आपण मास्क का घालतो...?
X
पोलिसांनी दंड करु नये, म्हणून की स्वत:च्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी? आमच्या इथे लोक स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क घालत नसून पोलिसांचा दंड बसू नये. म्हणून लावताना दिसतात. ग्रामीण भाषेत सांगायचे झाले तर सासू समोर जाताना सुनेने पदर घ्यावा आणि ती निघून जाताच पदर डोक्यावरून खांद्यावर यावा तसे मास्कचे झाले आहे. पोलीस दिसले की मास्क नाकावर आणि पोलिसांसमोरून पुढे गेले मास्क नाकावरून हनुवटीवर असा सगळा मामला आहे.
कोविड व्हॅक्सिनेशन राबवणाऱ्या देशांपैकी जगातील २० देश १ टक्क्याहुन कमी व्हॅक्सिनेशन (दोन डोस पूर्ण) असणारे आहेत. यात बहुसंख्य आफ्रिकन देश आहेत. अपवाद कुवैत, येमेन आणि अफगाणिस्तान यांचा. येमेन अफगाण हे अस्थिर नि युद्धग्रस्त आहेत. फुल्ली व्हॅक्सिनेटेड देशांच्या रांगेत भारताचा क्रमांक १३० वा आहे.
सार्क देशांची लसीकरण (दोन डोस पूर्ण) टक्केवारी -
मालदीव ६७.३%, भूतान ६३.१%, श्रीलंका ५८.७%, नेपाळ २३%, भारत २०.६%, पाकिस्तान १६.४%, बांग्लादेश ११.६%,
एकुणात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या पहिल्या पंधरा देशांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर हजार लोकांमागे आपण ७१९ व्यक्तींना लस दिली आहे. या पंधरा देशात प्रती सहस्र लोकांमागील लसीकरणाच्या टक्केवारीत आपण अकराव्या स्थानी आहोत! तर जगातील २१७ देशांच्या क्रमवारीत प्रती सहस्र लसीकरणाच्या बाबतीत आपला क्रमांक १०९ वा आहे. तेव्हा यातून काय तो बोध घ्यावा.
जगाची डबल डोस व्हॅक्सिनेशन सरासरी ३७ टक्के आहे, आपण आता कुठे वीस टक्क्यांवर पोहोचलो आहोत. हे ही लक्षात ठेवले पाहिजे. इथे खाली काही आकडेवारी दिली आहे.
देश व्हॅक्सिनेशन संख्या प्रतीसहस्र प्रमाण एकूण टक्केवारी
देश | व्हॅक्सिनेशन संख्या | प्रतीसहस्र प्रमाण | एकूण टक्केवारी |
World | 6,652,728, 424 | 876.0 | 37.3% |
China | 2,229,212,000 | 1,600.6 | 75.2% |
India | 972,686,142 | 719.1 | 20.6% |
U S A | 407,446,961 | 1,245.4 | 57.7% |
Brazil | 254,484,312 | 1,214.9 | 49.5% |
Japan | 178,255,509 | 1,408.8 | 66.1% |
Indonesia | 168,836,886 | 630.8 | 23.2% |
Turkey | 113,862,236 | 1,383.2 | 57.4% |
Germany | 109,892,041 | 1,325.2 | 65.9%
|
Russia | 98,585,601 | 675.5 | 32.4% |
France | 96,292,913 | 1,437.5 | 67.3% |
U K | 94,376,101 | 1,419.4 | 68% |
Pakistan | 93,551,193 | 440.8 | 16.4% |
Italy | 87,479,306 | 1,447.6 | 69.8% |
S. Korea | 70,863,605 | 1,372.4 | 62.1% |
Number of vaccine doses administered globally
6,652,728,424
Number of fully vaccinated globally
2,831,198,903
Number of countries with a vaccination programme
217
Fully vaccinated global population
37.3%
(आकडेवारी माहिती स्रोत https://www.pharmaceutical-technology.com/covid-19-vaccination-tracker/)
ज्या देशात दोन डोस घेतलेल्या लोकांची टक्केवारी कमी आहे. तिथला धोका टळलेला नाही. हे कोविडच्या चार्ट्सवरून सहजी लक्षात येते. सबब शंभर कोटीच्या व्हॅक्सिन क्लबमध्ये लवकरच पोहोचणार असल्याने लोक बेलगाम वागले तर अनर्थ उद्भवू शकतो.
भारताचे व्हॅक्सिनेशन टार्गेट किमान ७० टक्के असून तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास आणखी एकशेदहा कोटी डोसेस द्यावे लागतील. म्हणजे आणखी किमान तीन महिने आपल्याला तिथंवर पोहोचण्यासाठी लागतील, किमान तोवर तरी कोविडविषयक नियम पाळले पाहिजेत.
संकट अजून पुरते टळलेले नाही. थोडी कळ काढलीच पाहिजे.
- समीर गायकवाड