Home > Top News > महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पार्थ’ अनेक पण ‘कृष्ण’ कोण?

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पार्थ’ अनेक पण ‘कृष्ण’ कोण?

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पार्थ’ अनेक पण ‘कृष्ण’ कोण?
X

महाराष्ट्राच्या राजकारणाला काही परंपरा आहेत, यात घराणेशाहीचीही परंपरा आहेच... काही वर्षांपूर्वी राज्यात काका विरुद्ध पुतण्या असे संघर्ष खूप चालले आणि त्यातून राज्य़ाच्या राजकारणाला वेगवेगळी वळणंही मिळत गेली. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार हे तीन काका आणि राज ठाकरे, धनंजय मुंडे आणि अजित पवार हे तीन पुतणे…या नावांभोवती राजकारण फिरत राहिले. मग हळूहळू काळ पुढे गेला आणि राजकारणात नातवांचा बोलबाला सुरू झाला. पण बदलत्या काळानुसार राजकीय घराण्यांव्यतिरिक्त तरुणांचे नेतृत्व अजूनही पुढे येताना दिसत नाहीये.

आदित्य उद्धव ठाकरे

Courtesy: Social Media

बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला आदित्य ठाकरे हा नेता दिल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे राजकारणात आधीपासूनच सक्रीय असले तरी त्यांचे अधिकृत राजकारण तेव्हापासून सुरू झाले. पण आदित्य ठाकरेंना निवड़णुकीच्या राजकारणात आणण्याची घाई उद्धव ठाकरेंनी केली नाही. पण नंतर आदित्य ठाकरेंच्या सॉफ्ट लँडिंगची पूर्ण सोय करत त्यांची निवडणुकीच्या रिंगणात विजयी एन्ट्री झाली. आदित्य ठाकरेंनी कोणताही वाद आतापर्यंत ओढवून घेतलेला नाही. पण सुशांत सिंह प्रकरणाने आदित्य ठाकरेंना कारकिर्दीच्या सुरूवातीलाच एक ठेच लागली आहे एवढे मात्र नक्की....

अमित राज ठाकरे

Courtesy: Social Media

अमित ठाकरे यांना राज ठाकरे यांनी पक्षातील पद देत त्यांचीही एन्ट्री करवून घेतली. पण अमित ठाकरे अजून राजकारणात तेवढे सक्रीय झालेले दिसत नाहीत. राज ठाकरे हेच मुळात अधूनमधून राजकारणात दिसत असताना अमित ठाकरेंच्या न दिसण्याची चर्चा फारशी होत नाही. त्यात अमित ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांच्या राजकीय एन्ट्रीला उशीर झाला. अधूनमधून काही शहरी प्रश्नांवर अमित ठाकरे अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना झळकतात तेवढेच.

पार्थ अजित पवार

Courtesy: Social Media

कोणताही राजकीय अनुभव नसताना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घाई केल्याने निवडणुकीत पराभूत झालेला पहिला पवार अशी पार्थ पवारांची ओळख आता झाली आहे. त्यात पार्थ पवार यांची इंग्रजाळलेली मराठी हा त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एन्ट्रीत अडथळा ठरल्याचीही चर्चा असते. अशातच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने थेट शरद पवारांच्या हिटलिस्टवर आल्याने पार्थ पवारांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचीही चर्चा आहे.

रोहित पवार

Courtesy: Social Media

शरद पवारांचे आणखी एक नातू... जिल्हा परिषदेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केलेल्या रोहित पवारांनी बारामतीपासून लांब कर्जत-जामखेड हा आपला मतदारसंघ निवडला. तिथे आधीपासूनच त्यांनी तयारीला सुरूवात केली होती. मोजके बोलणे हा त्यांचा स्वभाव राज्याच्या राजकारणात त्यांना उपयुक्त ठरेल असे दिसते आहे. पण सध्या तरी राष्ट्रवादीने त्यांना इतर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.

अमित आणि धीरज विलासराव देशमुख

Courtesy: Social Media

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे हे दोन्ही मुलं विलासरावांच्या निधनानंतर राज्याच्या राजकीय पटलावर तसे कधी दिसले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर अमित देशमुख यांना मंत्रीपद मिळाले. पण धीरज देशमुख आमदार असले तरी राज्याच्या राजकारणात सक्रीय झालेले दिसत नाहीत.

निलेश आणि नितेश राणे

Courtesy: Social Media

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षांतर मालिकेमुळे या दोन्ही तरुण नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये चढउतार दिसतात. नितेश राणे यांना खासदारकी मिळाली पण त्यातून ते आपल्या कामाची छाप उमटवू शकले नाहीत. तर निलेश राणे हेसुद्धा कोकणापुरते मर्यादित झालेले आमदार आहेत. पण त्याचबरोबर निलेश आणि नितेश राणेंची भडक भाषा त्यांच्या मार्गातला अडथळा ठरते.

सध्या उद्धव ठाकर, राज ठाकरे, अजित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे ही नावं राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. पण भविष्यातील राजकारणात तरुण नेतृत्वाकडे सूत्र जाऊ शकतात. त्यामुळे बदलत्या काळानुसार त्यांना राजकारणाचे डावपेच, आपली भाषा, भूमिका मांडण्याची पद्धत आणि निर्णयांची अचूक वेळ ठरवण्याचा मार्ग दाखवणारा कृष्ण कोण हा प्रश्न कायम आहे.

Updated : 14 Aug 2020 4:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top