Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्पेन डायरी -भाग 3

स्पेन डायरी -भाग 3

स्पेन डायरी -भाग 3
X

सकाळी 10ची दूसरी फ्लाइट होती, अवकाश होता म्हणून मुनीक विमानतळावर थोडे विंडो शॉपिंगही झाली. हळुहळु बोर्डिंगच्या सूचना होवू लागल्या. तसे मी कान टवकारले आणि पुढील प्रवासासाठी सज्ज झाले; हो न जाणो मुंबई सारखा फटका बसायचा. डोळ्यांत प्रचंड झोप होती. पण तितकीच उस्तुकता ही. अनावर, म्हणून चेहयावर पाण्याचा हबका मारून "रेडी स्टेडी अँड गो "या अवस्थेत राहिले. फ्लाइटमध्ये चढल्यावर प्रथम गरम वाफाळलेला रूमाल सेवीकेने दिला आणि चित्त प्रसन्न झाले. डोळ्यावरची झापड कधीच गूल झाली आणि दिलेल्या न्याहारीचा मनसोक्त आस्वाद घेतला. अवकाश इतके सुंदर दिसत होते, मनोहारी ढगांच्या पाठीवर बसून जणू आम्ही चाललो होतो.

ढगांचेही इतके सुंदर प्रकार असतात हे सातव्या अस्मानात गेले कीच कळते. कॅप्टनने सूचना दिली, पट्टा आवळा आणि याचसाठी केला होता अट्टाहास ते स्पेन काही मिनिटांवर होते. मी लगबगीने विमानाच्या खिड़कीतून बरेच फोटो काढून घेतले. आहाहा काय विहंगम दृश्य होतं ते. कुठं उंच डोंगर, कुठं पाणी आणि होड्या तर कुठं लहान लहान लाल रंगाची घरे व हिरवीगार शेतं. मोठ्ठाला समुद्र तर कुठं खड्ड्यासारखे जलाशय. किती पाहू आणि किती नको असं झालेले मला.......अखेर प्रतीक्षा संपली अन् मी बर्सिलोनाला उतरले; लांबलचक जीने, असंख्य ऐस्कलेटर चढून व उतरून आम्ही एग्ज़िट घेतली...समोर आमचा प्रिय मित्र व साथी कलाकार जौमा नेण्यास आला होता. त्याच्या आपुलकीने व गोड शब्दांनी केलेला प्रवास कधीच विसरलो. परत लिफ्टने 5व्या मजल्यावर कार पार्किंगमध्ये गेलो आणि मार्गस्थ झालो.

जौमाला मी जवळ जवळ 5 वर्षांनी भेटत होते. साहजिकच भेटल्या भेटल्या गप्पांचा धबधबा अविरत सुरू राहिला. हा तिथला झाँझ पियनिस्त, त्यांचा एक गृप आहे जो देश विदेशात पर्फॉम करतो. या वेळेस खास भारतीय कलाकार निमंत्रित केला होता. जौमाचे वैशिष्ट्य म्हणजे युरोपियन असूनही कुटुंब पध्दतीवर त्याचा कल आणि विश्वास आहे. बायको मर्से, जी माझी मानलेली बहीण आहे; दोन गोंडस मुलं-मर व मारती असे छान चौकोनी कुटुंब आहे. त्याचं घर बारसीलोनाच्या उपनगरात बलारका येथे आहे. त्यामुळे यावेळेस आमची सोयही तिथं जवळच असलेल्या कतलूनिया या हॉटेलमध्ये केली गेली. विमानतळापासून त्याचं घरी अंदाजे पाऊण तासावर आहे. तिथं जाई पर्यंत नजर जाईल तिथंवर मी शहर पाहून घेत होते. जोडिलl तोंडी लावण्यास गप्पा होत्याच.

गेल्या 5 वर्षात त्याच्या कुटुंबाने खूपच सोसलं होतं. स्पेनची ढासळत गेलेली अर्थव्यवस्था, ब्रेक्झीट, लहान डॉक्टर भावाचा अपघातात म्रुत्यु, मुलांचे शिक्षण व इतरही अनेक गोष्टी. बोलण्याच्या ओघात बलारका आलेसुध्दा, तिथल्या नियमाप्रमाणे रूम्स तयार व्हायला अजून दोन तास होते. आता काय करणार म्हणून सामान चेक इन केले व भर तळपत्या उन्हात-हो हा त्यांचा उन्हाळा आणि आपला पावसाळी ऋतु बाहेर पडलो भटकण्यlसाठी. एकतर पोटात भूकेने कावळे काय सारेच पक्षी कोकलत होते आणि नियमाप्रमाणे हॉटेलचे डायनिंग बंद झाले होते. युरोपियन देशात हे नियम भारी असतात बरं का! आपण भारतीय तर नियम, शिस्त, क्यू मोडण्यlत पटाईत. त्यामुळे सुरवातीस मलाही खूपच त्रास झाले, खास करून जेवणाच्या बाबतीत. कतलूनिया हॉटेलपासून जरा चालले की एक छान ब्रिज जातो. त्यावरून चालत आम्ही वलकारका मेट्रो स्टेशन जवळच्या हॉटेलमध्ये जरा खावून घेतले. स्पेनला खाण्यासाठी तुमची चव निर्माण करावी लागते. कारण तिकडे सँडविच, बर्गर, फ्रेंच फ्राईस आणि वेगवेगळं मांस हेच मुख्य अन्न. हेच मूलभूत घटक वापरून इतरही जीन्नस बनवले जातात. त्यानंतर एका छोट्या सुपर मार्केटमध्ये घुसलो; तिथं जागोजागी अशी लहान मार्केटस असतात. गेल्यागेल्याच मला आपले भारतीय आल्फोन्सो आंबे खुणावत होते. जवळ जावून किंमत पहिली तर एक आंबा 600 रूपयांना. मोठाले मश्रूमस, हे मात्र पांढरेशूभ्र खूपच सुंदर. आम्ही थोडे पाणी, रोज खायला लागणाऱ्या वस्तू घेतल्या, काही गोड सुकवलेली फळे घेतली आणि पुन्हा रुमवर परतलो. गेल्यावर बिछान्यावर जे झोकून दिले की ज्याचे नाव ते.....संध्याकाळी 8 वाजता परत भेटायचे प्रॉमिस करूनच...क्रमश:

Updated : 3 March 2017 12:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top