बहुजनांचं काय चुकलं?
“आम्हाला वापरून घेतलं” असं सतत बोलणारा बहुजन समाज... बहुजनांसाठी सर्व सवलती, समाज सुधारकांनी केलेले कार्य यातून बहुजनांनी काय धडा घेतला? वारंवार आपल्या मागासपणाला सवर्णांना जबाबदार धरणाऱ्या बहुजनांच्या रडगाण्याचा आनंद शितोळे यांनी घेतलेला समाचार
X
बहुजन समाजाच्या धार्मिक भावनांना गोंजारून संघाने सत्तेची मजल मारली. यासाठी मला संघाला किंवा त्यांच्या राजकीय हातांना अजिबात दोष देऊ वाटत नाही. "धार्मिक राजकारणासाठी बहुजनांना वापरून घेतलं "ही नेहमीची हुकमी ओरड केली जाते. बहुजन सगळ्यात हरामी. तुम्हाला वापरून घेतलं? अरे पण तुम्हाला वापरून घेताना तुमची अक्कल कुठं शेण खायला गेलेली होती?
धार्मिक कट्टरवादी, सनातनी लोकांनी तुम्हाला वापरलं, तुम्हाला खरा इतिहास कळला नाही, ज्ञानापासून वंचित राहिलात ब्लाब्लाब्ला, हे सगळं ऐकून कंटाळा आलाय. हे सगळं रडगाणे तथ्य असण्याचा काळ कुठवर होता? जेव्हा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली तेव्हा बहुजनांच्या मुली शिकायला लागल्या ?
जेव्हा राजर्षी शाहुनी १०० वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा कायदा केला तेव्हापासून बहुजनांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली? बाबासाहेब आंबेडकरांचा "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" हा महामंत्र तुम्हाला कळला. त्याला शंभर वर्षे होत आली आहेत? कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगावी शाळा उभारल्या तिथं बहुजनांची लेकर शिकली? या सगळ्या उलथापालथी होत असताना शिक्षण देशभरात सगळीकडं पोहोचलं ना?
मग एवढ्या वर्षात तुमच्या किती पिढ्या झाल्या? ज्योतिबा फुले यांच्या पासून मोजायचं ठरलं तर निदान पाच सहा पिढ्या आणि अगदी अलीकडं भाऊराव पाटलांच्या पासून मोजलं तर तीन पिढ्या. आजची व्हाटसअप विद्यापीठाची पदवीधर जमात भाऊराव पाटलांच्या शाळेत शिकलेल्या पिढीचे नातू. म्हणजे तीन चार पिढ्या पासून तुम्हाला शिक्षण मिळाले, नवनव्या भाषा शिकायला मिळाल्या, तुम्हाला जगाचं ज्ञान मिळालं. त्यातून तुम्ही नेमकं काय शिकले?
तुम्ही शिकलेच नाहीत, तुम्ही फक्त साक्षर झाले, पदव्या घेतल्या, बाजारात जाऊन साक्षर वेठबिगार झाले, अगदी कितीही मोठ्या पदावर गेले तरी तुम्ही साक्षर वेठबिगारच. या देशाची प्रकृती, गाभा, धर्मनिरपेक्ष रचना, आयडिया ऑफ इंडिया, गंगाजमनी संस्कृती हे सगळं तुम्हाला वारसा म्हणून मिळालेलं असताना तुम्ही त्याचं काय केलं ?
तुमच्या धर्माच्या नावाने डोकी कुणीतरी फिरवायला आलं तेव्हा ज्योतिबा, राजर्षी, भाऊराव, आंबेडकर फक्त गुलाल बुक्का वाहून पाच रुपड्याच्या हारांच्या माळा घालायला ठेवलेत का? तुमच्या अकला कुठं शेण खायला गेलत्या?
बहुजन समाज जेव्हा हे कट्टरवादी विष पेरणारे लोक सन्मानाने शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमात बोलावून त्यांची व्याख्यान, भाषण ऐकवून त्यांना "संस्कृती रक्षक" म्हणून पदव्या देऊन उरावर घेतो. तेव्हा तुम्हाला वापरून घेण्यासाठी सुवर्णसंधी तुम्हीच उपलब्ध करून देता की? हा अभिजन व्हायचा कंड कुणाला असतोय? एकीकडे अभिजन व्हायचा कंड गप बसू देत नाही आणि दुसरीकडे त्याच वर्गाने आम्हाला लुटून खाल्लं म्हणून गळे काढायचे हा दुटप्पी हलकटपणा झाला.
फुले-आंबेडकर-शाहू फक्त तोंडी लावायला, नाव घ्यायला, भाषण ठोकायला, फोटोला हार घालायला वापरायचे आणि काम करताना नेमकं त्यांनी सांगितलं... त्याच्या उलट काशी करायची आणि मग "आम्हाला वापरून घेतलं" म्हणून गळे काढायचे?
का आणि कशासाठी अजून सुधारक आणि समाजाला दिशा देणारे लोक तुम्हाला पाहिजेत? हरामी लोकहो, स्वतःचे प्रपंच माघारी, बाजूला ठेवून या लोकांनी तुम्हाला रस्ता दाखवला त्याच्यावर दोरीत चालायला तुम्हाला रोग येतोय काय? शिक्षणाची गंगा तुमच्या दारात आणल्यावर पुढल्या पिढ्या नीट रांगेला लावून मिळालेला वारसा जपता आला असता तर ही वेळ आलीच नसती ना?
आपल्या पिढ्या आपल्या हाताने आपण बरबाद केल्या, त्यांना बकऱ्या-मेंढ्यासारखे सनातनी-कट्टरवादी लोकांच्या दावणीला नेऊन बांधले आणि आता तुमचे शिक्षणाचे हक्क, रोजगाराचे हक्क, तुमची शेती, तुमचं सगळं बुडवून भिकेला लागायची वेळ आल्यावर गळे काढता, " आम्हाला वापरून घेतलं"?
चार पाच पिढ्यात फुले दांपत्य, राजर्षी, बाबासाहेब हे देशपातळीवर प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ या समाजाच्या आयुष्यात आलेले असताना त्यातून अक्कल न शिकता आपण आपण पुन्हा मध्ययुगीन काळात समाजाला घेऊन गेलोय याची आपल्यालाच शरम वाटायला हवीय. म्हणून ज्यांनी बहुजन समाजाला वापरून घेतल त्या सनातनी प्रवृत्तीपेक्षा समाज म्हणून आपण जास्त नालायक आहोत.