Home > मॅक्स ब्लॉग्ज > वटसावित्री की विवेक सावित्री?

वटसावित्री की विवेक सावित्री?

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याची प्रथा आजही आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कर्मकांडाची चिकित्सा करण्याची गरज आपल्याला नाही का वाटत ? समाजाची मानसिकता कधी बदलणार त्याचे विश्लेषण केले आहे अंनिसचे विनायक सावळे यांनी...

वटसावित्री की विवेक सावित्री?
X

आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक तथाकथित सावित्री वडाच्या दिशेने जातील,सुताचा धागा हाती घेत वडाला फेर्‍या मारतील आणि जन्मोजन्मी सात जन्मी हाच नवरा मिळावा असं म्हणत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतील. दुसऱ्या बाजूला या कर्मकांडाला शास्त्रीय आधार देण्याचा तकलादू प्रयत्न होईल. वड किती ऑक्सिजन सोडतो वगैरे वगैरे म्हणत या कर्मकांडाचं उदात्तीकरण करण्यात येईल.

वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या कर्मकांडाची चिकित्सा करण्याची गरज नाही का वाटत आपल्याला? व्रत वैकल्य आणि कर्मकांड ही पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रियांनीच का करावी? पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पतीने करावयाचे एकही व्रत का नाही? सात जन्मी हाच नवरा मिळावा हे केवळ स्त्रीनेच का सांगावे? वडाला फेर्‍या मारुन खरंच दीर्घायुष्य लाभते का? सात जन्मी हाच नवरा मिळेल हे कसे तपासायचे ?यापूर्वी कोणी तपासले ?त्याला काय शास्त्रीय आधार होता ? असे प्रश्न नाही पडत का आपल्याला..!

दुसऱ्या बाजूला वटसावित्रीच्या समोर एक जिती जागती ज्ञान सावित्री या महाराष्ट्राने अनुभवली.पतीच्या सोबत पिडित, वंचित समाजाला, स्त्रियांना ज्ञानाची दालने खुली केली.अंगावर शेण झेलत ,अपमान सहन करीत स्त्रियांच्या मुक्तीसाठी आयुष्य झिजवणारी सावित्री दुर्लक्षित का राहते ?वडाकडे जाणारी पाऊले या विवेक सावित्रीकडे का वळत नाहीत ? वडाच्या दिशेने जाणारी आजची सावित्री या ज्ञान सावित्री कडे विचाराने आणि कृतीने का नाही वळली ?असे असंख्य प्रश्न आपल्याला अस्वस्थ नाही का करत ?

मुळातच सगळी व्रतवैकल्य ही स्त्रियांनी करायची आहेत आणि ती पुरुषांसाठी करायची आहेत.कारण ती लिहिलीच पुरुषांनी. ही व्रतवैकल्य स्त्रियांच्या गुलामीची,बंधनाची साखरदांडे आहेत. पण ह्याच साखळदंडाना आज स्त्रिया फुलांचे गजरे समजत आनंदाने मिरवताना दिसून येतात.

नवऱ्या बद्दलचे प्रेम, त्याच्या दीर्घायुष्याची कामना ह्या गोष्टींना महत्त्व आहेच. पण वटसावित्रीच्या कर्मकांडांना ते वास्तवात येईल ही अंधश्रद्धा आहे. अजून एक चिकित्सक युक्तिवाद बघा.सात जन्मी तोच नवरा जर मिळायला हवा असेल,तर या जन्मी तो पत्नीच्या आधी मरावा लागेल. तरच तो पुढील जन्मी लवकर जन्माला येईल आणि त्याच्यानंतर मरणारी पत्नी ही पुढच्या जन्मी त्याची जीवनसाथी बनेल. असा अर्थ जर घेतला तर नवऱ्याला मारणारं हे कर्मकांडे ठरते. अशी चिकित्सा आपण का नाही करत?

आजच्या दिवशी सर्व स्त्री वर्गाला नम्र आवाहन आहे. आपण या सर्व कर्मकांडांचा शांतपणे विचार करावा. या देशाच्या संविधानाने आपल्याला उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण अधिकार बजावत असताना आपण स्त्री म्हणून स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःचे स्वातंत्र्य, स्वतःचे अधिकार आणि यासाठी ज्यांनी इतिहासात आपले आयुष्य पणाला लावले हे अनावधानाने का असेना बाजूला तर ठेवत नाहीत ना ? एका अवैज्ञानिक कर्मकांडाचं उदात्तीकरण करत आपण ज्ञान सावित्रीचा अपमान तर करत नाहीत ना? सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा गाडत असतानाच दुसऱ्या बाजूला वडाला फेर्‍या मारत आपण उलटा प्रवास तर करत नाहीत ना ? असे प्रश्न स्वतःलाच विचारावेत .नीट, शांतपणे ज्ञान सावित्रीला स्मरून विचार केला तर योग्य विवेकाची वाट आपण नक्कीच शोधू शकू. वडाकडे फेरे मारणारी पावले ज्ञान सावित्रीच्या वाटेकडे जातील अशी अपेक्षा व्यक्त करु या..!

विनायक सावळे,

9403259226.

[email protected]

Updated : 14 Jun 2022 10:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top