Home > मॅक्स एज्युकेशन > कोरोनामुळे शिक्षणासाठी मिळणारा CSR फंड बंद, मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांना फटका

कोरोनामुळे शिक्षणासाठी मिळणारा CSR फंड बंद, मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांना फटका

गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले मुंबईतील एक अभ्यासकेंद्र आर्थिक संकटामुळे अडचणीत आले आहे. इथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा संघर्ष दाखवणारा आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांचा स्पेशल रिपोर्ट....

कोरोनामुळे शिक्षणासाठी मिळणारा CSR फंड बंद, मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांना फटका
X

शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात जाता यावे यासाठी कोट्यवधी गरीब मुलं प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकर घेतात. अशाच एकता वेलफेअर या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने मुंबईतील मानखुर्द परिसरातील भीम नगर या वस्तीमध्ये टाटा सामाजिक संस्थेच्या मदतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थांसाठी मोफत अभ्यासिका गेली 2 वर्षांपासून सुरू आहे. या अभ्यासिकेमध्ये जवळपास 160 विद्यार्थी येथे अभ्यास करायला येत असतात. पण ज्या कंपनीकडून सीएसआर अंतर्गत या अभ्यासिकेसाठी निधी येत होता त्या कंपनीने कोरोना संकटामुळे आरोग्यासाठी हा निधी दिल्याने ही अभ्यासिका चालवणे अवघड जात आहे.

दरम्यान शाळा ऑनलाईन सुरू झाल्या असल्या तरी इथल्या गरिब विद्यार्थ्यांना मोबाईल परवडणारा नसल्याने त्यांच्यासाठी ही अभ्यासिका आधार ठरते आहे. पण अनलॉकनंतर अभ्यासिक सुरू झाली असली तरी निधी नसल्याने या अभ्यासिकेचे खर्च संस्थेला परवडत नाहीये. अभ्यासिकेमध्ये येणारे विद्यार्थी गरीब घरातील आहेत. त्यामुळे घरी दोन किंवा तीन मुलं असल्याने एका मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण शक्य नसल्याने त्यांना ही अभ्यासिका आधार ठरली आहे. पण निधी बंद झाल्याने ही अभ्यासिका बंद तर होणार नाही ना अशी भीती विद्यार्थ्यांना वाटते आहे.




या संस्थेच्या सदस्य आणि अभ्यासिका केंद्राच्या शिक्षिका अखसीर आदिल पटेल यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, "गेली चार वर्षे मी या अभ्यासिके मध्ये मुलांना शिकवत आहे आणि मी संस्थेची संस्थापक सदस्यसुद्धा आहे. त्यामुळे मलाच आता या सगळ्या संस्थेचा भार हा उचलायला लागत आहे. पूर्वी संस्थेला आर्थिक मदत येत होती तेव्हा मलादेखील पगार होता. पण आता मला सुद्धा पगार गेल्या चार महिन्यांपासून मिळालेला नाही. त्यामुळे माझी सर्व लोकांना विनंती आहे की,आमच्या संस्थेला आणि या अभ्यासिका चालू राहण्यासाठी आर्थिक मदत करा".





भीमनगर मधील अभ्यासिका चालवणाऱ्या एकता वेल्फेअर सोसायटीला टाटा सामाजिक संस्थेकडून कोरोनाच्या काळात आर्थिक पाठबळ मिळालं नाही. यासंदर्भात आम्ही टाटा सामाजिक संस्थेच्या CSR ऍक्टिव्हिटी कमिटीच्या सदस्या अमिता भिडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "मानखुर्द येथील त्या अभ्यासिकेला ECGC या कंपनीकडून CSR च्या माध्यमातून आर्थिक मदत होत होती. परंतू या कोरोनाच्या काळात या कंपनीने आम्हांला आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे आम्ही देखील त्या अभ्यासिकेला आर्थिक मदत करू शकलो नाही. तरी देखील अभ्यासिकेला कशा स्वरुपात आर्थिक मदत करू शकतो यावर आमची चर्चा चालू आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच आता गरिब विद्यार्थ्यांसाठी मदत करणाऱ्या अशा सामाजिक संस्थांना मदतीसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Updated : 18 Dec 2020 8:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top