राज्य घटनेची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" ने का? : प्रा. हरी नरके
राज्यघटनेची सुरुवात कोणत्या शब्दांनी करावी ? या प्रश्नाला उत्तर म्हणून अनेकांनी आपापल्या देवांची नावे सुचवली होती , पण सुरुवात "आम्ही भारताचे लोक" पासूनच का सुरु झाली ? ...त्यासाठी वाचा प्रा . हरी नरके यांचा हा लेख
X
प्रजासत्ताक भारताचे संविधान लिहून पुर्ण झाल्यावर त्याच्या प्रारंभी कोणता शब्द असावा यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल विचार करून ठरवले की ह्या संविधानाचे सार्वभौम, सर्वोच्च उर्जाकेंद्र लोक=प्रजा असल्यानं "आम्ही भारताचे लोक " अशी प्रास्ताविकेची (सरनाम्याची) सुरूवात करायची.घटना परिषदेत त्यांनी त्याबद्दलची सविस्तर भुमिका मांडली.
मात्र मालवियांना "इन दि नेम ऑफ गॉड" अशी सुरुवात हवी होती तर काहींनी देव नको, देवीच्या नावाने म्हणून कामाख्या देवीच्या नावाने सुरुवात करा असा आग्रह धरला. मौलाना हसरत मोहनींना "अल्लाह के नाम" अशी सुरूवात हवी होती.
कोणाला प्रारंभी राम तर कोणाला गणपती हवा होता. असंख्य सुधारणा सुचवल्या गेल्या. बाबासाहेबांनी त्या सर्व नम्रपणे नाकारल्या.ते म्हणाले, " तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. हे देवलोकाचे संविधान नाहीये. हे लोकशाहीचे संविधान आहे. त्यामुळे "आम्ही भारताचे लोक " अशीच प्रास्ताविकेची (सरनाम्याची) सुरूवात करण्यावर मी ठाम आहे. हवे तर मतदान घ्या.
खुद्द अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना देवाच्या नावाने अशी सुरुवात हवी होती. तर नेहरू बाबासाहेबांच्या बाजूने होते. ज्यांना देव हवा त्यांनी देवाला तर ज्यांना लोक हवेत त्यांनी लोकांना मते द्यावीत असे पर्याय दिला गेला.
घटना सभेचे सभासद महाचतुर होते. लोकांना नाराज केले तर उद्या मतं मागायला कोणाकडं जायचं?
देवाला नाराज केलं तरी असून अडचण नसून खोळंबा.
३३ कोटी देव विरूद्ध ३३ कोटी लोक असा अटीतटीचा सामना होता.
सुमारे २/३ सभासद गैरहजर राहिले.
देवांना ३२% तर लोकांना ६८% मतं पडली.
म्हणुन हे लोकांचे राज्य आहे. प्रजासत्ताक आहे.
ज्यांचे ज्यांचे मतदार यादीत नाव आहे ते सर्व देशाच्या सात बाराचे मालक म्हणजेच देशाचे मालक आहेत!
तर मालक लोकहो, अभिनंदन आणि शुभेच्छा!
(पाहा-घटना परिषद वृत्तांत, CAD, खंड 10, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली )
-प्रा. हरी नरके