लोक क्रिकेटपासून दुरावतायेत का?
अनेक लोक आता क्रिकेटपासून दूर का जात आहे. एकेकाळी एकही क्रिकेटची मॅच पाहण्याची न सोडणारे प्रेक्षक आता क्रिकेट कडे पाठ फिरवत आहेत. काय आहे कारण वाचा उदय जोशी यांचा अनुभव
X
एकेकाळी क्रिकेटवेडा असलेला मी हल्ली या खेळापासून इतका दूर गेलोय की भारतीय संघातल्या पाच खेळाडूंची नावे देखील मी सांगू शकणार नाही. क्रिकेटचा अतिरेक झाल्यामुळे आलेला हा नॉशीआ आहे. शिवाय त्या खेळात आता अति तांत्रिकता आल्यामुळे कलात्मकता हरवलेली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. शैलीदार नैसर्गिक खेळ खेळणारा ब्रायन लारा हा शेवटचा असेही मला वाटते.
शाळेत असताना मुंबईचे गावस्कर आणि रामनाथ पारकर हे माझे हीरो होते. रामनाथ पारकरच्या टाईम्स शिल्ड आणि रणजी सामन्यांमधल्या काही अविस्मरणीय इनिंग्स मी पाहिल्या आहेत. मुंबई कडून खेळतांना दोन बुटक्यांची ही आघाडीची जोडी मैदानात उतरली की रामनाथ पारकर त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने नेहमी भाव खाऊन जायचा. सुनील गावस्करचा प्रचंड मोठ्ठा भक्त असूनही मी असे लिहितोय हे लक्षात घ्या. त्या काळात तंत्रशुद्ध फलंदाजीची चलती असल्याने अंगावर आलेला सामन्यातला पहिला चेंडू बिनधास्त हुक करणारे फलंदाज भारतात एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होते. रामनाथ त्यातला एक होता.
पुढे टीव्ही मुळे जगभरातले सामने घरी बसून दिसू लागले. आमच्या पिढीसाठी ही नव्याची नवलाई होती. ऑस्ट्रेलियन विकेट्स वर चेंडू कसे वेगाने वर येतात आणि इंग्लंडच्या ढगाळ हवेत ते हवेत कसे 'स्वर्व्ह' होतात. ते याची डोळां पहायला मिळू लागले. याच दरम्यान आमच्या आयुष्यात विव्ह रिचर्डस आला आणि त्याने फलंदाजी बद्दलचे आमचे सर्व समज बदलवून टाकले. फास्ट बॉलर चेंडू टाकण्यासाठी धावू लागला की स्क्वेअर लेग कडे पावले सरकवायला सुरुवात करणारे फलंदाज पाहायची सवय असलेल्या आम्हाला हेल्मेट न घालता लिली, थॉमसनच्या डोळ्यांना डोळे भिडवून खुन्नस देणारा हा नरपुंगव भावला नसता... तरच नवल.
१९८३ साली वेस्ट इंडीजचा संघ भारतात आला असतांना मुंबईच्या टेस्ट सामन्याचा पॅव्हेलीयनचा पास माझ्या भावाने मला दिला होता. वेस्ट इंडीज संघाचा सराव पहायला मिळावा. म्हणून मी सकाळी आठ वाजताच स्टेडीयमवर गेलो. माझ्या पुढ्यात अक्षरश: दहा फुटांवर रिचर्डस उघड्या अंगाने तीन वेगवान बोलर्सच्या बोलिंगवर नेट मध्ये सराव करत होता.
भलताच मूड मध्ये असावा तो त्या दिवशी, कारण दैत्यांसम दिसणाऱ्या त्या बोलर्सचे चेंडू तो अत्यंत सहजतेने किमान साठ सत्तर यार्ड लांब भिरकावून देत होता. त्याचं दिसणं देखील त्याच्या फलंदाजी प्रमाणेच प्रचंड आकर्षक होतं. कसला मर्दानी दिसायचा तो! अस्सल पुरुषी सौंदर्याचा नमुना कोण तर केवळ विव्ह रिचर्डस हे समीकरण त्या दिवसापासून माझ्या मनात फिट्ट बसलं. काही म्हणा, नीना गुप्ताचा चॉइस एक नंबर होता हे मानलेच पाहिजे.
यावरून आठवलं. माझ्या बायकोच्या ऑफिस समोरच नीना गुप्ता राहते. किंग रिचर्डस मुंबईत तिच्याकडे रहायचा तेव्हा केव्हातरी सकाळी अर्धी चड्डी (संघाची नव्हे, नाहीतर लगेच रिचर्डस वर्सोवा शाखेचा स्वयंसेवक होता म्हणून बोंब ठोकतील. हल्ली सांगता येत नाही) आणि टाईट टी शर्ट घालून बाजारहाटा साठी बाहेर पडलेला दिसायचा. बायको सांगायची की रस्त्यातून जाणारे आबालवृद्ध आणि विशेषत: स्त्रिया फक्त त्याच्याचकडे बघत असायच्या. इंग्लिश मध्ये Cynosure of all the eyes म्हणतात तसा होता तो. रिचर्डस, गावस्कर गेले आणि क्रिकेटशी जोडला गेलेला माझा मुख्य धागा तुटला.
नंतरच्या काळात सचिन, द्रविड मुळे काही काळ मी क्रिकेटला जेमतेम लटकून राहिलो, परंतू त्यानंतर आता मात्र माझ्यासाठी 'छोड आये हम वो गलियां' सारखी स्थिती आहे. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी म्हणून गेल्या किमान वर्षभरात मी टीव्ही लावलेला नाहीये. युद्धावर निघालेल्या अलेक्झांडरच्या सैनिकांसारखे दिसणारे खेळाडू पाहण्यात मला रस वाटत नाही. डोक्यावर आपल्या देशाची, राज्याची किंवा क्लबची कौंटी अभिमानाने मिरवत वेगवान गोलंदाजाला निधड्या छातीने सामोरे जाणारे जुन्या काळातले फलंदाज मला जास्त भावतात. अपना अपना चॉईस है भाई !
(उदय जोशी यांच्या फेसबुक भिंतीवरून)