विश्लेषण : अदानी- अंबानींच्या पलीकडे....
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विषय निघाला की अदानी आणि अंबानी यांची नावं चर्चेत येतात आणि मग लोक तावातावाने बोलायला लागता...पण भारतातील राजकीय अर्थव्यवस्थेचे आपले जनकेंद्री विश्लेषण अदानी-अंबानींच्या पलीकडे नेण्याची गरज व्यक्त करणारा संजीव चांदोरकर यांचा लेख नक्की वाचा...
X
दोन दिवसापूर्वी अदानी समूहातील एका कंपनीने ग्रीन हायड्रोजन उत्पादनसाठी टोटल एनर्जी (TOTAL) या फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीशी भांडवल गुंतवणुकीचा करार केला. बीसीसीआयचे डिजिटल हक्क २४,००० कोटी रुपयांना विकत घेणारी रिलायन्स समूहातील कंपनीत व्हायकोम (VIACOM) यात एका मोठ्या अमेरिकेन मीडिया कंपनीची मोठी भागीदारी आहे.
BAYJU, PAYTM , Flipkart , टाटा समूह , आयसीआयसीआय आणि एचडीएफसी समूह , भारतीय प्रवर्तकांनी स्थापन केलेल्या रियल इस्टेट कंपन्या… ..... मोठ्या कंपन्यांची मोठी यादी आहे. ज्यात जगातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मालकी आहे , आणि त्या मालकीचे प्रमाण स्थिर नसते , ते भविष्यात वाढणार आहे.
दुसऱ्या शब्दात भारतीय प्रवर्तकांनी स्थापन केलेल्या, नवीन वा काही दशके जुन्या , कंपन्या या जागतिक कॉर्पोरेट / वित्त भांडवलासाठी Front कंपन्या आहेत ; आपल्याला माहित देखील नसते कोण किती मालक आहे ते...
तिसऱ्या शब्दात भारतीय कॉर्पोरेट भांडवल आणि भारताबाहेरील जागतिक कॅर्पोरेट भांडवल वेगाने एकमेकात मिसळून जात आहे ; चौथ्या शब्दात आपले जुने देशी -परदेशी , औद्योगिक-वित्त , उत्पादक-सट्टेबाज , प्रोफेशनलिझम-क्रोनीझम या बायनरी विश्लेषणाच्या चिमटीत जे काही घडत आहे ते पूर्णपणे येत नाही.
जे काही घडत आहे त्याचा खूप मोठा परिणाम देशातील आर्थिक नीतींवर पडत आहे. यापुढे अधिक पडेल ; आणि त्याचा परिणाम कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याच्या गुणवत्तेवर अदानी / अंबानी / टाटा / बिर्ला यांची नावे घेऊच नयेत असे नाही किंवा क्रोनिझम, खोके, पेट्या हे शब्द वापरू नयेत असे नाही पण जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त याच नैतिक / अहंगंडी चष्म्यातून पाहिल्यामुळे खोलात जाऊन माहिती घेण्याची, आकडेवारी गोळा करण्याची , गुंतागुंतीचे विश्लेषण करण्याची निकड आपल्या मनाला वाटेनाशी होते.
भारतातील राजकीय अर्थव्यवस्थेचे आपले जनकेंद्री विश्लेषण अदानी / अंबानींच्या पलीकडे नेण्याची गरज आहे ; तरच काही हाताशी लागेल. राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण "व्यक्तिकेंद्री" नको "सिस्टीम केंद्री" करायला शिकले पाहिजे ; नाहीतर "अण्णागिरी" आणि आपल्यात काही फरकच उरणार नाही.