गुरुजींनी गुरुमाईला का मारले?
Max Maharashtra | 8 May 2017 12:34 PM IST
X
X
या म्हणीमागची मूळ कथा अशी आहे - बाजारात तुरी आलेल्या आहेत, बायकोने अनेकदा आठवण देऊनही गुरुजींनी त्या घरी आणलेल्या नाहीत. उलट ते गुरुमातेलाच बडवीत आहेत. कारण काय? तर तूरीच वरण तू घट्ट करशील का पातळ? यावर नवरा-बायकोचा वाद विकोपाला गेला आहे. सुज्ञ वाचकांच्या लक्षात म्हण आलीच असेल. असे म्हणतात की, म्हणी आणि वाक्प्रचार म्हणजे समाजाचे संचित शहाणपण असते. सांप्रतकाळात बघीतले तर तुरीवरून असेच महाभारत घडताना दिसत आहे.
यावर्षी, सरकारने हमी भाव दिला आणि शेतकऱ्यांनी गावोगावच्या बाजार समित्यांमध्ये तूरविक्रीसाठी रांगा लावल्या. तूर खरेदीची मोठ प्रसिद्धी झाली. परंतु काही जण असे म्हणतात की शेतकऱ्यांच्याऐवजी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे दडवून ठेवलेली तूर सरकारलाच विकून टाकली आणि शेतकरी मात्र रांगेतच वाट बघत उभा राहिला. नेहमीप्रमाणे, यावर सर्व राजकीय पक्षांनी चर्चा केली. माध्यमांनी बातम्या दिल्या. दूरचित्रवाहिन्यांवर चार चर्चां सत्र घडवून आणली. तेल ओतून चांगली फोडणी टाकली. त्याचा शेजाऱ्यापाजाऱ्यांना ठसका लागला. विरोधकांनी आंदोलन करायचा प्रवित्रा घेतला आणि यामध्ये एक दिवस आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच महाराष्ट्राच्या गृहमंत्री-कम-मुख्यमंत्र्यांनी चक्क जाहीर करून टाकले की तूर खरेदीत ४५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे हो !! ढूम ढूम ढूमाक !!
नीट पाहिले तर तूर खरेदी केंद्र सरकारचे, खरेदी करणारे अधिकारी-कर्मचारी सरकारचे, शेतकऱ्यांच्या ७/१२ ची माहिती सरकारकडे मग ज्यांच्याकडे जमीनच नाही त्या व्यापाऱ्यांनी सरकारलाच तूर विक्री केलीच कशी? आपल्या पारदर्शी पार्टीच्या सरकारला तर त्या व्यापाऱ्यांची नावे, पत्तेही माहित असणार ! वर ‘या खरेदीत घोटाळा झाला’ हेही खुद्द सरकारच म्हणते आहे. मग त्या घोटाळेबाज व्यापाऱ्यांना, त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी सरकारचे हात कुणी बांधले असावेत बरे?
आत्तापर्यंत विरोधी पक्ष ओरड करीत असत - “घोटाळे झाले हो.....आणि सरकार आरोपींना पाठीशी घालतेय ! पण यावेळी मात्र नेमके उलटे चित्र बघायला मिळते आहे. सरकारच सांगतेय की ४५० कोटी रुपयांचा तूर घोटाळा झाला आहे. ‘कुणी घोटाळा केला हेही आम्हाला माहिती आहे’ असे मुख्यमंत्री-कम-गृहमंत्री उच्चरवात सांगत आहेत. आता यामागचे राजकारण तर काही समजत नाही बुवा ! पण जर माननीय मुख्यमत्री तथा गृहमंत्र्यांना चोर कोण आहे हे माहिती आहे तर त्यांनी त्याला पकडायला काय हरकत आहे? की विरोधी पक्षाची त्यांना लेखी हमी हवी आहे ? या राजकारणात सामान्य शेतकरी भरडल्या जातोय याची जाणीव तरी या राज्यकर्त्यांना वाटते का ? शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणून विरोधी पक्ष संघर्ष यात्रा काढत आहेत. त्याला उत्तर म्हणून सत्ताधारी पक्ष ‘संवाद यात्रा' काढताहेत. अरे बाबांनो, अशी नाटके करण्यापेक्षा एकदा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊन टाका ना ! पण अशीच एक हिंदी म्हण आहे ना - “अंधेर नगरी चौपट राजा!
- श्रद्धा बेलसरे-खारकर
Updated : 8 May 2017 12:34 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire