्ष घाला

केळी आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, सरकारने तातडीने लक्ष घाला

भाजपाकडून शेतकऱ्यांप्रमाणेच बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

केळी आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, सरकारने तातडीने लक्ष घाला
X

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, राज्य सरकाने सोयाबिनच्या नुकसान भरपाईपोटी २५ टक्के शेतकऱ्यांना द्यावेत असे पत्र वीमा कंपन्यांना दिले पण ते पत्र या विमा कंपन्यानी केराच्या टोपलीत टाकले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जळगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जळगाव भागातील केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. केळीला भाव मिळत नाही तर दुसरे म्हणजे केळीवर पडलेला रोग, यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी याप्रश्नी आंदोलनही केले पण भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. सरकारने याप्रश्नी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढील पंधरवड्यात राज्यातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आंदोलन करणार आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आले पण मागील १० वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र दहापट वाढल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळला असता तर शेतकऱ्यावर ही परिस्थीती आली नसती. केळी, कापूस याचे जे झाले तेच कांद्याचेही झाले. कांदा बाजारात आली की मोदी सरकारने ४० टक्के निर्यात कर लावून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राज्यातील परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करुन मदत केली पाहिजे.

शेतकऱ्यांप्रमाणेच भाजपा सरकारने बेरोजगारांच्या जखमेवरही मीठ चोळण्याचे काम केले आहे. राज्यातील एक मंत्री तर बेकारी नाही असे जाहीरपणे म्हणतात. हा प्रकार तरुणवर्गाचा अपमान करणारा आहे पण भाजपाला तरुणांच्या हिताचे काही देणेघेणे नाही. तरुणांना नोकरी मिळत नाही दुसरीकडे तरुण पिढीला बरबाद करणारा ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरु आहे, तरुण पिढीला बरबाद करणारा हा अंमलपदार्थांचा काळाधंदा बंद झाला पाहिजे.

मी पुन्हा येणार..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’च्या ट्वीटवर प्रतिक्रीया देताना नाना पटोले म्हणाले की, मी पुन्हा येईनची क्लीप एका तासात डिलीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली, ते जनतेच्या मनातूनच डीलीट झालेले आहेत. फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातुनही उतरले आहेत. सध्या सोशल मीडियाची ताकद प्रचंड वाढलेली आहे. त्यांच्या ट्वीटवर काय प्रतिक्रिया आल्या ते पहा. लोकच म्हणतात आता तुम्हाला संधी नाही. कंत्राटी नोकर भरती रद्द केली हे सांगत असताना सोशल मीडियावर तरुणांच्या काय प्रतिक्रीया होत्या तेही पहा. भाजपा हा खोटारडा पक्ष आहे हे जनतेला समजले आहे, त्यामुळे त्यांच्यावर आता कोणी विश्वास ठेवत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.


Updated : 30 Oct 2023 11:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top