Home > मॅक्स ब्लॉग्ज > वाईट वाटेल अनेकांना.. पण इलाज नाही !

वाईट वाटेल अनेकांना.. पण इलाज नाही !

कोरोना संकटात होणाऱ्या पत्रकारांच्या मृत्यूनंतर पत्रकारांच्या संघटनांकडून शासनावर दबाव आणून आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पोखरकर यांनी कोरोना काळात समाजातील वंचित सर्वसामान्य घटकांसाठी वाली कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

वाईट वाटेल अनेकांना.. पण इलाज नाही !
X

मागील वर्षभरात कोरोनाने अनेकांना आपल्यातून कायमचे ओढून नेले.आपल्या कुटुंबातील, स्नेही-आप्तेष्ठांमधील,मित्रपरिवारातील, परिचितांमधील कुणी ना कुणी जवळपास प्रत्येकानेच गमावलंय.परिस्थिती अशी भीषण असली तरी लोक लढताहेत.हातावर पोट असलेली,घराबाहेर पडून काम करण्याशिवाय पर्याय नसलेली करोडो लोक आपली शक्य तेवढी काळजी घेत आपापलं कर्तव्य पार पाडताहेत.नव्हे..त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच काय आहे ? या अपरिहार्यतेतूनही अनेकांना संसर्ग होतोय आणि त्यापैकी काहींना जीव गमवावाही लागतोय.कोण काय करणार ?

अनेक वार्ताहर,पत्रकारांनीही या काळात अन्य लोकांप्रमाणेच आपले जीव गमावले.गेल्या दोनतीन दिवसातील जळगाव,रावेर येथील दुःखद घटनांचाही त्यात समावेश आहे.अकाली कुणाचाही जीव जाणे ही काळीज कुरतडणारीच बाब.मग तो पत्रकार असो व आणखी कुणी कष्टकरी.परंतु आता या कालपरवाच्या घटनांनंतर आणि यापूर्वीही जेव्हा काही पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले तेव्हा अनेक पत्रकार पराकोटीच्या त्वेषाने सरकारला दूषणं देत इथे आवेशपूर्ण पोस्टी टाकतात तेव्हा आश्चर्य वाटतं.सरकार आणखी किती पत्रकारांचे बळी घेणार ? सरकारला पत्रकारांच्या जीविताचे काही घेणेदेणे आहे कि नाही ? हे सरकार खुनी सरकार आहे..असं काय काय ही मंडळी लिहिताना दिसतात.सरकारवर होणाऱ्या टीकेला कसा प्रतिसाद द्यायचा ते सरकार पाहील पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे सर्व पाहिल्यावर मला साहजिकच काही प्रश्न पडतात.पोटासाठी रिस्क घेऊन घराबाहेर पडावे लागणारे फक्त पत्रकार आहेत काय ? अन्य जे लाखो-करोडो लोक तेच रिस्क घेऊन आपापले कामधंदे करताहेत ती माणसं नव्हेत काय ? त्यांच्या जीवाचं काही मोल नसतं काय ? आणि आणखी किती पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार आहे,या प्रश्नामागची तर्कसंगत भूमिका काय ? सरकारने अन्य सगळ्या कष्टकरी समाजघटकांना वाऱ्यावर सोडून फक्त पत्रकारांना काही विशेष ट्रीटमेंट का,कशासाठी आणि कशी द्यायला हवीये ?

आजही बाईट घेण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडणाऱ्या,नेते-सेलिब्रिटी-वादग्रस्त पोलीस अधिकारी आदींच्या गाड्यांचा सिनेमा स्टाईल पाठलाग करणाऱ्या असंख्य वार्ताहर,कॅमेरामन आदींच्या चेहऱ्यांवर मास्क नसल्याचे आम्ही टीव्हीवर पाहतो,तो सरकारचा दोष असतो काय ? सोशल डिस्टन्सचे सगळे नियम हे सगळे फिल्डवरील पत्रकार वगैरे लोक नेहमीच पायदळी तुडवत असल्याचे आम्ही पाहतो,तोही सरकारचा दोष ? स्पर्धेत सबसे आगे राहण्यासाठी सगळ्या सुरक्षा सूचनांचा अवलंब टाळून उर फुटेस्तोवर धावाधाव का करीत असता ? आणखीही असं बरंच काही लिहिता येईल.पण नको.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे स्वतःला कोणीतरी विशेष समजणं आणि त्यातून स्वतःसाठी काही विशेष मागण्या करणं पत्रकारांनी थांबवायला हवं.तरी पत्रकारांच्या तालुका -जिल्हा ते राज्य पातळीवर अनेक संघटना आहेत.त्या आपल्या सदस्यांवर आलेल्या अशा आपत्तीत जमेल तशी मदत करीत असतात. सरकार, नेतेही या संघटनाना भरीव सहकार्य करीत असतात. अशा संघटना ज्यांच्या नाहीत अशा करोडो कष्टकरी लोकांचे काय ?

तसंही कोणे एके काळी या क्षेत्राला आणि त्यात काम करणाऱ्या लोकांना समाजात जो मानसन्मान,आदर होता तो आता अगदीच तुरळक अपवाद वगळता कधीच संपलाय.आणि तो का,हे या क्षेत्रातील प्रत्येकालाच माहित आहे.त्यामुळे तुम्हीही मास्क वापरा..सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा आणि स्वतःला सुरक्षित राखून काम करा.तुम्हीही आता या समाजातील अन्य घटकांप्रमाणेच एक सर्वसामान्य घटक आहात..विशेष कुणीही नाहीत हे लक्षात घ्यायला हवंय.

Updated : 27 March 2021 3:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top