हवामान शास्त्रज्ञांचा मानवजातीला "लाल बावटा"
कोई नहीं बच पायेगा...! बदलत्या हवामानाचे मानवजातीला मिळणारे इशारे... संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे का? १००, २०० वर्षानंतर पृथ्वीचं तापमान मानवी वस्तीसाठी राहण्या योग्य राहिल का? हवामान जनजागृतीसाठी नेमकं काय केलं पाहिजे? अशा थरकाप उडवणाऱ्या प्रश्नांवर अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा महत्त्वपूर्ण लेख...
X
विचारक्षमता बाळगणाऱ्या, इंटरनेट किंवा जग फिरल्यामुळे अनेक विषयांची माहिती असणाऱ्या मध्यमवर्गियांनो ! फक्त आपली मुले, आणि नातवंडांपुरता संकुचित विचार करू नका; तुमच्या नातवंडांना देखील नातवंडे आणि त्यांना देखील नातवंडे होणार आहेतच ना ?
हवामान शास्त्रज्ञांचा मानवजातीला "लाल बावटा"
युनोच्या हवामान शाश्त्रज्ञांच्या गटाने, ज्यात जगभरातील शेकडो शास्त्रज्ञ आहेत, साऱ्या मानवजातीला हवामान बदलाचे दरवर्षी गहिरे होत जाणारे संकट हाताबाहेर जात असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. २०१३ नंतर एवढा विस्तृत ३००० पानांचा अहवाल काल जगासमोर ठेवला गेला.
ज्यात म्हटले तर नवीन काही नाही; उदा. या सगळ्याला निसर्ग कमी पण औद्योगिक समाजाने ऊर्जेचा मनमानी वापर, आणि त्यातून होणारे 'कार्बन उत्सर्जन जबाबदार' असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. हवामान बदलामुळे होणारे काही बदल कायमचे आपल्या छाताडावर बसणार आहेत; कायमचे म्हणजे पुढची हजारो वर्षे… उदा. पृथ्वीवरील बर्फ वितळू लागळ्यामुळे तीन चतुर्तांश पृथ्वी व्यापणाऱ्या समुद्रांच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल; असे अनेक बदल.
आत्तापर्यंत हवामान बदलाच्या किंमती जगातील गरीब सोसत होते; आता त्याचा भोवरा अधिकाधिक मोठा होऊ लागला आहे. कोई नही बच पायेगा... १००, २००, ५०० वर्षानंतर पृथीवरील हवामान अरिष्ट प्रवण असेल का? त्यात लहान मुलांचे, तरुण तरुणींचे काय प्रश्न तयार होतील? असा विचार थरकाप उडवतो. धोरणे ठरवणारे राजकारणी, भांडवलदार अशांना शिव्या देण्याची सुविधा वेगाने काढून घेतली जात आहे.
जनजागृती करण्यास मदत करणे, हवामान बदलावर काम करणाऱ्या संस्था / संघटना / आंदोलने यांच्या पाठीशी उभे राहणे आणि मुख्य म्हणजे ते विकास विरोधी आहेत हे मनातून काढणे हे तर रिसोर्सफुल मध्यमवर्ग नक्कीच करू शकतो.
संजीव चांदोरकर (१० ऑगस्ट २०२१)