|| म्हारो प्रणाम ||
X
१९८० ची गोष्ट आहे. मुंबईची NCPA ची केसरबाई केरकर स्कॉलरशिप मला नुकतीच जाहीर झाली होती. मुळात जयपूर गायकी आणि त्यात किशोरीताईंच्या व्यक्तित्वाने मी अत्यंत प्रभावित झाले होते. त्यामुळे माझी पावले आपोआप त्यांच्या दारापाशी मला घेऊन गेली .
माझ्या प्रथम गुरू श्रीमती विजया जोगळेकर-धुमाळे मला ताईंकडे घेऊन गेल्या. सकाळची १० ची वेळ होती. ताईंची वाट पाहत मी, माझे बाबा आणि विजयाजी बसलो होतो . शेजारच्याच खोलीतून एक मधुर घंटानाद आणि अगरबत्तीचा मंद सुगंध येत होता. माझ्या मनात भय, जिज्ञासा, आशंका, आतुरता आणि अनेक प्रश्न... माझ्या मनाच्या याच अवस्थेत ताई कधी माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या मला समजलं सुद्धा नाही... एखाद्या भक्तासमोर जर त्याचा देवच येऊन उभा ठाकला तर जशी अवस्था होईल तसंच काहीसं माझ्या सोबत झालं. एकदम साधी सुती साडी, डाव्या हातात एक काळ्या रंगाचं घड्याळ, उजव्या हातात जराश्या झिजलेल्या पण सोन्याच्या चार पातळ बांगड्या, बोटात एक सुंदर घुंगरुवाली अंगठी, कानात सोन्याच्या रिंग्स, डोळ्यांवर चष्मा, विलक्षण चुंबकीय नजर, पायांची तत्पर चाल आणि पूजनीय चरणकमल ...
आम्ही सर्वजण मिळून ताईंच्या music room मध्ये गेलो. पाहते तर तिकडे संगीततज्ञ वामनराव देशपांडे सुद्धा बसले होते. ताईंनी मला गाण्याचा हुकूम केला. एकंदरीत वस्तुस्थिती बघून मी 'सा' लावायला गेले खरे आणि काय माहीत माझ्यामध्ये अचानक कुठून धाडस आलं. १० मिनिटं मी गायले. त्यानंतर ताईंनी काही प्रश्न विचारले. मग वामनरावजींनी काही प्रश्न विचारले. दोघांनीही आपापसात चर्चा केली. आणि त्याचं फलित ताईंचा निरोप आला "ये उद्यापासून !"
दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ पासून माझी तालीम सुरू. दिलेली वेळ पाळण्यात ताई फार कडक. ९ म्हणजे ८.५९ नव्हे किंवा ९.०१ नव्हे. ९ म्हणजे ९. त्या वेळेस 'सा' लागलाच पाहिजे. सुरीला आणि मन नेईल तिकडे जाणारा गळा, अद्भुत रागांकडे एका विशिष्ट नजरेने पाहणाऱ्या ताई ! स्वयंभू गायकीच्या निर्मात्या ताई ! त्यांच्या गळ्यातून निघालेली काही स्वरवाक्य ना या आधी कोणी गायली ना विचार केला. पूर्णतः नवनिर्मित! रागप्रस्तुती करताना जणू नायगरा धबधब्याप्रमाणे सांगीतिक विचारांनी श्रोत्यांशी मुकाबला. अत्यंत जटिल, सूक्ष्म, भावप्रवाही आणि तितकीच उत्कट प्रस्तुती. सात सुरांवर प्रचंड नियंत्रण आणि तितकंच प्रेम. मुळात संगीत हे केवळ शास्त्र, विद्या किंवा कला असा 'विषय' म्हणून त्याकडे न पाहता संगीत म्हणजे आत्मानंद, अध्यात्म आणि निर्गुण सेवा अशा पातळीवर त्यांनी नेऊन ठेवलं. किंबहुना त्याचं प्रात्यक्षिकच त्या दरवेळी त्यांच्या गायनातून दाखवायच्या.
मी ताईंना 'यमन' होताना पाहिलं आहे, 'बहादुरी तोडी' होताना पाहिलं आहे, 'संपूर्ण मालकंस' होताना पाहिलं आहे. आणि त्याच वेळेस स्वतः सुद्धा 'यमन', 'बहादुरी तोडी' किंवा 'संपूर्ण मालकंस' होताना अनुभवलं आहे. ताई जेव्हा रागाच्या भावावस्थेत तल्लीन व्हायच्या तेव्हा आजूबाजूचे श्रोतेच नाही तर अगदी निर्जीव वस्तू देखील त्या भावसागरात डोलताना मला दिसल्या आहेत. जणू काही संपूर्ण जग हेच त्या रागाशी एकरूप झालं आहे. ताईंना स्वरांपलीकडे जाणारा राग खुणवायचा. स्वर, शब्द, आकृती या पलीकडे काय असेल याचं त्यांना नेहमी कुतूहल. आणि म्हणूनच अनेक जुने ग्रंथ वाचून त्यांनी या रागांचा अभ्यास केला. शेकडो वर्षांपूर्वी हे राग कसे गायले जायचे? त्यांचं तेव्हाचं स्वरूप कसं असेल? त्या रागाचं वातावरण कसं असलं पाहिजे? आणि प्रत्येक वेळेस त्याच रागाचं तेच वातावरण हुकमीपणे कसं निर्माण करता येईल? या सर्व गोष्टींचा ताईंनी अगदी बारकाईने अभ्यास केला होता. कदाचित हेच कारण असावं की ताईचं गाणं हे जेवढ एकीकडे संगीत विद्वानांना खुणवायचं तेवढंच ते संगीतातलं फारसं काही न कळणाऱ्या श्रोत्याला सुद्धा धरून ठेवायचं. Emotions आणि Intelligence या दोहोंना कवेत घेणारं होतं ताईचं गाणं .
त्या दिवसांमध्ये कधी कधी मला सर्दी-खोकला सारखा व्हायचा. ताईंसोबत तानपुऱ्यावर साथसंगत करायला मला जावं लागे. कित्येकदा तर असंही व्हायचं की संध्याकाळी कार्यक्रम आणि सकाळी माझी तब्येत खराब. अशा वेळेस त्या 'ताई' नसायच्या 'आई' असायच्या. स्वतः त्या माझ्यासोबत डॉक्टरकडे यायच्या. घरून आणायला आणि घरी पोहोचवायला टॅक्सी पाठवायच्या. कधी मला त्या नेलपॉलिश लावायच्या तर कधी एखादी नवी साडी नेसवायच्या.
ताईंच्या स्वरात मला नेहमी एक गूढता दिसली. जणू काही त्या उत्कटतेने सांगतायत "हे बघा हे असं आहे. त्याला असं बघा... या बाजूनेही बघा". त्या गाण्यातला भाव मनाच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्याला सहज स्पर्शून जायचा. आणि म्हणूनच मला वाटतं की ताईचं गाणं वेगळं होतं. म्हणूनच त्या जाऊनसुद्धा आज माझ्यात आहेत. त्या गेल्या नाहीत. त्या कधीही जाणार नाहीत. ते एक तत्व आहे. मन शांत करून २ मिनिट बसलं की तो 'भिन्न षड्ज' नक्कीच तुमच्या पंचज्ञानेंद्रियाला जाणवेल. मी तेव्हा सुद्धा हेच म्हणायची आणि आताही हेच म्हणेन... "म्हारो प्रणाम... "
- आरती अंकलीकर-टिकेकर
(शब्दांकन : अमित जांभवडेकर)