“मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणे”
X
नेहमीप्रमाणे महाराज दरबारात आले. त्यांनी आपल्या डोक्यावरचा मुकुट बाजूला काढून ठेवला आणि ‘आज फार गरम होतंय.’ असं म्हणत ते सिहासनावर बसले.
‘प्रधानजी, कुठे आहात तुम्ही?’
‘महाराज, मी इथेच आहे.’
‘मग असे खिडकीजवळ का उभे आहात? कुणाची वाट बघत आहात का?’
‘नाही महाराज. वाट बघत नाही. जरा वारेवाशी उभा आहे.’
‘अहो खिडकी बंद करा. ए.सी. लावला आहे ना?’
‘महाराज, कालपासून लोड-शेडींग लागू केलं आहे.’
‘कुणी मुर्खांनी हा फतवा काढला एवढ्या उन्हाळ्यात?’
‘महाराज, आपल्याच सरकारचा निर्णय आहे.’
‘आताच्या आता बदला तो निर्णय. आधी ए.सी. सुरु झाला पाहिजे.’
‘करतो महाराज.’
‘प्रधानजी, राज्याची काय हालहवाल?’
‘सगळ ठीक आहे महाराज.’
‘त्या शेतक-यांचे काय झाले?’
‘महाराज, त्यांच्या तुरीच्या पिकाला आपण हमी भाव दिला आहे. तरीही त्यांची तक्रार आहे.’
‘काय तक्रार आहे प्रधानजी?’
‘सरकार त्यांची तूर विकत घेत नाही.’
‘आम्ही तर तसा आदेश दिला आहे ना?’
‘हो महाराज. पण मधेच कुणीतरी व्यापा-यांनी त्यांची गेल्या वर्षीची राहिलेली तूर शेतक-यांच्या नवे सरकारला विकून टाकली म्हणे.’
‘प्रधानजी, हे तुम्हाला कुणी सांगितले?’
‘महाराज, कालच्या पत्रकार-परिषदेत आपणच असे म्हणाल्याचे मी टीव्हीवर पाहिले जी.’
‘हो. ते बरोबरच आहे. चोर कोण ते मला माहिती आहे. त्याच काय करायचे ते नंतर पाहू. आता आजचा प्रश्न महत्वाचा. तो काय आहे ते सांगा आधी ?’
‘महाराज, आपल्या राज्यातले एक जेष्ठ नेते काल सभेत बोलताना म्हणाले, इतक्या तुरी घेतल्या तरी हे रडतात साले.!’ त्यावरून फार बवाल झाला महाराज. सगळे विरोधक कलकल करू लागले. पेपरवाले, टीव्हीवाले तर तुटून पडलेत त्यांच्यावर.’
‘प्रधानजी, मला हे सांगा, साले हा शब्द शिवी आहे का?’
‘महाराज, तो शब्द शिवी म्हणूनही वापरला जातो आणि त्याचा दुसरा अर्थ बायकोचा भाऊ, मेव्हणा, असाही होतो.’
‘मग आपण दुस-या अर्थाने त्याकडे बघितले पाहिजे असे जनमत तयार करा.’
‘महाराज, एक बोलू का, रागावू नका.’
‘बोला प्रधानजी, बोला.’
‘महाराज, आपल्या अमात्य परिषदेतील लोकांना आणि नेतेमंडळीना एक रोग झालाय. त्यांची जीभ वेळीअवेळी घसरू लागली आहे. त्याला जिभेचा लकवा म्हणता येईल. याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे साहेब.’
‘काय बंदोबस्त करावा, प्रधानजी?’
‘महाराज, आपण उत्तनला एक दिवसाची कार्यशाळा घेऊ.’
‘ही चांगली कल्पना आहे! थांबा, थांबा, प्रधानजी, दिल्लीतून फोन आला आहे. मला तो घेतला पाहिजे.’
सिंहासनावरून उठून महाराज फोन घेतात. बराच वेळ बोलतात.
‘प्रधानजी, दिल्लीवरून फोन आहे आपल्या त्या नेत्यांनी शेतक-यांना साले म्हटले होते त्याबद्दल माफी मागितलीये, म्हणे! तसा दिल्लीचा आदेश आहे.खरेतर, शेतक-यांना दुखवायचा त्यांचा उदेश नव्हता. गमतीगमतीमध्ये ते बोलत होते. आणि मी तो व्हिडीओ सुद्धा बघितला. त्यांच्या भाषणाला तुफान प्रतिसाद मिळत होता. लोक पोट धरधरून हसत होते.’
‘महाराज, मग आता आपण काय करायचे?’
‘सोप्पय प्रधानजी. दोनअडीच वर्ष आपण काय करतोय. तेच निष्ठेने करीत राहायचे.’
‘म्हणजे?’
‘नवीन प्रश्नाकडे लोकांचे आणि टीव्हीवाल्यांचे लक्ष वळवायचे. आणि आपल्या नेत्यांनी शेतक-यांसाठी किती संघर्ष केला आहे हे लोकांना सांगायचे. आपल्या अष्टप्रधान मंडळाला बोलवा आणि कामाला लावा.’
‘महाराज, लावतो कामाला. पण एक प्रश्न होता-’
‘प्रधानजी, हल्ली तुम्हाला फार प्रश्न ‘पडू लागलेत. असे प्रश्न पडू देऊ नका. तुम्हाला माहित नाही का, राजाने विचारले, की “सगळे आलबेल चालले आहे” असे सांगायचे असते. ते नेहमी लक्षात राहू द्या. तरी यावेळेपुरता विचारा तुमचा प्रश्न.’
‘माफी असावी, महाराज, एक पत्रकार म्हणतो, की १० लाख टन तुरी विकायच्या बाकी आहेत आणि तुम्ही तर १० लाख क्विंटल खरेदीचे आदेश दिले आहेत. बाकीच्या तुरीचे काय करायचे?’
‘प्रधानजी, आपण फक्त १० लाख, १० लाख एवढेच म्हणायचे. नवीन प्रश्न उभे करायचे. जुने विसरून जायचे. लोकही सहकाराच्या चळवळीतून आलेले असतात आपल्या महाराष्ट्रातले. सहकार्य करतात विसरून जाण्यात.’
...अन अचानक टुंग असा आवाज येऊन महाराजांच्या दालनातील ए.सी.सुरु झाला. मंद थंडगार झुळका येऊ लागल्या आणि महाराज व प्रधानजी सगळे विसरून पुन्हा राज्याच्या हितासाठी जोरात कामाला लागले.
- श्रद्धा बेलसरे खारकर