यांची खेटराने पूजा करायची का?
X
‘सब का साथ, सब का विकास’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा हल्ली परवचा म्हटल्यासारखी म्हटली जात आहे. त्याच पक्षाचे उत्तर प्रदेशातील खटौलीचे आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू, अशी जाहीर धमकी दिली आहे. म्हणजे अशांचे ते थेट ऑपरेशनच करून टाकणार आहेत! शिवसेना हा पक्ष भाजपच्या साथ साथ असला, तरी त्याला विरोधात विकास दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेपासून जिल्हा परिषदांपर्यंत सर्वत्र भाजप X सेना असा सामना जनतेला पाहायला मिळाला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्यावर तर सेना सतत तोंडसुख घेत असते. सेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी पुणे-दिल्ली प्रवासदरम्यान आसनव्यवस्थेवर उद्भवलेल्या वादानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर भाजपने लगोलग त्यांचे हे वागणे बरे नव्हे, अशी प्रतिक्रिया दिली. भाजप प्रवक्त्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली. परंतु विक्रम सैनी यांच्या वर्तनाबद्दल मात्र भाजपच्या नीतिमान व पारदर्शी पुढाऱ्यांनी मौनव्रत स्वीकारले...
आजचा मुख्य विषय मात्र गायकवाड यांचा आहे. खा. गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचे बिझिनेस क्लासचे तिकीट असताना, त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसायला सांगण्यात आले. गायकवाड त्याची दिल्लीत तक्रार करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यावर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाडांनी केला आहे. विमानातून सर्व कर्मचारी उतरून गेल्यावरही ते बसूनच राहिले. त्यानंतर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला बोलावले. त्या अधिकाऱ्याने उद्धटपणाची भाषा केली, त्यामुळे मी उठून त्याची कॉलर पकडून त्याला 25 वेळ चप्पलने मारले, अशी कबुली स्वतः गायकवाडांनीच दिली. ‘एक ही मारा, लेकिन सॉलिड मारा’ हे फिल्मी वाक्य ऐकवून, एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या यशानंतर स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. गायकवाडांनी त्या जवळपास साठीला पोहोचलेल्या अधिकाऱ्यास 25 वेळा चपलेने मारले. पुन्हा हात वर उंचावून, ‘मी सेनेचा खासदार आहे, बांगड्या भरलेल्या नाहीत, मी मर्दमावळा आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हेच शिकवले आहे’ अशा तऱ्हेची मग्रूर शेरेबाजीही त्यांनी केली. त्या अधिकाऱ्यास उचलून फेकून देणार होतो, अशी गर्जनाही त्यांनी कॅमेऱ्यासमोर केली.
दिल्ली एअर इंडियाने गायकवाड यांच्या विरोधात उशिरा का होईना, मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. खरे तर मानगूट पकडून त्यांना त्वरित अटक करणे गरजेचे होते. त्यांच्यावर गंभीर हल्ला करणे, सार्वजनिक कामात अडथळे आणणे, प्रवाशांची गैरसोय करणे याबाबतची कलमे लावण्याची गरज आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी विमानाच्या सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही. विमानातील विविध वर्गांत भेदाभेद करता येणार नाही. हवाई प्रवासातील कुठल्याही प्रकारचा हिंसाचार परवडणारा नाही, असे निवेदन केले, ते योग्यच आहे. परंतु खा. गायकवाड यांच्या वागणुकीचा स्पष्ट निषेध करून, त्यांच्यावर कडक कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले नाही. उलट लोकसभेत विविध पक्षाच्या खासदारांनी गायकवाडांची पाठराखणच केली. आपल्या तथाकथित हक्कांचे रक्षण करताना, हे सर्व खासदार एक कसे होतात ते बघा...
गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर सर्व विमान कंपन्यांनी बंदी आणली, हा अन्याय असल्याचा टाहो संसदेत फोडण्यात आला. हा सुद्धा अतिरेक आहे हे खरे. हास्यवीर कपिल शर्माने पिऊन धिंगाणा घतला, तेव्हा त्याच्यावर कारवाई झाली नाही, असे तर्कट लढवण्यात आले. पण एका खासदाराची तुलना टीव्हीवरील विनोदवीराच्या वागण्याशी करण्याची वेळ यावी, हे भयंकर आहे. खासदार हा चार-पाच लाख लोकांचा प्रतिनिधी असतो. तेव्हा त्याने लोकांच्या प्रश्नांवर लढाई करावी. इथे गायकवाडांनी व्यक्तिगत कारणावरून सार्वजनिक गैरसोय केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी मावळ्यांना जे काही शिकवले असे, त्याचे प्रयोग त्यांनी स्वगृही करावेत. लोकांसमोर ते झाले, तर अशा मंडळींचा माज व्यवस्थेने उतरवला पाहिजे. ‘विमानातून दहशतवादी फिरतात, तेव्हा काही केले जात नाही, पण एका खासदाराने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला की त्याला हवाई बंदी केली जाते’ असा युक्तिवाद शिवसेनेने सुरू केला आहे. कोणते दहशतवादी विमानातून गेल आहेत? बालिश युक्तिवाद करणे ही सेनेची खासियतच आङे. सरकारी हवाई कंपन्यांत प्रवाशांवर कसा अन्याय होतो, हा मुद्दाही मावळे मांडत आहेत. एअर इंडिया व इंडियन एअर लाइन्सबद्दल हजारो प्रवाशांनी वर्षानुवर्षे तक्रारी केल्या आहेत. त्यांची दखल सेनेने कधी घेतली नाही. युनियनबाजीतून कमाई कशी करता येईल, याचा विचार करणाऱ्यांना प्रवाशांचे काहीही पडलेले नाही.
खा. गायकवाड यांच्या समर्थकांनी त्यांच्या मतदारसंघात रास्ता रोको केला. म्हणजे पुन्हा व्यक्तिगत कारणासाठी. ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, अशा लोकांना रास्ता रोकोमुळे मोठ्या गैरसोईतून जावे लागले. संसदेच्या बाहेर खासदार जे काही करतो, ते लोकसभा अध्यक्षांच्या कक्षेत येत नाही, असे म्हणून सुमित्रा महाजन यांनी हात झटकले. ब्रिटनमध्ये मात्र याबद्दल काही नियम करण्यात आले असून, त्याचे कठोर पालन होईल, असे बघितले जाते. सुमित्रा महाजन यांनी हे लक्षात घ्यावे. मध्यंतरी शिवसेनेच्या खासदारांनीच महाराष्ट्र सदनातील अन्नाच्या दर्जावरून एका अधिकाऱ्याशी गैरवर्तणूक केली होती.
गायकवाडांवर हवाई बंदी आणल्यामुळे त्यांचे नागरी अधिकार चिरडले आहेत, असा दावा केला जात आहे. परंतु प्रवाशांनी धिंगाणा केल्यास, जगात अनेक देशांत असेच निर्बंध आणले जातात. एखाद्या लहान गुन्ह्याबद्दल एकदम फाशी दिली जात नाही, हे खरेच. पण हे पाऊल टोकाचे वाटले, तरी त्याचा हेतू काय आहे, तो बघितला पाहिजे. तसेच संसद जर दोषी खासदारावर कारवाई करू शकत नसेल, तर मग त्याला ठिकाणावर आणण्यासाठी दुसर काय उपाय आहे? असाच हैदोस एखाद्या सामान्य विमान प्रवाशाने घातला असता, तर बकोट पकडून त्याला तुडवत बाहेर नेले गेले असते. खासदार महोदयांना तर कृपया विमानातून उतरा, शांत व्हा, अशा विनवण्या केल्या जात होत्या. त्यांच्याशी उद्धटपणे बोलले गेले असेल, तर तो प्रश्न त्यांना संसदेतही उठवता आला असता. पण जोड्याने मारणे हा काय प्रकार आहे? कर्मचाऱ्यांनी त्यांची तिथल्या तिथे खेटराने पूजा केली असती, तर गायकवाडांना ते लई भारी पडले असते. मग हक्कभंग झाल्याचा आक्रोश केला गेला अता. शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कामे करत नाहीत, गुर्मीने वागतात, नुसते खादाडी करतात म्हणून त्यांना उद्या लोकांनी पायताणाने मारले, तर ते चालेल का?
संरक्षणमंत्री असतानाही जॉर्ज फर्नांडिस इकॉनॉमी क्लसमधून प्रवास करायचे आणि सहप्रवाशांपैकी कुणाच्या समस्या असल्या, तर फाइल वाचता-वाचता त्या ऐकून घ्यायचे व नंतर त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. जोस मुर्जाका हे उरुग्वेचे अध्यक्ष. त्यांनी सरकारने देऊ केलेले निवासस्थान नाकारले. चिखलाने माखलेल्या रस्त्यालगतच्या पत्नीच्या शेतघरात ते राहतात. 90 टक्के पगार गरिबांवर खर्च करतात. ब्रिटन, कॅनडा, जर्मनीचे माजी पंतप्रधान रेल्वे, विमान, बसच्या रांगेत उभे राहतात. युरोपातले बरेच संसद सदस्य इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात. अनेकजण खासदार वा मंत्री आहेत, हे लोकांना कळतही नाही, असे त्यांचे साधे वागणे असते. आपल्याकडल्या बहुतेक खासदारांना मात्र शाही वागणूक हवी असते. जरा कुणी काही बोलले की त्यांचा गंड दुखावला जातो. लोकशाहीतील या महाराजांना वठणीवर आणण्याची गरज आहे.
हेमंत देसाई