पौरोहित्याची पोलखोल
X
डॉ. आंबेडकरांनी पुरोहितांकडून चाललेल्या शोषणाबद्दल काय सांगितले? ज्या भगवान गौतम बुद्धाने हिंदू धर्माचे फार सुंदररीत्या, सत्यावर आधारित शुद्धीकरण केले. त्याने चातुर्वर्ण्य नाकारले, मूर्तीपूजा नाकारली कारण मूर्तींच्या भोवतीच धर्मातील सारे अनाचार एकवटणारा पुरोहित वर्ग गोळा होतो. मग जनसामान्यांच्या धार्मिक शोषणाची यंत्रणा कार्यरत होते. मूर्तीच्या आधारे पुरोहित वर्ग अतींद्रीय शक्ती, अतींद्रीय जग, पाप-पुण्य, कर्मकांड, नवस, पूजा, स्वर्ग, नरक, चांगलेवाईट फळ या काल्पनिक जगात मोहमयी जगात भक्तांना, विशेषत स्त्रियांना पारतंत्र्यात ढकलतो. आपण एका धार्मिक दहशतवादी लोकांच्या कब्जात आहोत याचेही भान राहात नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की खरा धर्म मंदिरात नाही, धार्मिक उत्सवात नाही. तर माणसाच्या प्रामाणिकपणात आणि सहृदयतेत आहे. बुद्धधर्म हे हिंदू धर्माचे विशुद्ध रूप आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा मार्ग लाखो लोकांना दाखवला. त्यांचे भारतातील पुरोहिताविषयीचे विचार आजही महत्त्वाचे आणि मार्गदर्शकही आहेत. त्याचे आपण चिंतन करूया.
पुरोहितशाहीचे निर्मूलन
1) हिंदूंमधल्या पुरोहितशाहीचे निर्मूलन झाले पाहिजे. किमान पुरोहितपद वंशपरंपरागत नसावे.
2) हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुरोहितपदासाठी पात्र मानले पाहिजे.
3) सरकारने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आणि त्याला तो व्यवसाय करण्याची सनद असल्याशिवाय पौरोहित्य करता येणार नाही अशी कायद्यामध्ये तरतूद करावी.
4) सनद नसलेल्या पुरोहिताने केलेला कोणताही समारंभ विधिसंमत मानण्यात येऊ नये. तसेच सनद नसताना पौरोहित्य करणे शिक्षापात्र गुन्हा ठरविण्यात यावा.
5) पुरोहित सरकारी नोकर असावा, नैतिकता, श्रद्धा, उपासना यांसदर्भात तो सरकारद्वारे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असावा. तसेच त्याला याव्यतिरिक्त इतर नागरिकांप्रमाणे देशाचे कायदे बंधनकारक असावेत.
6) राज्याच्या गरजेनुसार आयसीएसच्या संदर्भात असते त्याप्रमाणे पुरोहितांची संख्या मर्यादित असावी.
डॉ. बाबासाहेबांनी सुचवलेले हे विचार काहींना जहाल वाटतील आणि क्रांतिकारकही वाटतील. भारतात प्रत्येक व्यवसायाचे, पेशाचे कायद्याने नियमन केले आहे. आपल्या पेशाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इंजिनीअरला प्राविण्य दाखवावे लागते. डॉक्टरला, वकिलाला प्राविण्य दाखवावे लागते. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांना फक्त देशातल्या दीवाणी व फौजदारी कायद्याचेच पालन करून चालत नाही तर त्यांच्या व्यवसायानी निर्धारित केलेल्या नैतिकतेच्या विशेष नियमांचेही पालन करावे लागते.
पुरोहिताचा एकुलता एक पेशा असा आहे की ज्याला नैपुण्याची गरज नाही. हिंदू पुरोहितांचा एकच व्यवसाय असा आहे की ज्याला कोणताही कायदा लागू नाही. मानसिकदृष्ट्या पुरोहित वेडसर असू शकतो. शारीरिकदृष्ट्या तो गरमी, परमा अशा घाणेरड्या रोगाने ग्रस्त असू शकतो. नैतिकदृष्ट्या पूर्णपणे अधोगतीला गेलेला असू शकतो. परंतु तरीही हिंदू मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन हिंदू देवाची आराधना आणि विधिवत समारंभात पौरोहित्य करण्यास तो पात्र आहे. हिंदूंमध्ये हे सर्व शक्य होते कारण पुरोहित होण्यासाठी तो त्या जातीत जन्माला येणे एवढेच पुरेसे आहे. हिंदू धर्मातील पुजारी वर्गाला ना कायदा लागू आहे ना नैतिकतेचे बंधन. त्यामुळेच हे संपूर्ण पुरोहित प्रकरण तिरस्करणीय झाले आहे. ते कर्तव्य जाणत नाहीत. त्यांना केवळ हक्क आणि विशेष अधिकारच माहीत आहेत. ते म्हणजे ईश्वराने लोकांच्या मानसिक आणि नैतिक अवनतीसाठी सोडलेली एक कीड आहे असे वाटते. मी वर सांगितल्याप्रमाणे पुरोहित वर्गाला अशा कुठल्यातरी कायद्याच्या नियंत्रणाखाली आणलेच पाहिजे. त्यामुळे त्यांना उपद्रव करण्यास तसेच लोकांची दिशाभूल करण्यास प्रतिबंध होईल. तो पेशा सगळ्यांसाठी खुला केल्यामुळे त्याचे लोकशाहीकरण होईल. ब्राह्मणशाही तसेच जातसंस्था संपवण्यासाठी त्याची खात्रीने मदत होईल. ब्राह्मणशाही हे विष असून त्याने हिंदू धर्माचे वाटोळे केले आहे. तुम्ही ब्राह्मणशाही संपवली तर हिंदुत्व वाचवण्यात तुम्हाला यश येईल. या सुधारणेला कुणाचाही विरोध असू नये. आर्यसमाजी लोकांनीही त्याचे स्वागत केले पाहिजे. ही केवळ त्यांच्या गुणकर्माच्या तत्त्वांच्या अमलबजावणीची योजना आहे.
डॉ. आंबेडकरांचे हे विचार केवळ उद्बोधक नाहीत तर अनुकरणीय आहेत. प्रथमत जगभरातल्या विविध लोकांमध्ये रूढ असलेल्या श्रद्धा, सवयी, नीतीमूल्ये आणि जीवनविषयक दृष्टिकोन यांच्या संदर्भाने त्यांच्यात बऱ्याचदा तफावत असते. परंतु जेव्हा मूलनिवासी जागे होतात व हक्क, कर्तव्ये त्यांना समजतात तेव्हा आतापर्यंत आपले शोषण कोणाकडून होत होते, ते त्यांच्या लक्षात येते. मग संघर्ष उभा राहातो. तो कडवा असतो. ज्यांनी लुबाडले त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी शेवटी लढा जिंकतो तो सत्याग्रही.
हीच गोष्ट भारतात, राज्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी घडली आहे. करवीरच्या अंबाबाई मंदिरातील भ्रष्ट पुजाऱ्यांना पंढरपूरच्या बडव्याप्रमाणे हाकलावे लागत आहे. जनआंदोलनाला हिंसक वळण लागू नये असे वाटत असेल तर शासन, शासनाचे प्रतिनिधी किंवा धर्माच्या ठेकेदारांनी जनतेच्या बाजूने उभे राहावे. आंदोलन म्हटले की भांडवली करणारे बुद्धिभेद करून आंदोलन मोडण्याची सुपारी घेणारे असणारच पण मूठभर आमीषासाठी जनद्रोहाचे पाप करायेच का? याचा विचार आंबे पाडणाऱ्यांनी करावा. नाहीतर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा.
डॉ. सुभाष देसाई