Home > मॅक्स कल्चर > लहरें रोकी जाती हैं, तो दरिया सैलाब होता है

लहरें रोकी जाती हैं, तो दरिया सैलाब होता है

लहरें रोकी जाती हैं, तो दरिया सैलाब होता है
X

हार्वर्ड विद्यापीठातील जोसेफ ने या प्राध्यापकाने ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ आकर्षण किंवा समजुतीने जनतेचे मनपरिवर्तन करणारी शक्ती. ती शक्ती संस्कृती, राजकीय मूल्ये आणि परराष्ट्रधोरण ठरविण्यामध्ये प्रभावीपणे वापरली जाते. १९९० साली त्याने ‘Bound to Lead : The changing nature of American Power’ या पुस्तकात हा शब्द वापरला. लष्करी शक्तीचा कठोर पर्याय याऐवजी आता सॉफ्ट पॉवर प्रभाव टाकते असे राजकीय पक्षांना पटू लागले आहे. भारत त्याला अपवाद नाही. ज्यांच्या डीएनएमध्ये शौर्य नाही, बलिदान नाही... ज्यांच्या मनगटांना कधी तलवार पेलली नाही, ज्यांना स्वातंत्र्य संग्रामाची झळ पोहचली नाही त्यांनी राजकीय इतिहास लिहायला घेतला की तो सत्याशी सुसंगत असेलच कसा? आज भारतात चालले आहे ते सत्यशोधन नव्हे. मुळात इतिहास नव्याने समाजापुढे आणणे याचा अर्थ केवळ पुनर्मुद्रण नव्हे. ते आहे सत्यशोधन. इतिहासाच्या डफावर चार थापा मारल्या, चार पैसे इकडून तिकडून मिळवले की आमचे हरिकथाकार आणि कादंबरीकारही अंगावर इतिहासकार नावाची झूल पांघरतात.

आता तंत्रज्ञानाने काम सोपे केले आहे. जुन्या, जीर्ण दस्तावेजांचे पुनर्मुद्रण काना, मात्रा न बदलता करता येते, नवे आकर्षक मुखपृष्ठ मूळ प्रस्तवना थोड्याफार बदलाने छापली की संपादक म्हणवता येते. याला काही अपवाद आहेत. गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठात एक छान कार्यक्रम झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेला १८५४ चा कोल्हापूर संस्थानचा स्टॅटिस्टिकल रिपोर्ट शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राने पुनर्मुद्रित केला. त्या निमित्ताने ख्यातनाम अर्थ व कृषीतज्ञ डॉ. यशंवतराव थोरात यांनी मूलभूत विचार मांडले. इतिहासात सत्याशी तडजोड नसते हे त्यांनी ठासून सांगितले. समाजात हरिकथाकार आहेत, इतिहासकार काही कमी नाहीत पण पुराव्यानिशी सिध्द करणे हे काम इतिहासकार करतो. संशोधनात प्रायमरी डेटावर पकड हवी तर विषय कळतो. अनेक विद्यापीठातील विद्यार्थी सेकंडरी डेटावर अधिक भर देतात असे आढळते.

आपण इतिहास कसा पाहतो? एखादा आपल्याला दाखवतो तसा पाहतो. आपल्याला जसा दिसतो, तसा पाह्यला हवा. भारतीय इतिहासाच्या संदर्भात हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा आहे. बहुसंख्य समाज अशिक्षित, अडाणी होता. त्याचा गैरफायदा अनेकांनी उठवला. ब्रिटीस कसे मागे राहतील? पेशवे असोत नाहीतर स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताधारी सर्वांनी इतिहास त्यांना हवा तसा लिहिला. काही आज सत्तारूढ नेत्यांच्या अमिषावर त्यांना हवे तसे इतिहासाला विकृत वळण देतात.

डॉ. यशवंतराव थोरातांनी उपस्थित केलेला प्रश्न मला महत्त्वाचा वाटला. आपल्याला आपला देश कसा हवा आहे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष की लोकशाहीवादी? पण आज लोकशाहीमधली निवडणुकीसारखी साधने हाताशी धरून लोकशाहीविरोधी प्रवृत्ती जोपासल्या जात आहेत. लोकशाही आपल्याला बोलण्याचा हक्क देते हे जितके खरे, तितकेच ऐकण्याची जबाबदारीही सोपविते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण घटनात्मक मूल्ये जपली नाहीत तर राज्यघटना बरखास्त करण्याची वेळ आल्या खेरीज राहणार नाही, असा इशारा १९५० मध्ये डॉ. आंबेडकर यांनी देऊन ठेवला आहे.

सत्ता इतिहासाची रचनाच बदलते

मेजर ग्रॅहमप्रमाणे ब्रिटिशांनी काही रिपोर्ट बनवले. आज इतिहासकार तो करवीर संस्थानाचा आद्य संदर्भ ग्रंथ मानतात. परंतु हे एकमेव सत्य मानता येईल का? अनेक स्रोतांकडून माहिती संकलन करून ती संपादित करण्याचे मोलाचे काम मेजर ग्रॅहम यांनी केले हे मान्य, पण ब्रिटिशांना अखंड हिंदुस्थानवर राज्य करण्यसाठी जमवलेली सांस्कृतिक, भौगोलिक, शेती, शिक्षण, उद्योग, रुढी-परंपरा, धर्म या विविध क्षेत्रांतील माहिती आजही नवी वाटते. १८५७ चा स्वातंत्र्याचा पहिला लढा विसरता येत नाही. त्यावेळी देश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्यखाली होता. बंडानंतर ब्रिटिशांकडे संपूर्ण सत्ता गेली नाही तर एका कंपनीच्या ताब्यात पूर्ण देश जाण्याचे उदाहरण घडले असते.

देश आता अदानी, अंबानी, टाटा यांच्या ताब्यात (भाजप- संघ नावाच्या कंपनी मार्फत देशाचा ताबा) जशी राजवट बदलते तसा इतिहास वेगवेगळा रंगवला जातो. संघाच्या अंजेड्यावर जे पूर्वी देशभक्त मानले गेले ते आता प्रथम वादग्रस्त आणि नंतर देशद्रोही रंगवले जात आहेत. व्यक्तीने कोणता धार्मिक आचार करायचा, त्याने काय खायचे, त्याने काय बोलायचे याचे स्वातंत्र्य संघाने काढून घेतले. नवनिर्वाचित राष्ट्रपती रबरी शिक्क्यापेक्षा वेगळे काय बनणार? नवा भारत घडवायचा म्हणजे कोणता? राज्यघटनेप्रमाणे की मनुस्मृतीप्रमाणे?

यावर एकच उपाय इतिहास -तुम्हाला आवडो, न आवडो - जसाच्या तसा मांडा. सत्य आहे ते सत्य म्हणून सांगा. त्याचे स्पष्टीकरण वेगळे होऊ शकते हे मान्य. पुढील पिढीसाठी हे करावे लागेल. भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर देशाचे भविष्य काय? जर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही तत्त्वे नव्या पिढीने जपली नाहीत, हिंदू - मुस्लमान एकत्र राहिले नाहीत तर धर्मनिरपेक्ष समाज राहणार नाही. देशाची शकले उडतील.

जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे तर...

किसी को कोई यह कैसे बताए, हवाएं और लहरें कब किसी का

हुक्म सुनती नहीं हैं, हवाएं, हकिमो की मुठ्ठियों में,

हथकडी में, कैदखानों में नहीं रुकती.

ये लहरें रोकी जाती हैं, तो दरिया

कितना भी हो पुरसुकून, बेताब होता है

और इस बेताबी का अगला कदम, सैलाब होता है.

किसी को कोई यह कैसे बताए...

डॉ. सुभाष देसाई

Updated : 18 Aug 2017 11:45 AM IST
Next Story
Share it
Top