टिळकांना गीतेचा अर्थच कळला नाही?
X
बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजिक गणेशोत्सव सुरू केला असा खोटा इतिहास लिहिला गेला. वास्तविक भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर व नानासाहेब खाजगीवाले यांनी १८९२ साली पुण्यात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मिरवणुकीने विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. टिळकांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी त्यांच्या ‘केसरी’त अग्रलेख लिहून या उपक्रमाचे कौतुक केले. म्हटलं तर हा किरकोळ वाद ज्याचे त्याला श्रेय देऊन मिटवता आला असता. पण कटू सत्य पचवता येत नाही. महात्मा फुलेंचे निधन झाले ती बातमी केसरीने न छापण्याचा कद्रूपणा दाखवलाच. मात्र जेवत असतानाच टिळकांच्या निधनाची बातमी कळल्यावर- ‘मरणांती वैराणी’- मृत्यूनंतर वैर संपते- अशा भावनेने जेवणाचे ताट दूर करणारे छत्रपती शाहू महाराज! टिळकांच्यात मोठे गुण असले तरी जाती वर्चस्वाची विकृती त्यांच्यात नव्हती, असे म्हणता येणार नाही.
टिळकांच्यातील दोष, उणिवा त्यांच्याच समाजातील लोकांनी काढल्या आहेत. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी कर्मयोगशास्त्र ऊर्फ ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. पण "टिळकांना गीताच समजली नाही आणि त्यांनी त्याचा पूर्ण चुकीचा अर्थ लावला" असे भारतभर प्रसिद्ध पावलेले, करवीर पीठाचे शंकराचार्य मारुलकरशास्त्री यांनी ग्रंथरूपाने साधार मांडले. त्याचप्रमाणे विष्णुशास्त्री बापट, वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री हुपरीकर यांनीही स्वतंत्र ग्रंथाद्वारे टिळक कसे चुकले हे
सप्रमाण सिद्ध केले. विष्णुशास्त्री बापटांनी २००० पानांचा ‘गीतारहस्य खंडन’ नावाचा ग्रंथ लिहिला. बाळशास्त्री हुपरीकरांनी 'भगवद्गीता अर्थात ज्ञानयोगशास्त्र' या ग्रंथाचे लिखाण केले. आणि वे. शा. स. नरहरशास्त्री मारुलकरांनी 'श्रीमद्भगवद्गीताप्रणित सिद्धांत आणि महाभारतातील नारायणीय धर्म' हा ग्रंथ लिहिला. (तो मी पुनर्मुद्रित केला) आणि बाळशास्त्री हुपरीकर लिखित ग्रंथ करवीर पीठ शंकराचार्य यांनी गौरवलेला, स्वामी विनयानंद यांनी पुनर्मुद्रित केला.
बाळशास्त्री हुपरीकर हे कोल्हापूरच्या महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक होते (निधन ७-८-१९२४). त्यांच्या मते टिळकांच्या गीतारहस्याचा पाया कच्चा आहे; त्यामुळे बाहेरून दिसणारी मोठी सुंदर इमारत अगदी डळमळीत असून तिच्या आश्रयास राहणाऱ्या तरूण पिढीस प्रसंगी धोका संभवतो. तरूण पिढीच्या मनात टिळकपूर्वकालीन साधुसंत आणि आचार्य यांविषयी अनादर निर्माण करीत आहेत. बाळ गंगाधर टिळकांशी दोन हात करून आखाड्यात यशस्वी होण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. गीतेचे रहस्य टिळकांना समजलेच नाही, त्यामुळे त्यांनी लिहिलेले गीतारहस्य भलत्याच वळणावर लागले आहे. त्यांना निष्काम कर्मयोग म्हणजे काय हेही समजले नाही. कर्मफळाविषयी टिळकांची मते अज्ञात जीवांस लागू आहे. दहाव्या अध्यायात सहाव्या श्लोकाचा अर्थ सांगण्यास टिळकांनी आपले बुद्धिवैभव पणाला लावले, पण त्यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा हेच कळत नाही. अर्थाची ओढाताण करण्यात ते पटाईत आहेत.
वेदशास्त्रसंपन्न नरहरशास्त्री मारुलकर यांनी बरोबर शंभर वर्षांपूर्वी करवीरपीठ शंकराचार्यपद स्वीकारले. ते अतिशय विद्वान होते. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचे वर्गमित्र. कोल्हापूरच्या भेटीत सर्व सोपस्कार बाजूला ठेवून ते शंकराचार्य मठात जाऊन शास्त्रींना भेटले. हिंदू धर्मात प्रवृत्तीधर्म व निवृत्तीधर्म असे दोनच प्रकार आहेत. तिसरा प्रकार नाही. सर्व धर्मशास्त्री, शंकराचार्य गीता ही निवृत्तीपर असे मानतात. फक्त एकटे बाळ गंगाधर उलटा विचार गीतारहस्यातून मांडतात. मारुलकरशास्त्री म्हणतात, “बळवंतराव तुम्ही आढ्यताखोर आहात त्यामुळे शास्त्रशुद्ध भाषेत तुम्हाला गीताच कळली नाही. असे अनेकजण समजून सांगत असतानाही तुम्ही आपला हेका सोडत नाही.” टिळकांनी त्यांचे याच विषयावर पुण्याच्या गायकवाड वाड्यात प्रवचन ठेवले. टिळकांच्या उपस्थितीत त्यांनी अतिशय परखडपणे त्यांच्या चुका दाखवल्या, अपूर्णता दाखवली.
गीतारहस्याची मांडणी शास्त्रीय नसल्याने हा सर्व वाद माजला आहे. त्यावर उपाय सुचवताना करवीरचे शंकराचार्य टिळकांना सुचवतात की “तुम्ही विरुद्ध पक्षाच्या लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन, आग्रह सोडून व विचार करून त्याप्रमाणे गीतारहस्यात दुरुस्ती करणे, हाच एक उपाय दिसतो. पण त्याचा अवलंब करण्याची इच्छा टिळकांना होईल, असे आजपर्यंतच्या त्यांच्या इतिहासावरून वाटत नाही.”
या मारुलकरशास्त्रींनी या विषयावर करवीरपीठात दोनतीन जाहीर व्याख्याने दिली. पुढे पुण्यास येऊन संस्कृत वाग्व्यवहारविवर्धिनी सभेत संस्कृत व्याख्यान दिले. ते तेथील सर्व शास्त्री व गृहस्थ यांनाही आवडले. इतकेच नव्हे तर त्यांनी शास्त्रीबुवांची प्रशंसाही केली. श्री शृंगेरी मठातील आस्थान पंडित विरुपाक्षशास्त्री यांनीही हे नारायणीचे तात्पर्य मीमांसेच्या पद्धतीने अगदी निर्दोष आहे, असे उद्गार काढले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे गीतारहस्य दोषांनी भरलेले आहे; ते दुरुस्त करावे अथवा शास्त्रसंमत मानावे, असा परखड अभिप्राय दिला. काशीचे महामहोपाध्याय लक्ष्मणशास्त्री द्रवीड यांनाही नरहरशास्त्री मासलकर यांचे या विषयावरील प्रवचन व लिखाण पूर्ण शास्त्रीय पद्धतीचे असून निर्दोष ठरवले. त्याविषयी सविस्तर माहिती आचार्य पाक्षिकाच्या तिसऱ्या वर्षाच्या सहाव्या अंकात प्रसिद्ध झाली. 15 जून 1916 रोजी विष्णू वामन बापट शास्त्री (संपादक, आचार्य) यांनी ही नोंद केली.
त्यामुळे हिंदू धर्मातील भगवद्गीता या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा अर्थ न समजल्यामुळे बाळ गंगाधरना भाष्यकार म्हणून हे शिवधनुष्य पेलले नाही. स्वातंत्र्य संग्रामात गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी हिंदू संस्कृतीची मांडणी व्यापक मानवतेच्या दृष्टिकोनातून केली. आपल्यालाही धर्माच्या आधारे विचार मांडावे लागणार या घाईत त्यांनी गीतेवर भाष्य करण्याची घाई केली, उठाठेव केली आणि ते हिंदू धर्मातील शंकराचार्य, शास्त्री, विद्वान यांच्या परीक्षेत सपशेल नापास झाले. त्यामुळे गीतारहस्य हा टिळकांचा ग्रंथ सदोष ठरतो. तो शास्त्रसंमत नाही हे निश्चित.
(लेखक धर्मविज्ञान विषयातील पीएच.डी आहेत)