डी. लिट.एवढी स्वस्त असते का ?
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात 5 हजार ते 1 लाख रुपयात हवी असलेली कोणतीही पदवी, पीएचडी किंवा डी. लिट. देणाऱ्या बोगस संस्था,विद्यापीठ निर्माण झाली आहेत.त्यात आता विदेशी ठगांचीही भर पडली आहे, काहीही न करता खूप काही प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप असल्याचे लक्षात आल्यावर विदेशी बोगस संस्थानी भारतात एजंट नेमून दुकानदारी थाटली आहे, वाचा या बोगसगिरीचे विश्लेषण..
X
पैसा मिळविण्याचे शंभर मार्ग हे पुस्तक ज्यांनी वाचले असते त्यांच्या डोक्यात असंख्य कल्पनांचा पूर येत असतो.पैसे मिळविण्यासाठी जे लोक विविध शक्कल लढवत असतात तसेच मुबलक पैसा असणारे सुद्धा पैशाने काहीही मिळू शकते याची खात्री बाळगून असतात, नव्हे ते सिद्ध पण करून दाखवत असतात.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात 5 हजार ते 1 लाख रुपयात हवी असलेली कोणतीही पदवी, पीएचडी किंवा डी. लिट. देणाऱ्या बोगस संस्था,विद्यापीठ निर्माण झाली आहेत.त्यात आता विदेशी ठगांचीही भर पडली आहे, काहीही न करता खूप काही प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप असल्याचे लक्षात आल्यावर विदेशी बोगस संस्थानी भारतात एजंट नेमून दुकानदारी थाटली आहे.
काही वर्षापूर्वी तर राज्याच्या राजभवनात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते अश्या बोगस पदव्या,डॉक्टरेट वाटल्या गेल्याचे प्रकरण पत्रकार उन्मेष गुजराती यांनी उघड केले होते. हे प्रलोभन एवढे भन्नाट आणि बेमालूम असते की याला अनेक
पत्रकार ,आमदार,मंत्री,वकील, व्यावसायिक सहज बळी पडतात.अनेक आमदार जेमतेम शिक्षण घेतलेले असतात मात्र काही वर्षांनी अचानक त्यांच्या नावाच्या अगोदर डॉक्टर उपाधी लागते, हे घडण्याची प्रक्रिया याच मार्गातून जाते.
देशाची राजधानी दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असे घाऊक पदवी वाटप समारंभ आयोजित केले जातात,दिल्लीत अनेक केंद्रीय मंत्री सहज उपलब्ध होतात.(त्यांना उपस्थित कसे ठेवावे याचे तंत्र राजकीय दलालांना उत्तम अवगत आहे) ज्यांनी अश्या पदवी,डॉक्टरेट साठी नोंदणी केली असते ते लोक पंचतारांकित व्यवस्थेने प्रभावित होतात अन मोठी रक्कम भरून पदवी घेऊन येतात.
पुण्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्या मुलीला असेच फसवले गेले तेव्हा विदेशी बोगस विद्यापिठ आणि काही संस्थांवर गुन्हे दाखल झाले, केंद्र आणि राज्य सरकारने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली मात्र ती यादी वाचण्याची फुरसद शिक्षित लोकांना सुदधा नाही हे दुर्दैव आहे.परिश्रम केल्याशिवाय दहावी पास झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा मिळत नाही असे असताना लोकांना पदव्या आणि डॉक्टरेट कश्या मिळतात ? हा साधा प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही हे अधिक गंभीर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी विकून गंडा घातला होता.
पुण्यातील The Corinthians Resort and Club Pune येथे नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी या संस्थेने २१ जुलै २०२१ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी असंख्य जणांना पीएचडी पदव्या वाटण्यात आल्या. यात प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी देण्यात आली.
राजकुमार टाक, विजय पाटील, Joshua Immanuel यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो जणांना बोगस पीएचडी वाटप करणारा भामटा मधू कृष्णन हाही हजर होता. यावेळी प्रह्लाद मोदी व कृष्णन यांची भाषणेही झाली. यापुढे असाच कार्यक्रम गुजरातलाही घेवू, अशी घोषणाही आयोजकांनी केली. यावेळी प्रह्लाद मोदी यांच्यासह जमलेल्या उपस्थितांनाही THE AMERICAN UNIVERSITY, USA या बोगस विद्यापीठातर्फे बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.
नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी या संस्थेचा नेल्सन मंडेला यांचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र नामसाधर्म्याचा फायदा घेऊन आतापर्यंत या संस्थेने शेकडो जणांना पीएचडी दिलेल्या आहेत.
या बोगस पीएचडी घेणाऱ्यांमध्ये अशिक्षित, भाजीवाल्यांपासून ते सेलिब्रेटीजचा समावेश आहे. काही नावे स्प्राऊट्सच्या वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत.
लिएंडर पेस - टेनिसपटू, झरीन खान - अभिनेत्री, सोनू शर्मा - मोटिव्हेशनल स्पीकर, पलक मुच्छाल - पार्श्वगायक, आदित्य नारायण - अभिनेता/गायक, अनु मलिक - संगीतकार, कुमार सानू - पार्श्वगायक, संग्राम सिंग - कुस्तीपटू, उदित नारायण - पार्श्वगायक, कोबी शोशानी – कॉन्सुलेट-जनरल ऑफ इस्रायल, जॉन बार्ले - मंत्री, धनराज पिल्ले - हॉकीपटू, राजेंद्र बडवे - टाटा मेमोरियल हॉस्पिटल (संचालक), मैथिली ठाकूर - पार्श्वगायिका, फ्रान्सिस्को सार्डिन्हा - राजकारणी, फग्गन सिंग कुलस्ते - मंत्री, दिनेश कुमार जांगीड - दिल्ली कस्टम आणि जीएसटी सह आयुक्त, ज्योती कलश - नागालँडचे अतिरिक्त मुख्य सचिव, रुपेल मोहता - मॉडेल, अशोक पुरी - एमजीटी ग्रुपचे सीईओ, दुबई, हिमेश मदान - मोटिव्हेशनल स्पीकर.
*राजभवनात आर्थिक गैरव्यवहार करून मोठमोठाले पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात, त्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्ताही नसतो. कोणताही शहानिशा न करता समाजकंटक, फ्रॉड, गुंड लोकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो, अशी बातमी फोटो व पुराव्यासह 'स्प्राऊट्स'मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर राजभवनात बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम साजरे केले जातात, त्याची छायाचित्रेही सर्वप्रथम स्प्राऊट्समधून प्रसिद्ध करण्यात आली.
बोगस पीएचडी वाटपासंदर्भात कार्यरत असलेले टोळीचा एक पद्धतशीर षडयंत्र असते त्यानुसार ते मोठ्या प्रभावशील व्यक्तींना भेट घेऊन आपल्या बोगस विद्यापीठ बाबत माहिती देतात आणि ते भासून अनेकांना प्रभावित करतात. या षड्यंत्रातील आणखी एक गंभीर प्रकरण म्हणजे महाराष्ट्रासह देशभरात अगदी अशिक्षित लोकांनाही बोगस पीएचडी विकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला मधू कृष्णन याने दोन वर्षांपूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कृष्णन हा THE AMERICAN UNIVERSITY, USA या व इतरही अनेक फेक युनिव्हर्सिटीचा सर्वेसर्वा आहे. त्याने राज्यपालांबरोबर येवून सकाळी ९.३० वाजता त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट केला केला होता .राज्यपालांनीही बेजबाबदारपणे त्याचा व त्याच्याबरोबर असणाऱ्या Ranbir Singh Laishram या व इतर बोगस टोळीतील सर्वांचाच सत्कार केला. त्यांच्याबरोबर चर्चा केली, हे गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी राजभवनातील सचिन वाझे व बेकायदेशीरपणे बसलेले राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर व त्याच्या कंपूतील अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अधिवक्ता दिलीप इनकर यांनी केली होती.
राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात. त्यांच्या हातून बोगस पीएचडी विकणाऱ्यांचा सत्कार होतो. ते फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले जातात. त्यामुळे सामान्य जनतेची दिशाभूल होते. त्याचा फायदा घेवून मधू कृष्णन व त्यांचे दलाल मोठी रक्कम घेवून बोगस पीएचडी विकतात, दुर्दैवाची बाब म्हणजे हे सर्व प्रकाशित होवूनही हे सर्व दोषी इसम उजळ माथ्याने फिरत आहेत. दरवर्षी नव्या संस्था व नव्या बोगस विद्यापीठांची स्थापना करून जनतेला गंडवत असतात.
श्री. श्री. रविशंकर, कुमार सानू, विवेक बिंद्रा, स्नेह देसाई, अनु मलिक, आदित्य नारायणन, मंदिरा बेदी यांसारखे हजारो कथित सेलेब्रिटी बोगस पीएचडी घेवून समाजाची दिशाभूल करीत असतात. याना पीएचडी देणाऱ्या दलालांनी आता नवी शक्कल लढविली आहे. ते मूळ फेक युनिव्हर्सिटीला फक्त ५ ते ६ जणांची नावे देतात व इतरांना चक्क स्वतः:च प्रिंट काढून ही बोगस पीएचडीची सर्टिफिकेट्स बनावट सह्यांनीशी वाटतात, त्यामुळे त्यांना मूळ फेक यूनिव्हर्सिटीला भलेमोठे कमिशन देण्याचाही प्रश्न उरत नाही.
मागील काही काळामध्ये विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये बोगस पीएचडी चे प्रकार उघडकीस आले होते. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्फत या टोळीवर एफ आय आर दाखल करण्यात आले होते.
पुणे सत्र न्यायालयाकडून कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी टोंगा यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर आठ जुलै 2019 रोजी जामीन देखील नाकारल्याचे उघड झाले आहे.
यातील बोगस पीएचडी वाटणारे ताहीर हुसेन याकुब शेख, रियासत पिरझादा, राकेश मित्तल आणि अफताब अन्वर शेख यांचा समावेश होता.
या प्रकरणात प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये घेऊन अभिषेक हरिदास आणि विकास कुचेकर यांची फसवणूक झाल्याचे पोलीस तक्रार होती. त्यानंतर अजय माळी वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत बोगस विद्यापीठाची तपासणी करण्यात आली.
कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी टोंगा यांनी पीएचडी वाटप करत असताना राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) किंवा ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE) कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही किंवा मान्यता मिळवलेले नाही.
गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी अन्वर शेख हा व्यक्ती शासकीय अनुदानित पुन्हा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले तसेच मित्तल हा लीलावती कॉलेज एरंडवणे येथे कार्यरत होता. यातील बोगसगिरी लक्षात येऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठाला काही कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती परंतु विद्यापीठाकडून ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाही त्यानंतर सर्व फसवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची फी परत देण्याच्या आदेश दिले होते.
पुणे येथे शिक्षण क्षेत्रात पत्रकारिता करणारे वरिष्ठ पत्रकार यशवंत सोनकांबळे यांच्याकडून माहिती घेतला असता त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने बोगस पीएचडी वाटपाच्या सुळसुळाट पुण्यासह महाराष्ट्र आणि देशांमध्ये सुरू झाला आहे. बोगस विद्यापीठांचे कुठलेही कॅम्पस नसते या बोगस विद्यापीठांच्या अस्तित्व फक्त कागदावर असते. भारतामध्ये अशा पद्धतीचे पदवी देत असताना तुम्हाला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कडून कायदेशीर परवानगी घ्यावी लागते ती न घेतल्यास कुठल्याही संस्थेने दिलेली डिग्री ही बोगस असते असे ते म्हणाले.
मागील काही काळामध्ये याबाबत मोठी चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने याबाबत विधिमंडळामध्ये कायदा देखील मंजूर केला आहे. महाराष्ट्र अनधिकृत संस्था आणि अनधिकृत अभ्यासक्रम कृषी पशुसंवर्धन व मत्स्य शास्त्र, आरोग्य विज्ञान,उच्च तंत्र आणि वोकेशनल शिक्षण (प्रतिबंध) कायदा 2013 मंजूर करण्यात आला आहे. यामध्येही कठोर तरतुदी करण्यात आल्या असून कोणत्याही संस्थेला राज्य सरकार आणि केंद्रीय शिक्षण संस्थांच्या परवानगीशिवाय पदवी देता येत नाही हे अंतर्भूत करण्यात आलं आहे.
एवढं सगळं होऊनही यातील गुन्हेगार अजूनही उजव्या मातेने फिरत असून बोगस पीएचडी वाटपाचे रॅकेट सुरूच असल्याचे दिसून येते.
काल रविवारी १३ ऑगस्ट २०२३ रोजी, दिल्ली येथील रॅडिसन हॉटेल कॅम्पसमध्ये झालेल्या समारंभात हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे कथितकॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा, ऑस्ट्रेलिया (ओशनिया)
ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरीबद्दल आणि सन्मानार्थ मानद डॉक्टरेट ( डी.लिट) प्रदान केली.
याचबरोबर एकनाथ सोपान पवळे यांना त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल आणि सन्मानार्थ मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. समाजामध्ये क्रिडा क्षेत्रात त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्यांची यादी UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
• झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
• सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
• महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO)
• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO)
• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO
• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO
• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
• मानव भारती विद्यापीठ, सोलन
• विनायक मिशन्स किंवा सिंघानिया.
• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
• पीस युनिव्हर्सिटी
• सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी