धर्मकारण करा ‘पुरोहितां’ना वगळून
X
सामाजिक सुधारणा या संथगतीने होत असतात. प्रथम जनजागृती, प्रबोधन या वैचारिक मार्गाने आणि आचरणाने विचार तळागाळात रुजतो. यासाठी महात्मा गांधीनी बहिष्कार आणि असहकार ही अहिंसक शस्त्रे वापरली त्यामुळे ब्रिटिशांची भारतावरची पकड ढिली झाली. असहकाराचा ठराव गांधींनी खिलाफत चळवळीत मांडला. शांततामय असहकार चालू शकेल की नाही याविषयी काहींना शंका होती. ठरावाच्या गुणदोषांवर चर्चा झाली. शंका दूर झाल्या. मग ठिकठिकाणी सभा होऊन तो विचार स्वीकारला गेला. १९२०च्या सप्टेंबर महिन्यात कलकत्यात राष्ट्रीय सभेचे खास अधिवेशन भरले. लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ठराव देशभर मंजूर झाला. प्रतिनिधी जर उदार मनाचे, जनतेच्या हक्कांना जपणारे आणि प्रामाणिक असतील तर आंदोलन यशस्वी होते. त्यासाठी जनतेत स्वातंत्र्य वृत्ती, स्वाभिमान व एकजूट असली पाहिजे. ब्रिटिशांशी असहकार पुकारणे, बहिष्कार घालणे हे सर्वांचे राष्ट्रीय ध्येय बनले. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून करोडो नागरिक मुक्त झाले, स्वातंत्र झाले.
याचसारखा लढा धार्मिक स्वातंत्र्यासाठी देशभर करावा लागणार आहे. पुरोहितांची मक्तेदारी ब्रिटिशांपेक्षा वाईट, घातक आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आपल्याच देशबांधवांचे आर्थिक शोषण करणारी आहे. आजच्या काळात बहुजन समाजात धार्मिक स्वातंत्र्य, स्वाभिमान व एकजूट निर्माण होणे गरजेचे आहे. देशभर शोषण करणाऱ्या पुरोहित वर्गावर बहिष्कार, त्यांच्याशी असहकार, त्यांनी लादलेल्या, सांगितलेल्या पूजा-अर्चा, नवससायास, व्रते, दक्षिणा, देणगी, स्वर्गाची लालूच, नरकाची भीती, पाप-पुण्याच्या कल्पना साऱ्या फेकून द्या. मनुस्मृती, पुराणे ह्मणजे हिंदू धर्म नव्हे. आम्हीही हिंदू आहोत पण आमचा धर्म ब्राह्मणी धर्म नाही. आमच्या हिंदू धर्मात चातुर्वर्ण्य नाही. हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असा भेद नाही. मग त्याला ब्राह्मणेतरांचा शुद्ध हिंदू धर्म ह्मटले तरी चालेल. लोक देवाच्या नावावर शोषणव्यवस्था निर्माण करतात. बहुजनांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. त्याआधारे बहुजनांच्या दुर्बल मनांना गुलाम बनवतात.
''श्राद्ध करू नका''
आपल्या मृत पूर्वजांच्या उपकारांबद्दल जरूर कृतज्ञता व्यक्त करूया पण पूर्वजांना कावळेही बनवू नका. पुण्यतिथीला विविध उपक्रमांद्वारे त्याची स्मृती ठेवा. नवजात बालकाचे नामकरण, विवाह, गृहप्रवेश यासाठी पुरोहितांची गरज नसते. सर्वज्ञ ईश्वराला फक्त संस्कृत भाषाच कळते, हे खरे नाही. हृदयापासून जे कराल, जी प्रार्थना कराल ती त्याला पोहचते अशी श्रद्धा ठेवा. विशिष्ट मणी, खडे, रत्ने, ताईत घालणे सोडा. त्यावर आपल्या जीवनातील यशापयश अवलंबून नसते. त्याचा कोणताही कार्यकारण संबंध नसतो. संकट टाळावे ह्मणून अशा वस्तूचा काही संबंध नसतो.
वास्तुशास्त्राच्या नावावर पुरोहितांनी नवनवीन फंडे शोधले आहेत. घराचे दरवाजे, खिडक्या, स्वयंपाकघर, स्नानगृह यांच्या जागा नि दिशा निसर्गाला सुयोग्य ठेवा ह्मणजे हवा, प्रकाश, प्रसन्नता, सुरक्षितता राखली जाईल. नगर परिषदेचे नियम पाळा. कोणी तुम्हाला वास्तुदोष आहे, शांती करायला हवी अशा थापा मारून तुमचे भावनिक आणि आर्थिक शोषण करतो; त्याला बळी पडू नका.
प्रत्येक गावागावात बहुजन समाजाच्या घामावर कष्टांवर मंदिरे उभी झाली. पण त्या धर्मवृक्षावर पुरोहित नावाचं बांडगुळ निर्माण होते, तेच त्या साऱ्या संपत्तीचा ताबा घेते, बहुजनात फूट पाडते आणि स्वत:ला मंदिराचा, मूर्तीचा हक्कदार मालक बनते. यापुढे त्यांना हाकला. पगारी पुजारी नेमा. बहुजनांतील गुरव, भाट यांच्याकडे पुजारीपण द्या. व्यवस्थापन तुमच्या हाती घ्या. धर्माच्या नावाने येणारा पैसा ग्रामसुधारणेसाठी वापरा. व्यवस्थापनातील व्यक्ती चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, विज्ञानवादी, निस्वार्थी, सामाजिक बांधिलकी मानणारी, कायद्याचे पालन करणारी असावी. गावातील आरोग्य, शिक्षण इ. सामाजिक क्षेत्राचा विकास मंदीर व्यवस्थापन करू शकते. मंदीर त्याची शिल्पकला, वास्तुकला, मूर्तिकला हा बहुजनांचा महान सांस्कृतिक वारसा आहे, तो जतन करा.
कोल्हपूरचा द्रष्टा राजा छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी बहुजन समाजाला स्वानुभवावर आधारित आदेश दिला होता. राजर्षी शाहू महाराज यांनी १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे दिलेले भाषण उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ब्राह्मणांकडून पूजा करविणे व त्यांच्या हाताने धर्मकृत्य चालविणे सोडून दिले पाहिजे. नाहीतर ब्राह्मणांच्या श्रेष्ठपणाच्या कथा आमच्या लोकांच्या कानी येत राहतील. ब्राह्मणांना सोडून आमची कामे आम्हीच चालवावीत असे माझे ठाम मत आहे. ब्राह्मणांची धार्मिक दादागिरी तुटून पाडल्याशिवाय देशाचा उद्धार होऊ शकणार नाही. ब्राह्मण पुजारी व ब्राह्मणांकडून धर्म ऐकण्याचे सोडणे यातच बहुजन समाजाचे भले आहे!’
- डॉ. सुभाष देसाई