Home > मॅक्स कल्चर > का बघायचा न्यूटन ?

का बघायचा न्यूटन ?

का बघायचा न्यूटन ?
X

जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश म्हणून भारत ओळखला जातो. सार्वत्रिक निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! या उत्सवात अनेक रंग,बेरंग बघायला आणि अनुभवायला मिळतात.आणि जेव्हा या सार्वत्रिक निवडणूक या संवेदनशील भागात होणार असेल तर मग विचारायलाच नको. त्यात तो संवेदनशील भाग जर 'नक्षलग्रस्त' असेल तर मग विचारायलाच नको. याच प्लॉटवर आधारित असलेला आणि भारतातर्फे 'ऑस्कर' साठी पाठवलेला #न्यूटन हा सिनेमा बघितला. हा सिनेमा केवळ मनोरंजन करत नाही तर प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजनही घालतो.

छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात निवडणूक होणार असते. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून कोणी जायला तयार नसतो. चित्रपटाचा नायक असलेला न्यूटन (राजकुमार राव) हा 'रिजर्व' कॅटेगरीमधला उमदा तरुण या भागात जायला तयार होतो. अतिशय उत्तम कथानक आणि त्यालाच साजेसं चित्रीकरण यात अनुभवायला मिळत. आपण बघत असलेला कुठलाही सिनेमा हा खरं तर दिग्दर्शकाच्या नजरेतून बघत असतो, पण हा सिनेमा आपण आपल्याच नजरेतून आणि आपल्याच भावविश्वातून बघतो आहोत असं वाटायला लागत.आणि त्याच क्षणी आपणसुद्धा त्या कथानकाचा भाग बनतो आणि पटकथेसोबत आपला प्रवास सुरु राहतो,अगदी सिनेमा संपला तरीही.

आदिवासी समूहाबद्दल आपण कालसुद्धा अनास्था दाखवली आणि आजही दाखवतो आहोत. #स्किलइंडिया, #डिजिटलइंडिया, #मेकइनइंडिया या सगळ्या योजनांमध्ये आदिवासींच्या भविष्याचा विचार आपण आजही करत नाही. देशाच्या तथाकथित 'विकास' या संकल्पनेत आपण सगळ्यात पहिला बळी दिलाय तो इथल्या आदिवासींचा. धरण बांधायचं,आदिवासी विस्थापित. कोळसा खाण खोदायची,आदिवासी विस्थापित. परदेशी कंपनीला प्रोजेएक्ट बनवायचाय,आदिवासी देशोधडीला. या सगळ्या संघर्षांतून उभं राहिलेलं नक्षलवादी आंदोलन आपण समजून घेतलं का? मार्क्स,माओ,लेनिन,स्टालिन हे काय केडर घ्यायला या देशात आले नव्हते. आपणच आपल्या माणसांशी दुर्व्यवहार केला,त्यांच्याशी संवाद साधला नाही. अनेक पद्धतीने आपण विकासाच्या इमल्याच्या पायाशी आदिवासींना गाडलंय. ज्यांना निवडणूक कशाशी खातात हे माहित नाही, ज्यांना उमेदवार काय असतो हे माहित नाही, ज्यांना वोटिंग मशीन काय आहे हे माहित नाही, त्या वोटिंग मशीनच बटन दाबून आपल्याला काय मिळेल याचा थांगपत्ता नाही, अशा आदीवासी-अशिक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकुठे आहे का काही कार्यक्रम? उलट त्यांचा प्रवाह हा हजारो वर्ष जुना आहे, आपल्यापेक्षा किती तरी प्रगत,कितीतरी पुरोगामी. आपण मागासलेले आहोत,कृतीनेही आणि विचारांनीही.

हा सिनेमा तुम्हाआम्हाला या सगळ्यांची केवळ जाणीव करून देतो, आदिवासीच्या भावविश्वात तुम्हाला हा सिनेमा घेऊन जातो आणि तिथेच सोडतो. आदिवासी समुदायाचा लोकशाहीचा 'उत्सव' ,त्यात कर्तव्यदक्ष असेलला निवडणूक अधिकारी,त्याचे इतर सहकारी, तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि आदिवासी बांधवांचा अस्सल नैसर्गिक अभिनय आपल्यामनात घर करून जातो. कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही. राजकुमार राव आपली भूमिका अक्षरश: जगलाय.पात्रासाठी ज्या ज्या बारीकसारीक गोष्टी आवश्यक आहेत,त्या सगळ्या या कलाकाराने साधल्या आहेत. मलको या आदिवासी मुलीची भूमिका साकारणाऱ्या अंजली पाटीलने तर आपल्या छोट्याश्या भूमिकेत जबरदस्त असा अभिनय केलाय. असाच अभिनय पंकज त्रिपाठी यांनीही केलाय.भारतीय सैन्याचा आदिवासी समुदायाशी असलेला व्यवहार यात पंकज त्रिपाठी यांनी मोठ्या खुबीने दाखवलाय. सगळीच पात्र कौतुकास पात्र आहेत. सिनेमॅटोग्राफी तर अप्रतिम,नवख्या स्वप्नील सोनावणे याने सिनेमॅटोग्राफीमध्ये घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक फ्रेममध्ये तुम्हाला कथानकाचा अर्क बघायला मिळतो,तुमच्या मनाला ती फ्रेम भावते आणि तुम्ही सिनेमाच्या रीळ सोबत पुढे पुढे सरकू लागता.पुढे पुढे सरकताना मधेच तुम्हाला हास्यविनोद अनुभवता येतात,मधेच तुम्ही गंभीरदेखील होता. असा हा अद्भुत सिनेमा ऑस्करला जातोय, पुरस्कार मिळेल न मिळेल हा पुढचा विषय,पण भारतीय सिनेमा विचारी बनतोय,सर्वांगाने विचार करतोय,वेगळ्या धाटणीचे कथानक घेऊन येतोय आणि कलाकार देखील पूर्ण ताकतीने नवनवीन संकल्पना वास्तवात आणू बघतायेत,हेही नसे थोडके!

Updated : 3 Oct 2017 2:40 PM IST
Next Story
Share it
Top