Home > मॅक्स कल्चर > 'सबका मालिक एक'च्या संदेशाला नख?

'सबका मालिक एक'च्या संदेशाला नख?

सबका मालिक एकच्या संदेशाला नख?
X

प्रत्येक साधुसंत, महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथी या त्यांच्या विचाराचे स्मरण करण्यासाठी व त्यांच्या अनुकरणाच्या दृढ संकल्पासाठी असतात़. परंतु साईबाबांची शिकवण आचरणात आणण्यासाठी मुहूर्त लागत नाही. त्यांची शिकवण ‘श्रद्धा-सबुरी’ व ‘सबका मालिक एक’ या दोन संदेशांत सामावली आहे. कुठलीही अंधश्रद्धा, कर्मकांडाचे अवडंबर नसलेले सर्वधर्मीय श्रद्धास्थान अशी साईबाबांच्या शिर्डीचीही ओळख आहे.

त्यांच्या विचारांची गरज तत्कालीन समाजापेक्षाही अधिक आज आहे. आज अशांततेच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजाला शांततेकडे जाणाऱ्या मार्गाची व त्यासाठी उपयोगी पडणाऱ्या संदेशाची नितांत आवश्यकता आहे. परंतु वास्तव चित्र उलटेच आहे. केवळ माणुसकी हाच धर्म ज्यांनी हयातभर व समाधिस्त झाल्यानंतरही मानला, त्या साईबाबांना आता ‘आपल्या’मध्ये घेण्याचे प्रयत्न धर्मवाद्यांनी चालवले आहेत. त्यांच्या संदेशाला आता धर्माची झूल चढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व त्यांच्या समाधीच्या शताब्दीवर्षात घडत आहे, हे दुख:दायक आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, समाधी शताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना साईबाबांच्या जन्मस्थानाकडे लक्ष वेधले आणि एक अदृश्य उलथापालथ सुरू झाली़. यापूर्वीही अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. राष्ट्रपतींनी शब्दबद्ध केल्यावर मात्र या विधानाला जगन्मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

साईबाबांचं जन्मगाव शोधणं याला कुणाचा फारसा आक्षेप असण्याचे कारण नाही़. मात्र जन्मगावाबरोबर त्यांचं नाव व त्यामागोमाग चिकटलेली जात पुढे येणे असा प्रकार घडू शकतो. साईबाबांच्या देवत्वाला पुन्हा मनुष्याच्या रांगेत घेऊन जाण्याची, ते एखाद्या विशिष्ट जाती-धर्माची मालमत्ता होण्याची भीती याच्या परिणामी संभवते. त्यांच्या सर्वधर्मसमभावाच्या शिकवणुकीला नख लावण्यासारखंच हे आहे.

अनेक श्रद्धास्थाने असतांना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून सर्व स्तरातील, धर्मातील, पंथातील भाविक येथे नतमस्तक होतात़. हे शिर्डीचे वेगळेपण आहे. बाबांनी आपला धर्म, जात, नाव कधी उघड केले नव्हते. त्यांना उघड करायचे असते तर त्यांच्या हयातीतच त्यांनी याबाबत वाच्यता केली असती तसेच त्यांच्याविषयीचा व त्यांच्या पूर्व परवानगीने लिहिण्यात आलेला दाभोळकर लिखित ‘श्री साईसत्चरित्र’ हा ग्रंथ साईभक्त, संस्थान व ग्रामस्थ प्रमाण मानतात़ त्यातही याबाबत स्पष्टता नाही.

साईबाबांचे पाथरीशी संबंध जोडणे हे पूर्णत: तर्कावर आधारित आहे. भुसारी कुटुंबातील एकजण घर सोडून गेला तेच साईबाबा असावेत असा दावा दोन पिढ्यानंतर पुढे आला होता. बाबांच्या हयातीत व नंतरच्या पन्नास वर्षातही कोणी इकडे फिरकले नाही. विशेष म्हणजे ज्यांचा गुरू म्हणून उल्लेख केला जातो ते बाबा महाराज देशमुख समजलेल्या माहितीनुसार १८०३ सालीच समाधिस्त झाले. त्यामुळे ते बाबांचे गुरू असणे संभवत नाही. गुरूचाच दावा खोटा असल्याने बाकी तर्कही विश्वासार्ह नाहीत असे म्हणता येईल.

एखाद्या संताच्या शिकवणुकीला त्यांच्या जाण्यानंतर शंभरीच्या तोंडावर नख लावणे म्हणजे केवळ कृतघ्नपणाच नाही तर समाजहिताला बाधा पोहचवण्यासारखे आहे.

प्रमोद आहेर

(लेखक दै. लोकमतचे शिर्डी प्रतिनिधी असून ‘शिर्डी गॅझेटिअर’, ‘अनटोल्ड स्टोरीज’ या पुस्तकांचे लेखक आहेत)

Updated : 6 Oct 2017 1:50 AM IST
Next Story
Share it
Top