प्रणवानंदचा फोटो आम्ही कचऱ्यात का फेकून दिला? राहुल बोरसे
आमच्या घरात स्वामी प्रणवानंद सरस्वतीचा फोटो होता. ज्यांना भास्कर वाघ माहिती असेल त्यांना प्रणवानंदही माहिती असेल. भास्कर वाघ तेव्हा जोरात होता. आपल्याला एकविरा देवी प्रसन्न आहे असा त्याचा दावा होता. तो एकविरा देवीच्या मंदिरासमोर भंडाऱ्याचा कार्यक्रम करायचा. तिथे गरजूंना कपडे वाटपही व्हायचं. यांच्याकडे कुणी पैसे मागायला आला तर तो खिशात हात घालायचा आणि पैसे काढून द्यायचा. त्याने खिशात हात घातला की आपोआप पैसे येतात असल्या अनेक अफवा त्यावेळी होत्या. प्रत्यक्षात मात्र त्याने जिल्हा परिषदेचा निधी लाटून मोठा भ्रष्टाचार केला होता. त्याने शिरूड येथील कालिकामातेचे मंदिर बांधून दिले होते. तिथेच त्या प्रणवानंदचा मठ होता. भास्कर वाघ सापडला त्यानंतर या प्रणवानंदचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. वाचा संगणक अभियंते राहुल बोरसेंचा बुवाबाजीचा अनुभव....
X
मी एका अंधश्रद्धाळू घरात जन्मलो. अंधश्रद्धाळू यासाठी की आमच्या घरात दर वर्षी किंवा सहा महिन्याला एक बाबा बदलत असायचा. मला आठवतं तसं मी दहा बारा वर्षांचा असेल. आमच्या घरात स्वामी प्रणवानंद सरस्वतीचा फोटो होता. ज्यांना भास्कर वाघ माहिती असेल त्यांना प्रणवानंदही माहिती असेल. भास्कर वाघ तेव्हा जोरात होता. आपल्याला एकविरा देवी प्रसन्न आहे असा त्याचा दावा होता. तो एकविरा देवीच्या मंदिरासमोर भंडाऱ्याचा कार्यक्रम करायचा. तिथे गरजूंना कपडे वाटपही व्हायचं. यांच्याकडे कुणी पैसे मागायला आला तर तो खिशात हात घालायचा आणि पैसे काढून द्यायचा. त्याने खिशात हात घातला की आपोआप पैसे येतात असल्या अनेक अफवा त्यावेळी होत्या. प्रत्यक्षात मात्र त्याने जिल्हा परिषदेचा निधी लाटून मोठा भ्रष्टाचार केला होता. त्याने शिरूड येथील कालिकामातेचे मंदिर बांधून दिले होते. तिथेच त्या प्रणवानंदचा मठ होता. भास्कर वाघ सापडला त्यानंतर या प्रणवानंदचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर भास्कर वाघने त्याचे कांड आपल्या जबानीत सांगितले होते. हा भास्कर वाघ फॉर्मात होता तेव्हा अनेकजण त्याच्याकडे चकरा मारायचे. धुळ्यातले सध्याचे अनेक लोकप्रतिनिधी त्याच्या घरी पडीक असायचे. सामान्य लोक त्याला देवाचा अवतार मानायचे. तो पकडला गेला तेव्हा तेव्हा ही सगळी गर्दी ओसरली. अनेकांप्रमाणे आमच्या घरातील प्रणवानंदचा फोटो आम्ही कचऱ्यात फेकून दिला,
90 च्या अखेरीस आणि 2000 च्या सुरवातीच्या काळात आसाराम बापूचा सत्संगचा कार्यक्रम धुळ्याच्या SSVPS कॉलेजच्या मैदानावर झालेला होता. त्यावेळी तिथं भव्य गर्दी होती. अगदी लोकांनी कामधंदे सोडून, रजा टाकून तिथल्या सत्संगाला हजेरी लावली होती. असल्या बुवाबाजीवर विसगवास नसलेला मी घरच्यांच्या बळजबरीने जाऊन बसलो होतो.एकदम टुकार सत्संग ऐकून बोर होऊन निघून आलो होतो. तर त्यावेळी आसाराम बापू धुळ्यातल्या अमुक शेठच्या घरी गेला, तमुककडे पाणी पिण्याचे त्याने इतके रुपये घेतले असे किस्से ऐकायला आले होते. त्याच्या पब्लिकेशन मार्फत निघणारे ऋषीप्रसाद नावाचे मासिक आमच्याकडे यायचे. ते मी नियमित वाचायचो. त्यातल्या भंपक गोष्टी वाचून कधीही भारावून गेलो नाही. कधीमधी त्याच्या दुकानांमधील साबण वैगरे सारखे एखाद दुसरं प्रॉडक्ट आमच्या घरी यायचं. त्याचा कडुनिंबाचा आणि मुलतानी मातीचा साबण यायचा. याचे अजूनही काही प्रॉडक्ट्स असायचे जसे आता रामदेवबाबा विकतो. काही दिवसांनी आमच्या घरातून आसारामचा फिवर उतरला.
आसारामने पुढे अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या. लोकांचा ओघ वाढला म्हणजे अनायासे पैसा येतो. मग त्यातून तो श्रीमंत होत गेला. धुळ्यातल्या अनेक सिंधी व्यापाऱ्यांना तो कमी टक्क्याने पैसे वापरायला देतो अशा गोष्टी कानावर पडत राहायच्या. आमचे एक नातेवाईक वर्षातून चार ते पाचवेळा आसारामच्या आश्रमात जाऊन राहायचे. एक नातेवाईक होते त्यांना कधी फोन केला किंवा ते समोर आले की त्यांचा पहिला शब्द असायचा "हरी ओम". हा आसाराम बापूचा मंत्र होता. त्याला गुरू केलं की तो हा मंत्र नामजपासाठी सांगायचा. पुढे तो इतका लोकप्रिय झाला की वाजपेयींपासून ते मोदीपर्यंत सगळे त्याच्या दरबारात लोटांगण घालून आले. तसे भाजपेयीं आणि RSS वाले या बाबतीत टुकारच असतात. पण काँग्रेसी पण या टुकारापणात मागे नव्हते. पुढे आसारामबापूचे कांड उघडकीस आलं. मग त्याच्या एक से एक सुरस कथा बाहेर येऊ लागल्या. टांगेवाला ते साधू हा त्याचा प्रवास कसा झाला. तो लैंगिक शोषण करण्यासाठी स्त्रिया, मुली कशा निवडायचा हे सगळं बाहेर येऊ लागलं.
नंतर काही दिवसांनी ठाकुरसिंग महाराज आले. त्यावेळी गुरू करण्याची साथ पसरलेली होती. मग माझ्या आईने ठाकुरसिंग महाराजांना गुरू बनवले. आम्ही सगळे कट्टर मांसाहारी तसं तीही मांसाहार करायची पण गुरू केला आणि ते बंद झालं. सगळीकडे ठाकुरसिंग महाराजांचे चेले दिसू लागले. ठाकुरसिंग महाराजांचे पांढरी पगडी घातलेले फोटो घरोघरी दिसत. त्यांचे प्रचारक दारोदारी जात. गल्लोगल्ली सत्संग करत. आमचे आईकडचे एक नातेवाईक दोन तीन महिन्यांनी आमच्या घरी येऊन सत्संग म्हणून जात. बाबांचे काम करतो म्हणून फिरावे लागते तर बस भाड्यासाठी सत्संगाची "फी" घेत. वडिलांना हे आवडत नसायचं. पुढे आमच्या मावशीने आईला बळजबरी चिकन खाऊ घातले आणि ठाकुरसिंग महाराज आमच्या घरातून चालते झाले.
मग कलावती देवी आल्या. मग त्यांच्या सत्संगाला आई जायला लागली. त्यांचे उपवास वैगरे करायला लागली. कलावती "आईचा" फोटो देव्हाऱ्यात आला. काही दिवसांनी तोही गेला. तोपर्यंत आम्ही या सगळ्याची खिल्ली उडवायला लागलो होतो. दर वर्षाला कावळ्याच्या छत्र्या उगवाव्यात तसा कुणीतरी बाबा उपटून पडायचा. मग काही दिवस त्याच्या नियमांप्रमाणे आई उपास तापास करायची नंतर तिच्याही लक्षात हा फोलपणा यायचा आणि मग त्याला गुंडाळून ठेवलं जायचं. आम्ही या असल्या बुवाबाजीला विरोध करायला लागलो. पुढे आमच्या घरात कमी होत गेलं. असं काही करायचं असेल तर मग ते लपूनछपून केलं जायचं. मात्र नंतर कुठलाही नवीन बुवा बाबाचा फोटो आमच्या घरात आला नाही.
एकदा आमच्या आत्याकडे मी गेलो होतो. तिथं एका बाबाच्या अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या होत्या. तो पोटात त्रिशूळ खुपसून घेतो तरी त्याला काही होत नाही वैगरे वैगरे. तो बाबा म्हणजे तिथलाच एका खेडे गावातील माणूस होता. एका संध्याकाळी आम्ही गाडीने त्याच्या त्या ठाण्यावर गेलो. मला खूप उत्सुकता होती, मनात प्रश्न होता की त्रिशूळ खुपसला तरी तो मरत कसा नाही? कारण त्रिशूळ खुपसला म्हणजे त्याच्या आतड्याच बाहेर यायला पाहिजे हे मला नक्की माहिती होतं. तर तिथे गेल्यावर थोडावेळ बसलो. तो आला, त्याने हातात एक पिशवी आणली होती. थोडावेळ गप्पा झाल्या. त्याचे बऱ्यापैकी भक्त जमले. त्याने सोबत आणलेले त्रिशूळ मी पाहिले. त्याला ना टोक ना धार. मग त्याने एक मोठा दुपट्ट्यासारखा कपडा पोटाला बांधायला सुरवात केली. तो कपडा अगदी दोनतीन वेटोळे घालून पोटाशी बांधला. पुढे त्याच्या अंगात कुठलातरी देव आला आणि तो त्या कपड्यावर त्रिशूळ ठेवून त्यावर जोर देऊ लागला. मी मनात म्हंटल अशाने आयुष्यभर जरी असा जोर देत राहिला तरी त्रिशूळ पोटात जात नसतो. आमचे ते नातेवाईक त्यांची पोरं जाम भारावलेले तर मी हा असला येडपट प्रकार पाहून बोर झालेलो.
असंच एकदा धुळ्यात असतांना एका मित्रासोबत प्रमोदनगर भागात एक भविष्य सांगणारा ज्योतिषाकडे मी आणि माझा मित्र गेलो होतो. सगळं सुखासुखी असतांना त्या आमच्या मित्राला त्या भटाकडे जायची हौस आली. तो ज्योतिषी माझ्या मित्राचा मित्र. नुकताच नावारूपाला येत होता. त्याच्या दरबारात अनेक महिला येऊन बसायच्या. आम्ही गेलो तेव्हाही तिथे काही बायका येऊन बसलेल्या होत्या. एक एक बाई त्याला आपली समस्या सांगायची. तो तिला जनरल नेहमीच्या गोष्टी सांगायचा. तिला ते पटायचं, मग तो तिला काही उपाय सांगायचा आणि ती पैसे ठेवून उठायची. एका महिलेचा नंबर आला. तिचा नवरा पोलीस होता. तिने नवरा कसा मागे आहे, दारू पितो वैगरे एकदोन गोष्टी सांगितल्या. पुढे तो भटोबा म्हणाला की तुमचे मिस्टर साधे भोळे आहेत.लोकं त्यांना लुबाडतात, त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतात. अमूकढमूक म्हणत त्याने तिच्या नवऱ्याचे गोडवे गायले. ती हो हो म्हणत होती. माझ्या मित्राचा नंबर आला. तो त्याच्याशी बोलून बाहेर निघाला. मी त्याला म्हटलं या ढोंग्याकडे परत येऊ नको. ती बाई ज्या पोलीस नवऱ्याबद्दल बोलत होती त्याला मी व्यक्तिशः ओळखतो. तो एक नंबरचा भ्रष्टाचारी होता. पैसे खाण्यात त्याने त्याच्या सख्ख्या मामाला पण सोडलं नव्हतं. तो भटोबा केवळ उल्लू बनवून त्यांच्याकडून पैसे उकळत होता.
भविष्य आणि भिक्षुकी करण्याच्या नावाखाली लोकांना टोप्या घालणारे अनेक भटोबा माझ्या पाहण्यात आले. ज्यांचा दिवस दारू प्यायल्या शिवाय मावळायचा नाही ते भिक्षुकी शिकून, खोटं भविष्य सांगून लोकांना लुबाडतात. धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने लोकांना पूजा घालायला लावून त्यांच्याकडून मोठी दक्षिणा वसूल करतात. जे सायकलवर फिरायचे ते निव्वळ लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा उचलून गाड्या फिरवतात. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जशी डॉक्टरांची कट प्रॅक्टिस चालते. रेफर करणाऱ्या डॉक्टरला जसे चेक दिले जातात. तसेच त्र्यंबकेश्वर किंवा अजून कुठल्या धार्मिकस्थळी पूजा करण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या भाविकाला टोपी घालून कमिशन दिले जाते. दानात मिळणाऱ्या गायी परस्पर विकल्या जातात. भागवतात तूप धान्य जमा करण्यासाठी डबे, पिशव्या घेऊन ही लोकं बसतात. स्वतःची बुद्धी शिक्षणात न चालवू शकलेला जमलेल्या महिलांना तुम्ही जर गावरानी तूप दान केले तर तुमच्या मुलाची बुद्धी शार्प होईल असे बोलबच्चन देतो. लोकांनी श्रद्धेने दिलेले पूजेचे साहित्य परस्पर विकून मोकळा होतो.
माझ्या आईचे वडील खूप धार्मिक होते. पक्के वारकरीही होते. त्यांच्याकडे असलेली धार्मिक पुस्तके माझ्या वाचण्यात आली. आईने जमवलेली अनेक धार्मिक पुस्तकेही मी वाचली. त्या पुस्तकांमध्ये धार्मिक गोष्टी वाचण्यात आल्या. संतांच्या गोष्टी वाचण्यात आल्या. धर्म, त्याचे आचरण कसे असावे. साधू संत कसे असतात. साधूची लक्षणे कोणती? खरा धार्मिक व्यक्ती कुठलेही अनैतिक काम करत नाही. भ्रष्टाचार करत नाही. खोटं बोलून लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा उचलत नाही. त्याउलट आज आपल्या आजूबाजूला घडतांना दिसते. आज इथं धर्म कुठं आहे? दारूचे गुत्ते चालवणारे, सट्टा पेढ्या, जुगाराचे अड्डे चालवणारेस धर्माच्या नावाने लोकांना ज्ञान पाजळतांना दिसतात. खोटं बोलून आम्हीच कसं धर्माचे काम करतोय असा आव आणणारे दिसतात. लोकांकडून लाच घेणारे, जनतेसाठी आलेल्या पैशातून टक्केवारी खाणारे, अनैतिक कामं करणारे, रामाचे नाव घेत जय श्रीरामच्या घोषणा देतात. या अशा गोष्टीतून देव वैगरे नसल्याच्या विचारांवर मी अधिकच ठाम होत जातो. कारण धर्माचा जयजयकार करणारे हे असले अधर्मी, चोर भामटे, लोकांना लुबाडणारे असतील तर तो खरा धर्म कसा असेल?
धुळ्यातल्या सुभाष पुतळ्याजवळ अविनाश चौधरीचे हॉटेल सागर होते. तिथं आम्ही चहा प्यायला जायचो. तिथं लिहिलेलं वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. ते वाक्य होतं, "लंबा तिलक मधुर वाणी, दगाबाज की पहिली निशाणी!"
- राहुल बोरसे
#भोंदूंचा_धर्म
tags: asaram bapu,asaram bapu convicted,asaram bapu news,asaram bapu case,asaram rape case,asaram bapu latest news,asaram,asaram convicted,asaram bapu case verdict,asaram bapu rape case,asaram verdict,asaram bapu live news,asaram bapu verdict,asaram convicted in rape case,asaram case,asaram bapu case update,asaram rape case verdict,asaram bapu news today,asaram bapu rape case verdict,asaram bapu ashram,asaram bapu case news,asaram bapu court case