जेव्हा किनारा मुख्यधारा बनतो - राजदीप सरदेसाई
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर अनेक रंजक कहाण्या सध्या ऐकू येत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या उदयाची नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होत असलेली तुलना ही त्यापैकीच एक... मोदी यांच्याप्रमाणेच अविवाहीत असलेल्या आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या योगींनीही अगदी लहान वयातच घर सोडले आणि ते हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कुशीत शिरले. मोदी यांच्याप्रमाणेच जबरदस्त करिष्मा असलेले आदित्यनाथ तसेच वादग्रस्तही आहेत आणि त्याचबरोबर कडक टास्कमास्टर म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. इंग्रजी भाषिक उदारमतवादी हे पंतप्रधानांप्रमाणेच आदित्यनाथ यांच्याकडेही भिती आणि संशयाच्या मिश्र भावनेतून पहातात. आणि हो, आपल्याला असेही सांगितले जात आहे की योगींमध्ये भविष्यात पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे...
हो, पण हे अगदी असंच नाहीये. सुरुवातीची जडणघडण आणि भगव्या बंधुभावाबद्दल असलेली वैचारीक बांधिलकी याबाबत या दोघांमध्ये निःसंशयपणे काही साम्य आहे, पण राजकारणात प्रगतीपथावरील प्रत्यक्ष वाटचालीतील फरकही तेवढाच लक्षणीय आहे. रा. स्व. संघाच्या शाखेमध्ये मोदी यांची जडणघडण झाली, ते प्रचारक बनले आणि त्यांनी बराच काळ भाजपचे संघटक म्हणून पडद्यामागे राहून काम केले, त्यामुळेच ते निर्णयप्रक्रीयेच्या केंद्रस्थानापर्यंत येऊन पोहचले. गुजरातमध्ये भाजपचा विस्तार करण्यात मोदी यांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणूनच कोणतीही निवडणूक लढली नसूनही ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात आले.
याच्या अगदी उलट परिस्थिती भगवी वस्त्र धारण करणाऱ्या धर्मोपदेशक योगी आदित्यनाथ यांची होती. मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लोकप्रियता असूनही आणि पाच वेळा गोरखपूरचे खासदार बनूनही, ते कायमच ‘उपरे’ होते, उत्तर प्रदेशमधील भाजप नेतृत्वाच्या उतरंडीच्या काठावर होते. अगदी २०१७ च्या प्रचार मोहिमेतसुद्धा भाजपच्या प्रसिद्धी पत्रकांमध्ये ते अपवादानाचे झळकत होते आणि एक वेळ तर त्यांनी पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी करण्याची धमकी दिल्याचेही वृत्त होते. १९९० च्या राम मंदिर लढ्यापासून आदित्यनाथ यांच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि आपले गुरु महंत अवैद्यनाथ यांच्याप्रमाणेच, त्यांनी देखील जहाल हिंदू राष्ट्रवादाप्रती असलेली आपली बांधिलकी कधीही लपवून ठेवली नाही.
data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"
data-width="380"
data-hide-cover="false"
data-show-facepile="false"
data-show-posts="false">
href="https://twitter.com/MaxMaharashtra" data-size="large"> Follow @MaxMaharashtra
मुसलमानांना दुय्यम स्थान स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या अशा हिंदू बहुसंख्याक समाजाची कल्पना जोरकसपणे पुढे रेटण्यात त्यांची हिंदू युवा वाहिनी आघाडीवर होती. मग ती त्यांची गोहत्या विरोधी मोहिम असो किंवा घर वापसी किंवा लव जिहाद मोहीम, ‘राष्ट्रविरोधी’ मुसलमान हा नेहमीच त्यांचा उघड शत्रू राहीला आहे. सोळाव्या लोकसभेत संसेदेत त्यांनी नोंदविलेले महत्वाचे सहभाग हे बहुतकेदा ‘हिंदू’ या विषयाभवतीच, आणि खास करुन गोहत्येसंबंधीचे होते.
संकुचित हिंदुत्वापलीकडे आपली ओळख निर्माण करण्याची इच्छा मोदी यांनी जाणीवपूर्वक जोपासली. २००२ च्या गुजरात दंगली आणि त्यानंतरच्या तात्काळ परिणामांमुळे मोदी हे हिंदू राष्ट्रवादाचे नायक ठरले होते आणि त्यावेळी आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी ही प्रतिमा मोठ्या कौशल्याने वापरली.
तो असा काळ होता, जेंव्हा त्यांच्यावर धार्मिकदृष्ट्या प्रक्षोभक विधाने करण्याचे आणि धार्मिक उन्माद आणि दंगली पेटवणाऱ्या प्रविण तोगडीया यांच्यासारख्या विहिंप नेत्यांना मुक्त वाव दिल्याचे आरोप होत होते. त्यानंतर २००७ मध्ये पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर मात्र मोदी यांनी सुशासनाचे प्रतिक ही आपली प्रतिमा तेवढ्याच जाणूनबुजून पुढे आणली, या प्रतिमेमुळे तेंव्हापासून त्यांची राजकीय प्रगती कायम राहीली. त्यांनी अगदी तोगडीयांनाही आव्हान दिले, रस्त्याच्या कडेला असलेली नियमबाह्य मंदीरे पाडण्याचे आदेश दिले आणि तेंव्हा विंहीपची नाराजीही ओढवून घेतली. स्वतःचा नव्याने शोध घेण्याचे किंवा किमानपक्षी सर्वसमावेशक राजकारणाचा मुखवटा धारण करण्याचे ते अतिशय धूर्तपणे आखलेले धोरण होते, हेच यातून सूचित होते.
या उलट, योगी आदित्यनाथ यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात असे कोणतेही मुखवटे किंवा नव्याने घेतलेला शोध दिसत नाही. या दोन दशकांहून जास्त कालावधीत त्यांनी केलेली सार्वजनिक शेरेबाजी ही प्रक्षोभक, वारंवार अल्पसंख्यांकांना धमकावण्याचे प्रयत्न करणारी आणि हिंसेला चिथावणी देणारी राहीली आहे. कोणतीही भीडभाड न बाळगणारी त्यांची वकृत्वशैली ही भाजप नेतृत्वापेक्षा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी साधर्म्य सांगणारी आहे. दंगल भडकविण्यापासून ते द्वेषपूर्ण भाषणे देण्यापर्यंत, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे ते कशा पद्धतीनं घटनात्मक नियम आणि राजकीयदृष्ट्या योग्य गोष्टींकडे तुच्छतेनेच पाहतात हे दर्शवतात. आता यावर ते गोरखपूरमधून पुन्हापुन्हा निवडून येत असून, त्यातून त्यांची लोकप्रियताच दिसून येते, या गोष्टीकडे त्यांचे समर्थक नक्कीच लक्ष वेधतील, पण निवडणूकांमधील विजयामुळे बेकायदेशीर वर्तन कायदेशीर करत येत नाही, हे मात्र ते लक्षात घेणार नाहीत.
सत्तेत आल्यावर आदित्यनाथ मोदींसारखे वागून जहाल हिंदुत्वाची आपली प्रतिमा बदलतील का? मोदी यांच्याप्रमाणेच खंबीर, कुशल प्रशासक आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाम असलेला नेता, अशी त्यांची ओळख पुढे करण्यात येत आहे. मात्र उत्तर प्रदेशसारखे प्रचंड मोठे आणि गुंतागुंतीचे राज्य सांभाळणे हे गुजरात सांभाळण्यापेक्षा कितीतरी कठीण आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच वाहिले नसेल, एवढे मोठे ओझे आदित्यनाथ यांच्या खांद्यावर आहे. खास करुन, ‘आता आपली वेळ आली आहे’, असा विश्वास बाळगणाऱ्या त्यांच्या सैनिकांना ते कसा लगाम घालतीलः रोमिओ विरोधी पथकांचा स्थानिक पातळीवर तेवढाच धोका आहे जेवढाच तो सध्या हिंदुत्वाच्या तत्वज्ञानात न बसणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या नोकरी आणि उपजिविकेला निर्माण झाला आहे.
२००१ मध्ये मोदींना गुजरातमध्ये पाठविताना, रा.स्व.संघाला माहीत होते, की ते धोका पत्करत आहेत, पण हिंदुत्वाची मूळ प्रयोगशाळा म्हणून हे राज्य सुनिश्चित करण्यात ही चाल यशस्वी ठरली. मात्र योगी यांच्याकडे सत्तेची सूत्रे देऊन आणखी मोठा धोका पत्करण्यात आला आहे, पण यात संघ परिवारासाठी एक मोठा संभाव्य फायदाही आहेः भारतातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या राज्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या हिंदू पतपेढीचे एकत्रिकरण...
ता.कः मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच संसंदेत योगी आदित्यनाथ यांनी दिलेले भाषण ऐकल्यानंतर, एक ज्येष्ठ भाजप खासदार म्हणाले, “ बघा, ते शांत चित्ताने बोलत आहेत, ते त्यांच्या टीकाकारांना नक्कीच आश्चर्याचा धक्का देतील, जसा पंतप्रधान म्हणून मोदी यांनी दिला होता.” त्यांचा हा कौतुकाचा सूर हेच सुचवत होता की, हिंदू हक्कासाठी महंताच्या वेषातील एका नव्या राजकीय प्रतिकाचा उदय आपण पाहिला आहे. तथाकथित ‘किनारा’ हा आता अंतिमतः मुख्यधारा बनला आहे.
- राजदीप सरदेसाई
- अनुवाद - सुप्रिया पटवर्धन