जिंदगी एक सुलगती-सी चिता हैं ‘साहीर’
जिंदगी एक सुलगती-सी चिता हैं ‘साहीर’
X
जिंदगी एक सुलगती सी चिता है, असं म्हणत जगण्यावर भाष्य करणाऱ्या हिंदी फिल्मचे गीतकार साहीर लुधियानवी यांच्या गझल आणि गीतांतून त्यांना 110 व्या जयंतीनिमीत्त ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्रिनिवास बेलसरे यांनी अभिवादन केलं आहे.
हिंदी फिल्म-संगीत रसिकांना 'साहीर'चे नाव माहित नाही, असे सहसा होत नाही. मात्र ते असतात सिनेगीतकार साहीर लुधियानवी. उर्दू गझल रसिकासाठी दुसरेही एक साहीर आहेत. त्यांचे कवितेतले नाव जरी साहीर होशियारपुरी असले तरी ते पूर्णत: खरे नाही. ‘साहीर होशियारपुरी’ यांचे मूळ नाव राम प्रकाश शर्मा!
पंजाबमधील होशियारपूर शहरात ५ मार्च १९१३ला जन्मलेले राम प्रकाश शर्मा यांनी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी होशियारपुरच्या शासकीय महाविद्यालयातून फारसी भाषेत एम.ए.ची पदवी प्राप्त केली. जरी त्यांनी काही काळ पत्रकारिता केली होती तरी साहीर होशियारपुरी ओळखले जात ते प्रामुख्याने त्यांनी लिहिलेल्या उर्दू नज्म आणि गझलांसाठी! नरेंद्र कुमार शाद यांच्याबरोबर साहीर यांनी ‘चंदन’ या उर्दू मासिकाचे संपादनही केले होते. त्यांनी विपुल लेखन केले होते. मात्र आज त्यांचे केवळ ५ कवितासंग्रह उपलब्ध आहेत. उत्कृष्ट लेखनासाठी १९८९ साली त्यांना ‘गालिब संस्थान’तर्फे गालिब पुरस्कारही देण्यात आला होता. गेल्याच महिन्यात त्यांची ११०वी जयंती झाली.
होशियारपुरी यांच्यासारख्या शायरांच्या अनेक सुंदर गझला जर जगजीतसिंग यांच्या नजरेस पडल्या नसत्या तर त्या फार मोठ्या समुदायापर्यंत कधीच पोहोचल्या नसत्या. जगजीतसिंग आणि चित्रासिंग या जोडीने त्या रसिकांपर्यंत पोहोचविल्या! अनेकदा चांगल्या संगीतकारामुळे, गायकामुळे रसिकांना अशा कलाकृतींचा आस्वाद घेणे शक्य झालेले असते. अनेक, काहीशा अवघड, गझला कवितेची जबरदस्त समज असलेल्या या जोडीच्या गळ्यातून आल्यामुळेच लोकप्रिय आणि अजरामर झाल्या आहेत.
हल्ली तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे पुस्तक घेऊन कविता वाचणे कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे संभाव्य अर्थार्जनाची क्षमता आणि लोकप्रियता केवळ हेच निकष समोर ठेवून लिहिलेले सवंग अभिरुचीचे साहित्य सोडले तर अभिजात साहित्य संपण्याचा आणि त्यातून समाजमनाचे जे संगोपन, मूल्यपोषण होत असते, तेही थांबण्याचा मोठा धोका आहे.
एखादी कविता जेंव्हा पुस्तकातून बाहेर येते, मैफिलीत गायली जाते, कॅसेट, चित्रफित किंवा सीडीमध्ये रेकोर्ड होते, तेव्हाच तिची पोहोच वाढते. ती अगणित रसिकांपर्यंत पोहोचते. अनेक वर्षे, वेगवेगळ्या काळात, एकेका पिढीपर्यंत पोहोचत राहते. ज्या कथा-कवितांबाबत असे होत नाही, ते कितीही उत्तम, सकस साहित्य असले तरीही दुर्लक्षितच राहते. जशा संजय दत्तच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधल्या अंधा-या ग्रंथालयाच्या थंड पडलेल्या कपाटात अनेक अप्रतिम ग्रंथ पडून राहतात तसे! एखादा सज्जन ‘कयामत’पर्यंत प्रेषिताची वाट पहात थांबावा तशी त्यांची अवस्था होते.
जगजितसिंग यांनी संगीताने सजवून, जिवंत करून, सादर केलेली अशीच एक भावमधुर गझल म्हणजे ‘कौन कहता हैं मुहब्बतकी जुबां होती हैं!’ एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झालेल्या या गझलेचे त्यांनी चक्क द्वंद्वगीत करून टाकले होते.
साहीरजी या गझलेत जणू स्वत:लाच विचारतात- ‘प्रीतीची एखादी वेगळी भाषा असते का हो?’ मग प्रश्नाचे उत्तरही तेच देतात, ‘छे! प्रेमाची काही वेगळी भाषा थोडीच असते? प्रेमाची कहाणी तर फक्त प्रेमिकांच्या भावूक नजरेतूनच जाहीर होत असते.’ फक्त तशी नजर ओळखणारी दृष्टी हवी!
कौन कहता है मुहब्बतकी ज़ुबाँ होती है?
ये हक़ीक़त तो निगाहोंसे बयाँ होती है.
आणि तसेही हे खरेच नाही का? प्रेमात पडलेल्या त्या दोघांना वाटत असते की जे चालले आहे ते फक्त ‘आपल्या दोघात!’ आपले गोड गुपित कुणालाच माहीत नाही. ‘आपण सांगितले नाही तर ते कुणाला कळणार तरी कसे?’ अशी सुरवातीला त्यांची भाबडी समजूत असते. पण प्रेम लपत नसतेच. मालती पांडेच्या आवाजातील गदिमांचे एक सुंदर भावगीत होते-
‘लपविलास तू हिरवा चाफा,
सुंगध त्याचा लपेल का?
ही प्रीत लपवूनी लपेल का?’
तसेच प्रेम चाफ्याच्या सुगंधासारखे सगळीकडे पसरते असे गदिमा सांगतात.
साहीर होशियारपुरी म्हणतात- ‘कसले ते प्रेमातले विचित्र क्षण! तिच्या भेटीची केवढी आस लागून राहते. निदान नजरभेट तरी व्हावी म्हणून जीव किती आसुसून जातो! ती जिवलग व्यक्ती आली नाही, तर सतत किती घालमेल होत राहते?’ आणि ती आलीच तरी काय? भेट झाली म्हणून मनाला स्वस्थता थोडीच लाभते? उलट तिच्या येण्याने, कशाबशा शक्य झालेल्या त्या अवघड भेटीने मनाची अस्वस्थता तर अजूनच वाढते!
वो न आये तो सताती है, ख़लिशसी दिलको..
वो जो आये तो, ख़लिश और जवाँ होती है!
पण माझी प्रिया किती वेगळी आहे! तिच्या नुसत्या कल्पनेनेही ती अंतर्मनाला, माझ्या आत्म्यालाच, प्रसन्न करून टाकते. माझे मन तिच्या नुसत्या आठवणीनेसुद्धा उजळून निघते. इतकी तेजस्वीता, इतकी प्रसन्नता सगळ्यांच्यात थोडीच असते?
रूहको शाद करे, दिलको जो पुरनूर करे.
हर नज़ारेमें ये तनवीर कहाँ होती है.
जेंव्हा माझ्या मनात तिच्याबद्दलच्या प्रेमाला पूर येतो, मन अनावर होते तेंव्हा मी त्याला कसे आवरणार? तसे कुणाही प्रेमिकाच्या मनात जे असते ते त्याच्या डोळ्यातून प्रतीत होतेच ना?-
ज़ब्त-ए-सैलाब-ए-मुहब्बतको कहाँतक रोकें,
दिलमें जो बात हो आँखोंसे अयाँ होती है.
प्रेमाचे सगळे विश्व मोठे विचित्र असते. हे प्रीतीचे वेड जगण्याला एखाद्या चितेसारखे करून टाकते. प्रेम मनाला सतत अस्वस्थच ठेवते. ही चिता धड पेटून निखारेही बनत नाही आणि विझून, धूर बनून, हवेत विरूनही जात नाही! मग बिचाऱ्या प्रेमिकाने काय तरी करावे?
ज़िन्दग़ी एक सुलगती-सी चिता है 'साहिर'
शोला बनती है न ये बुझके धुआँ होती है.
प्रेमाची पूर्तता होत नाही तोवर मनात होणा-या घालमेलीचे यापेक्षा चांगले काय वर्णन कोण करू शकणार? भलेही तारुण्यातील, हातातून कायमच्या निघून गेलेल्या एखाद्या सोनेरी क्षणात, पुन्हा जाणे शक्य नसले तरी त्याची नुसती आठवणसुद्धा किती सुखद असते? किती हुरहूर लावते? आत आत खोलवर एक अनामिक भावना जागी करते? ते सगळे वेडेपण पुन्हा एकदा क्षणभर तरी अनुभवता यावे म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!
*
(कठीण शब्द:- बयाँ = जाहीर, खलीश = वेदना, टोचणी, शाद = प्रसन्न, पुरनूर=प्रकाशमान, ज्योतिर्मय, तनवीर=रौशनी, प्रकाश, ज़ब्त-ए-सैलाब-ए-मुहब्बत=प्रेमाचा पूर सहन करण्याची क्षमता, सहनशीलता. अयाँ = स्पष्ट दिसणे, जाहीर होणे.)