कॉमन वूमन

कॉमन वूमन
X

मुंबई आणि महाराष्ट्रातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका निकालांनंतर भांबावलेल्या कॉमन मॅनने आपला तुटलेला चष्मा नीट केला. पायात झिजलेल्या चपला सरकाविल्या आणि तो थेट मंत्रालयाशेजारच्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ जावून उभा राहिला. “बापू तुमच्या स्वप्नातला भारत असा होता का?” असे विचारू लागला. गांधीजींनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले. ते काहीच बोलले नाहीत. या त्यांच्या पारदर्शक कृतीमुळे अधिकच भांबावलेल्या कॉमन मॅनने डोळ्यावरचा चष्मा काढला. धोतराने त्याच्या काचा खसाखसा पुसल्या, चष्मा डोळ्यावर ठेवून परत एकदा बापुजींकडे पाहिले. ते गालातल्या गालात हसत असल्यासारखे वाटले. आता त्यांच्या हास्याचा काय अर्थ लावावा? ‘इथे तर जगप्रसिद्ध मोनालिसाच्या हास्याचे गूढ अजून कुणाला उलगडलेले नाही! आता त्यात आणखी गांधीजी नकोत!’ असे पुटपुटत कॉमन मॅन विचार करू लागला. “कोण ही मोनालिसा हो?” मागून एक धारदार आवाज आला. त्याने मागे वळून पहिले. त्यांच्या सौभाग्यवती तरातरा चालत त्यांच्याकडेच येत होत्या.

साधी सुती, धुवट, साडी. पांढरट करड्या केसांचा कसाबसा बांधलेला अंबाडा, हातात जुन्या साडीचे जरीचे काठ काढून केलेली पिशवी घेऊन त्या येत होत्या. तिच्याकडे बघून, ‘अरे ही खूपच थकलीये, तिला थोडा विसावा मिळायला हवा.’ असा विचार कॉमन मनच्या मनात तरळून गेला. ‘अहो, मी म्हणते, कोण ही मोनालिसा?’ पुन्हा उच्चरावतला प्रश्न ! त्यावर दचकून कॉमन मॅनच्या तोंडातून शब्द आले,

‘काही नाही ग.’

‘अहो, धादांत खोटे बोलताय तुम्ही. मी माझ्या कानाने ऐकलेय.’

‘अग, तुझे कान जरा कमी काम करतात अलीकडे !’

‘माझे कान चांगले ठणठणीत आहेत. आधी तुमची जीभ मोनालीसावर का अडखळली ते सांगा.’

‘अग, ते एक जगप्रसिद्ध चित्र आहे. तिच्या गुढरम्य हसण्याचा अर्थ अजून कुणी लावू शकलेले नाही.’ इतकेच.

‘हो का? काय करायचे तुम्हाला असले अर्थ लावून, या वयात? त्यापेक्षा घरातील समान संपलेले आहे त्याचे बघा.’

‘तुला न काही एक कळत नाही. मठ्ठ आहेस. साहित्य संगीत, चित्रकला याविषयी तुला काय कळणार’?

‘वा. वा ! ‘तुला काही समजत नाही’, असे म्हणताना पुरुषी अहंकार कसा सुखावतो ना तुमचा? उलट मलाच सगळे माहीत आहे. भाकरीतला चंद्र अशी उपमा का देतात बरं कवी, ते सांगा.’

‘बर. बर. जाऊ दे. मला सांग तू का आलीस माझ्यामागे?’

‘अहो, तुम्ही तरातरा निघालात. मला वाटले काही गडबड झाली की काय? म्हणून आले होते मी.’

‘तुम्हा बायकांना न काही समजतच नाही.’

‘बरोबर आहे. तुमच्याच भाषेत सांगायचे झाले तर जगातले सगळे साहित्यिक म्हणतात, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, ते खोटे की काय?’

‘नाही, नाही बाई! ते खरं आहे. मीही मान्य करतो. माझ्या मागे तू आहेस, म्हणूनच माझा संसार इथवर आला.’

‘अरे, वा ! लवकरच समजल म्हणायचं. मी म्हणते, स्त्री मागे आहे म्हणायचे, आणि तिला मागेच ठेवायचं. अहो कधी बरोबर पण येऊ द्या तिला. आणि कधी पुढे गेली तर कौतुकाचे चार शब्द बोलावेत माणसानं !

‘अग, आपल्या देशाची फार मोठी परंपरा आहे. महिलांना सन्मान देण्याची ! इंदिराजी तर देशाच्या पंतप्रधान होत्या, किरण बेदी पोलीस अधिकारी, अशी कितीतरी नवे सांगता येतील.’

‘हो. ते तिकडे दिल्लीत. पण तुमच्या महाराष्ट्राचे काय?’ तुमच्या पुरोगामी महाराष्ट्रात, एक तरी महिला मुख्यमंत्री झालीये का? तुम्ही मंत्रिमंडळात महिलांना खाती तरी कोणती देता? ‘महिला बालकल्याण’ नाही तर ‘आरोग्य’ ! फार पूर्वी एकदा, शालिनीताई पाटीलांना महसूलमंत्री केल होतं म्हणे! पण अर्ध्यातूनच काढलं त्यांना.’

‘अग, मला नक्की नाही आठवत पण त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली होती.’

‘हो, हो, असेलही झाली, पण मग इतर मंत्री अगदी धुतल्या तांदळासारखे होते? आणि ज्या अंतुलेंनी त्यांना काढले, त्यांनाही एका घोटाळ्यातच जावे लागले ना?’

‘अरे तुझे सामान्यज्ञान चांगलेच दिसतेय. अजून काय माहिती आहे तुझी?’

‘ते सोडा, त्या नीलम गोऱ्हेंना संकटमोचक म्हणून सगळीकडे शिवसेना पाठवत असते. पण, मंत्रीपद देण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा विसर पडतो. असं का ?’

‘अहो, प्रशासनातही तुमचे तेच. महाराष्ट्रात अजूनही मुख्य सचिव कधी महिला झालेली नाही. त्या चंद्रा अय्यंगारला संधी होती पण ऐन वेळी माशी शिंकली. राज्यात नव्हे तर देशातही जाणत्या राजाबरोबर महिला धोरण सादर करणाऱ्या अय्यंगार बाईलाही घरची वाट दाखवलीत तुम्ही ! मीरा बोरवणकरांना मुंबईचे पोलीस आयुक्तपद दिले का? सांगा!’

‘अग बाई, बरोबर आहे तुझे म्हणणे. मुद्दे सगळे योग्य आहेत, पण मी तर तुला, घरची लक्ष्मी म्हणतो ना ! हो, संध्याकाळी जेवायचे आहे ना घरी, म्हणावेच लागेल तुम्हाला तसे. अहो त्या तुमच्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराला सुद्धा, फक्त तुम्ही दिसलात ‘कॉमन मॅन’ म्हणून! त्यालाही कधी ‘कॉमन वूमन’ दिसलीच नाही!’

‘अग बाई, शांत हो. तुला कारण माहीत आहे का त्याचे? कुठलीच महिला ही कॉमन नसते. प्रत्येक महिला असामान्यच असते.’

‘वा.. वा.! तुमच्या पदवीदानाने तर मन तृप्त झाले अगदी. चला, तुरीची डाळ स्वस्त झालीये म्हणतात, जाऊ या खरेदी करायला !’

  • श्रद्धा बेलसरे खारकर

Updated : 24 Feb 2017 4:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top