विद्यार्थ्यांची परवड : महाविद्यालय सुरु वसतीगृह बंद
कोरोना काळात लॉकडाऊन आणि अनलॉकच्या धोरणात सर्वाधिक भरडली गेले ती शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थी.. आता महाविद्यालय सुरू होऊ असली तरी वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहे प्रतिनिधी गौरव मालक यांचा ग्राउंड रिपोर्ट..
X
राज्यभरात अनेक महाविद्यालय सुरू झाली आहेत दरम्यान पुणे शहरामध्ये असलेले अनेक महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत मात्र समाज कल्याण विभाग अंतर्गत असलेले शासकीय वसतीगृह सुरू न झाल्याने राज्यभरातून पुणे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे आर्थिक स्थैर्य नसल्याने पुणे शहरात राहणे या विद्यार्थ्यांना परवडत नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अनेक वेळेला शासनाकडे पाठपुरावा केला आहे मात्र अद्यापही हे विद्यार्थी दुर्लक्षितच आहे. सामाजिक न्याय विभागाने हे वसतीगृह सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. तरीसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये या शासनाच्या परिपत्रकाला हरताळ फासण्यात आले आहे. याचा निषेध करण्याकरिता पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये छात्रभारती व स्टुडन्ट हेल्पिंग हॅंड यांच्या नेतृत्वात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे ..
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या दिव्या कांबळे म्हणतात, वसतिगृह बंद असल्या कारणाने आम्हाला संविधानिकरीत्या आंदोलन करावे लागले. कॉलेज सुरू होऊन सुध्दा वसतिगृह बंद आहेत. आशा वेळेस आम्ही राहायचं कुठे ? प्राइवेट हॉस्टेल ला राहण्या साठी आमची अर्थिक परिस्थीती ठीक नाही. अश्या परिस्थितीत आमच्या सारख्या मुलींच्या पालकांच्या पुढे लग्ना शिवाय पर्याय उरत नाही. आम्हाला ही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, लग्न करुन चूल आणि मूल करणं जमणार नाही त्यामूळे आमचा लढा शिक्षणासाठी कायम राहणार असे तिने सांगितले.
भावेश नन्नवरे म्हणाले, माझे महाविद्यालय २२ November पासून सुरू झाले आहे. पण अजुनही माझे वसतिगृह सुरू झाले नाही. त्यामुळे माझी राहण्याची गैरसोय होत आहे. तरी लवकरात लवकर वसतिगृह सुरू करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रत्यक्षरित्या उपस्थित राहता येईल.
संपदा रवींद्र डेंगळे, सध्या TYBSc Statistics Fergussonमहाविद्यालयात शिकते आहे.2019 -20 मध्ये फर्स्ट इयर बीएससी मध्ये असताना आंबेगाव येथील समाज कल्याण वसतिगृह प्रवेश मिळालेला. म्हणजे अजूनही माझा प्रवेश हॉस्टेलमध्ये आहेच, पण हॉस्टेल सुरू झाले नसल्याने पुण्यात राहण्याची गैरसोय होत आहे. 15 नोव्हेंबर रोजी आमचे कॉलेज पुर्णतः ऑफलाईन सुरू झाले.
14 नोव्हेंबरला जेव्हा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधला तेव्हा, " हॉस्टेल 20 तारखेनंतर सुरू होतील" असे सांगण्यात आले.म्हणून मी मैत्रिणीकडे रूमवर, हॉस्टेल 4 ते 5 दिवसांत सुरू होईल या हेतूने राहायला आले. कारण कॉलेजमध्ये परीक्षा सुरु झाल्या होत्या आणि त्या चुकवणे योग्य नव्हते. नंतरही एकदा कॉल केल्यावर हॉस्टेल सुरू होण्याची प्रक्रीया सुरू आहे असे सांगण्यात आले. घरची परिस्थिती बेताची असल्याने राहण्याचा आणि जेवणाचा खर्च परवडत नाही. मेस लावायची होती , पण हॉस्टेल सुरू होणार आहे म्ह्णून आपले मेसचे महिन्याचे पैसे वाया जातील, म्हणून मेसही लावली नाही. हॉस्टेल सुरू होतंय की नाही,अस बाहेर किती दिवस राहणार या चिंतेने अभ्यासातही मन लागत नाही.
कॉलेज सुरू होऊन आता 15 दिवस झाले तरीही हॉस्टेल मात्र बंदच आहे. मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली ज्या बाहेरच्या जिल्ह्यातीलआहेत, त्यांनी कुठे राहायचे? हा प्रश्न प्रत्येकीसमोर उभा राहिला आहे. समाजकल्याण वसतिगृहातील अनेक मुली तर हॉस्टेल सुरू नाही आणि बाहेर राहणे परवडत नाही म्ह्णून अजूनही घरीच आहेत. त्यांच्या शिक्षणाचं काय! या समाजातील आर्थिक दुर्बल घटकांनी शिक्षणापासून वंचित राहायचे का?
ममता परेड म्हणतात,विद्येचे माहेरघर असलेल्या पूणे शहरात आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वप्न घेऊन येतो. कोरोना काळात खूप मोठे नुकसान झाले. आता कॉलेज सुरू झाली आहेत. मात्र वसतीगृह सुरू न करून सरकारही आमचे नुकसानच करीत आहे
फर्गसन महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस वाघमारे सांगतो की,मी पदवीचा शेवटचा वर्षाला आहे. कॉलेज ऑफलाईन सुरू होऊन जवळ-जवळ एक महिना होत आहे. परिक्कशा जवळ येऊन ठेपलया आहे. अजुनी हॉस्टेल सुरू झालेले नाही. आम्ही दूरचा विद्यार्थ्यांनी परिक्षा कशा द्याव्या हाच प्रश्न आहे. .
पुण्यात बाहेर राहन्याचा खर्च हा आम्हाला परवडणारा नाही. म्हणूनच शासकीय हॉस्टेल घेतले. परंतु, तिथे सुद्धा अशीच दिरंगाई होत असेल तर आम्ही कोठे जावे?साधे आंदोलन करायला जरी जायचे असेलतर तिथे गेल्यावर कुठे राहावे हाच प्रश्न आहे.इथून जायला मला 14 तास लागतात खाजगी वाहनाचे कमीतकमी दराचे तिकीट सुद्धा सध्या 1800 रुपये आहे.
परीक्षेचा काळात आता मी काय करू हाच माझ्या समोर मोठा प्रश्न आहे. माझ्या सारखे कित्तेक विध्यार्थी वसतीगृह सुरू न झाल्याने घरीच थांबले आहे. समाजकल्याण मधील अधिकाऱ्यांना याची चिंता, किंवा त्याच्याशी घेणे-देणेच नाही असे वाटते त्यांना विचारणा केली असता आम्ही काही करू शकत नाही. अजून कितीवेळ लागेल तेही माहिती नाही अशी थंड उत्तरे देतात.
आता आम्ही या संदर्भात विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.विद्यार्थी आणि छात्रभारती संघटनेच्या अध्यक्ष छाया काविरे म्हणाल्या, "मागील दोन वर्षात महाविद्यालय सुरू झाली बंद झाली परत सुरू झाली. पण वसतिगृहे मात्र अद्यापही सुरू झालेली नाहीत. मागील दोन वर्षात कोणतीच शैक्षणिक शिष्यवृत्ती आम्हाला मिळालेली नाही तसेच स्वाधर योजनेची ही अंमलबजावणी होत नाही. ऑफलाईन कॉलेज असल्यामुळे पुण्यात येणे आम्हाला अनिवार्य आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुण्यात स्व खर्चाने राहणं आम्हाला परवडत नाही. मग आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहायचं का? जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि वसतिगृहे तातडीने सुरू झाली नाहीत, तर ज्या विद्यार्थ्यांना खासगी फ्लॅट भाड्याने घेणे परवडत नाही, त्यांना सरकारी कार्यालये आणि पुणे महापौरांच्या बंगल्यावर राहावे लागेल.
स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणाले की,राज्यातील विद्यपीठे ,काँलेज व समाजकल्याण यांची वसहतीगृह सुरु करावी. असे शासनाने 7 अक्टोबर 2021 परीपञक काढून ते सुरू का केली नाहीत.?
यासदर्भात आम्ही वारंवार निवेदन देउन चौकशी केली.तर त्यातुन एक लक्षात आले.जे वसहतीगृहाच्या खोल्या कोरोना रुग्णांनी अस्थाव्यस्थ करुन ठेवल्या होत्या. यांचा खर्चाची जबाबदारी घेण्यास मनपा.व समाजकल्याण विभाग तयार नव्हते.त्यामुळे यांच्या दोघांच्या वादात हजारो विदयार्थीचे अतोनात नुकसान होत होते.सर्व सुरळीत असताना.फक्त मागासवर्गीय विदयार्थीच्या प्रश्नाबाबत हे सरकार व प्रशासन उदासीन का?
कोरोनाचं नाव सांगुन शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचा हा डाव नाही ना? कालच आयुक्त नारनवरे यांनी वसहतीगृहाची पाहणी केलीय.हळुहळु सर्वच वसतीगृह सुरू होत आहेत.ता.आता एकदम सर्वच सुरु व्हावेत.अशी अपेक्षा.अनकी उशीर केला तर आयुक्ता कार्यालय समोर तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस प्रवक्त्य निकिता बहिरट यांनी दिला आहे.
कोरोनाच्या परिस्थितीनुरूप राज्यामध्ये अनेक ठिकाणी दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू झालेली आहेत.अनेक वर्षे महाविद्यालय बंद होती त्यामुळे सर्व विद्यार्थी आपल्या गावी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत होते.आता महाविद्यालय सुरू करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या इतर सोयी सुविधा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. गावावरून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहे अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे खूप हाल होत आहे व विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करीत आहेत. मविआ राज्यसरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास नेहमीच एक पाऊल पुढे असते हे आपण वेळोवेळी पाहिलेले आहेच. सर्व गोष्टी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी थोडा वेळ जाईल व निश्चितच विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील यासाठी संयम बाळगावा.
याच बरोबर आमच्या प्रतिनिधींनी समाज कल्याण आयुक्त यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेला सामोरे गेले आहेत आता प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू झाले आहेत मात्र वस्तीगृह बंद असल्याने या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची जबाबदारी कोण घेणार? सामाजिक न्याय विभाग आता तरी आपले डोळे उघडणार का व या विद्यार्थ्यांना न्याय देणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल.