कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
X
तीस वर्षापूर्वी कामानिमित्त अमेरिकेत आलेले अप्पासाहेब तिथेच स्थायिक झाले. तेंव्हा गरज म्हणून आणि नंतर आवडले म्हणून ते अमेरिकेतच राहिले. अमेरिकेत राहूनही भारताची ओढ त्यांच्या मनात असे. आज त्यांचा नातू पंचविशीचा आहे. त्याचे राजवर्धन असे गोंडस नाव त्यांनी ठेवले होते पण तिथली मुले त्याला ‘रॉज’ म्हणतात. अप्पासाहेबांना आयुष्यात सगळे काही मिळाले पण त्यांची राजकारणात जाण्याची हौस मात्र राहून गेली होती. मुलाने नाही तर निदान आपल्या नातवाने तरी राजकारणात जावून नाव कमवावे असे त्यांना नेहमी वाटे. म्हणून ते अधूनमधून राजच्या मागे लागत. त्यासाठी गावाकडे अप्पासाहेबांचे भाऊ आणि इतर नातेवाईक, मोठी सुपीक शेती आणि टोलेजंग वाडा होता. इंटरनॅशनल पोलिटीक्समध्ये एम.ए. केलेल्या राजलाही पेपर वाचायची आणि न्यूज वाहिन्या चाळायची चांगलीच सवय होती. पेपर वाचून आणि इतर ऐकीव माहितीमुळे भारतीय राजकारणाबद्दल त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होतीच. एक दिवस आजोबांशी बरीच चर्चा केल्यावर असे ठरले की त्याने महाराष्ट्रात जावून राजकारण सुरु करावे.
आबा, मला तिथल्या पॉलिटीक्स आणि पॉलीटीकल लोकांबद्दल थोडी माहिती द्या ना. कसे राहतात हे लोक? काय कामे करतात आणि कसे निवडून येतात? आबा म्हणाले,
‘भारतात राजकारणातले लोक बहुतेक धोतर सदरा घालतात. दक्षिणेत लुंगी असते. डोक्यावर टोपी असते, पण आता जमाना बदललेला आहे. त्यामुळे पायजमा आणि कुडता घालतात. हे कपडे स्वच्छ पांढरे खादीचे असतात. कपड्यांना कडक स्टार्च केलेले असते.
‘राजकारणातील महिला कसे कपडे घालतात?’
‘महिला पांढ-या स्वच्छ खादीच्या, पिवळी, हिरवी किनार असलेल्या साड्या नेसतात. बहुसंख्य राजकारणी आपापल्या मतदारसंघातल्या गावाकडच्या वाड्यावर राहतात आणि मुंबईत आल्यावर सरकारने दिलेल्या होस्टेलवर राहतात. हे लोक कायम माणसांच्या गराड्यात असतात. असेम्ब्ली अधिवेशनाच्या काळात गावाकडून रेल्वेने किंवा बसने मुंबईला पोहोचतात.’
झाले. राजवर्धन मुंबईला आला. राजकीय वर्तुळाच्या आसपास भटकू लागला. अप्पांनी वर्णन केलेले राजकारणी मात्र त्याला कुठे दिसेनात. इथे तर सगळेजण लिनन, सिल्क, फॅब इंडियाच्या डिझायनर वेशात फिरताना दिसत होते. महिलाही रंगीबेरगी डिझाईनर साडया आणि काही पंजाबी ड्रेसमध्ये होत्या. राजला अप्पांनी वर्णन केलेले काहीच दिसले नाही. बरीच भटकंती करून तो अप्पाकडे परतला.
‘अप्पा तुम्ही फॉल्स ‘इन्फो’ दिलीत.’ तुम्ही म्हणालात तसे मला कुणीच दिसले नाही.
अप्पा म्हणाले, ‘अरे काळानुसार थोडा बदल झाला असेल. मी तीस वर्षापूर्वी पाहिलेले सांगितले होते.’
‘पण अप्पा, मला अजून एक सांगा. तिथे अनेक पक्ष आहेत. कोण कुठल्या पक्षाचा हे कसे ओळखायचे?’
अप्पा जरा सरसावून बसले आणि म्हणाले, ‘सोपे आहे. जी माणसे शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय भाषण पूर्णच करीत नाहीत ती काँग्रेसची असतात, जी माणसे शाहू-फुले-आंबेडकर या नावाबरोबर विकासाचे बोलतात ती राष्ट्रवादी काँग्रेसची! खूप माहिती असून अतिशय तर्कशुद्ध तत्वाच्या गोष्टी जे करतात ते असतात भाजपवाले. तर ‘मराठी माणूस’ आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडतात ते समजायचे शिवसैनिक. याशिवाय जर कुणी कामगारांचे प्रश्न मांडून त्यावर निरर्थक चर्चा सुरु केली तर ओळखायचे की ते कम्युनिस्ट आहेत. अजून एक गट आहे जर एखाद्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडले तर समजायचे हा नक्की रिपब्लिकन पक्षाच्या एखाद्या गटाचा आहे. आता तो कोणत्या गटाचा आहे तेही लगेच कळू शकते. त्याच्या बोलण्याकडे नीट लक्ष ठेवायचे. तो इतर गटांना गद्दार ठरवीत ज्या ‘साहेबांचे’ नाव तो वारंवार घेईल तो त्याचा गट! तसेच कुठल्याही पक्षात कधीही सामावून जाण्यासाठी सर्वच विषयावर मोघम बोलणारे लोक म्हणजे अपक्ष!
मग राज अखेर मुंबई विमानतळावर उतरून महाराष्ट्रात आला. विविध लोकांच्या ओळखी करून घेऊन लागला. त्याला जो तात्त्विक मुद्दा मांडणारा वाटायचा तो नंतर राष्ट्रवादीचा असल्याचे सांगायचा. जो राष्ट्रवादीचा आहे असे राजला वाटे त्याने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविलेली असायची. आजूबाजूला नीट चौकशी केल्यावर त्याला समजले की हे लोक निवडणुकीच्या काळात कुणीही कुठल्याही पक्षात जात असतात त्यामुळे सुरवातीला असे होते. नंतर थोडे स्थिरावल्यावर ते ‘ड्रेस कोड’ सारखे त्या पक्षाचे ‘फेस कोड’ शिकतात. राजवर्धनने सरळ लगेचची फ्लाईट बुक केली. तो परत घरी परतला. अप्पाना थोडे आश्चर्यच वाटले.
‘का रे, लगेच परतलास एवढ्या तडकाफडकी?’
‘काय अप्पा, तुमचा देश आणि तुमचे लोक? काहीच कळत नाही त्यांचे!’
‘अरे, थोडे थांबायचेस रे बाबा. कळले असते हळूहळू.” अप्पा म्हणाले.
‘तुम्ही सांगितले होते तेच मुळात लक्षात ठेवायला अवघड होते मला. तिथे तर काहीच्या काही चालले आहे. मला कुणीही ओळखता आले नाही. आता जर एका राज्यातले चार पक्ष आणि चार लोक मी ओळखू शकलो नाही तर मी काय करणार तुमचे राजकारण? नको. नको. त्यापेक्षा आपली अमेरिकाच बरी. अगदी सोप्पे. जो ‘अमेरिका पुन्हा ग्रेट करायचे’ म्हणतो तो रिपब्लिकन पक्षाचा माणूस ! त्याचा नेता डोनाल्ड ट्रम्प! आणि जो निर्वासितांच्या भल्याची गोष्ट करतो, मेक्सिकन कामगारांची बाजू घेतो. दहशतवादी लोकांऐवजी, दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांनाच दोष देतो तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य ! कसा एकदम सरळ व्यवहार. मला आपले हेच चांगले आहे. लोक उगाचच अमेरिकी राजकारणाला तिरक्या चालीचं आणि कुटनीतीचं म्हणतात.
आप्पा तुम्ही लहानपणी मला सांगितले होते की नदी म्हणजे वाहते पाणी. पण इंडियातल्या नद्यामध्ये तर फक्त कोरडे दगड आहेत.
आपणही कोरडे पाषाण असल्याचा भास आप्पांना झाला. ते मनात पुटपुटले “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा”
श्रद्धा बेलसरे खारकर