फुले विद्यापीठाच्या अधिसभेत सुनेत्रा पवार बिनविरोध...
X
तर प्रसेनजीत फडणवीस यांचा निसटता विजय
मुख्यमंत्र्यांचे बंधु प्रसेनजीत फडणवीस आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे आमने सामने ऊभे ठाकल्याने चर्चेत आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणूकांचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकांत सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली तर मुख्यमंत्र्यांचे बंधु प्रसेनजीत यांनी निसटता विजय मिळवला आहे. ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. सुरवातीस सोप्पी वाटणारी ही निवडणुकीत प्रगती पॅनेलने धक्कातंत्राचा वापर करत खेचून आणली.
नविन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथमच सिनेट निवडणुका होत होत्या. या सिनेट निवडणुकांद्वारे राजकारणात पाऊल ठेेऊ पाहणारे प्रसेनजित फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या निकालाकडे साऱ्याचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी पॅनेल असॆ स्वरुप या निवडणुकीला आले होते. यात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारच नसल्याने त्यांचा विजय नक्की होता. सुनेत्रा पवार व्यवस्थापन प्रतिनिधी गटासाठी बिनविरोध निवडूण आल्या. दुसरीकडे भाजप समर्थित उमेदवार सहज निवडून येतील, असे गृहीत धरून निवडणुकीची नियोजन केले जात होते. त्यामुळे प्रसेनजित यांची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र भाजपने केलेल्या नियोजनाच्या विपरीत मते विरोधात गेल्याने प्रसेनजीत यांना पाचव्या क्रमांकांवर समाधान मानावे लागले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या बळाचा पुर्ण वापर करत प्रयत्न केलेल्या निवडणूकीचा लागलेला धक्कादायक निकालाचं श्रेय काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकत्रित लढाईलादेखील तितकच जातं. शरद पवारांचे नातू व अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी विशेष लक्ष घालून या निवडणूकीची सुत्रं ताब्यात ठेवली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाने पहिल्यांदाच सिनेटमध्ये विजय संपादित केला असल्याने हा विजय महत्वाचा ठरत आहे. या सिनेट निवडणुकांचे निकाल मुख्यमंत्र्यांच्या पुढील चिंता वाढवणाऱ्या ठरणार असल्याचं दिसत आहे.