MPSC, UPSC चे विद्यार्थी रस्त्यावर, नितेश कराळे मास्तरांचे नेतृत्व
X
राज्यात सध्या MPSC च्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. कोरोनामुळे अनेक परीक्षा देखील रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर MPSC आणि UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानी वर्धा शहरात आंदोलन केले. खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले नितेश कराळे यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये एमपीएससी, यूपीएससीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्य सरकारे तात्काळ रखडलेली पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा घ्याव्या अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक परीक्षा रखडल्या आहेत. तर स्पर्धा परीक्षांमध्ये पास झालेल्यांच्या मुलाखतीसुद्धा रखडल्या आहेत. इंटरव्यू सुद्धा झाले नाही आणि त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. याच परिस्थितीमुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या 24 वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली. MPSC च्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊनही त्याची तोंडी मुलाखत रखडली होती. त्याच्या आत्महत्येनंतर पावसाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदे भरण्यात येतील, अशी घोषणा केली. पण सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप करत नितेश कराळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.