मोदीजी, "पप्पूला का घाबरताय?"
छोटा भीम, पप्पू म्हणून ज्या राहुल गांधी यांना हिणवलं जातं… त्या राहुल गांधींची मोदी सरकारला इतकी भीती का वाटते ? वाचा निलेश चव्हाण यांचा लेख…
X
गोष्ट आहे संसदेवर हल्ला झाला तेव्हाची… संसदेवर हल्ला झाला तेव्हा लगेच विरोधी पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना फोन करून तब्बेतीची विचारपूस केली आणि हल्ल्याविषयी काळजी व्यक्त करून माहिती घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी संसदेत अटलजींनी आपल्या भाषणाची सुरूवातच अशी केली की, "ज्या देशाच्या विरोधी पक्षाच्या प्रमुख सर्वप्रथम पंतप्रधानांना फोन करून काळजी व्यक्त करतात आणि या संकटकाळात आम्ही आपल्या सोबत आहोत असं सांगतात. त्या देशाच्या लोकशाहीची मुळं किती मजबूत आहेत. हे हल्ला करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे..
"खरंतर या देशाच्या लोकशाही परंपरेची अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. वैयक्तिक द्वेषाचे राजकारण ही या देशाची संस्कृती नाही. आणि असले राजकारण या देशाला मानवणारेही नाही. पण काही लोकशाहीचे विरोधक नेहमी डोके वर काढण्याचे काम करतात. सोशल मीडियामुळे तर अलीकडे हे प्रमाण खूप वाढल्याचे चित्र आहे. राहुल गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्याला युपी पोलिसांनी जी वागणूक दिली. त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली. हे योग्य होते का? हाथरसमध्ये घडलेल्या क्रूर घटनेनंतर पीडीतेच्या परिवाराची विचारपूस करण्यासाठी म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जात होते. फक्त सांत्वनपर भेटीसाठी निघालेल्या राहुल यांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती संतापजनक आहे.
कॉलर पकडून या राष्ट्रीय नेत्याला जर खाली पाडले जात असेल तर सामान्य माणसाच्या आंदोलनाला कसे दडपले जाईल? याची कल्पना करता येऊ शकते. बरं यातही सोशल मीडियावर पेडट्रोलर्सनी आणि काहींनी राहुल यांचीच थट्टा, टर उडवण्याचे उद्योग चालवले आहेत. हे भाऊ-बहीण कसं नाटक करतायत? असं बिंबवलं जातंय? पण थट्टा तर लोकशाहीची होतेय, थट्टा तर युपीतल्या पोलीस यंत्रणेने लावलीये. पण आपल्या पक्षाच्या प्रेमापोटी ही मंडळी याकडे सोयीस्कर डोळेझाक करण्यात धन्यता मानत आहेत.
मागे गुजरातमध्येही राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. ही प्रवृत्ती भेकड लोकांची आहे. राहुल गांधींनीही त्यांचा समाचार घेतला. पण सोशलमिडीयावर तर त्यावेळीही हद्दच झाली. या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी राहुल गांधींवरच शेरेबाजी करण्याचा आणि टर उडवण्याचा प्रकार घडला.. सांगायचे म्हणजे राहुल गांधींविषयी हे नवीन नाही. कारण त्यांची टर या देशात सर्रास उडवली जाते.
छोटा भीम, पप्पू, असं काय काय म्हणून त्यांना सारखं हिणवलं जातं. त्यांना या देशातील काही प्रवृत्तींनी विनोदाचा विषय केलाय. हे कसे ठरवून केले गेले आणि केले जाते हे सर्वांसमोर आहे. त्यातूनच या पोलिसांनी ही दांडगाई केली असावी. तरीही राहुल यांनी आपला संयम सोडला नाही. कारण ते सुसंस्कृत आणि शालीन नेते आहेत. त्यांना मोठमोठ्याने ओरडून, पल्लेदार वाक्य फेकत, नाटकीय भाषण करता येत नाही. आव आणता येत नाही की, द्वेषाचे राजकारण करता येत नाही. "जे आहे तसे आहे" असे त्यांचे वागणे असल्यामुळे सो कॉल्ड राजकारण्यांच्या भाऊगर्दीत ते वेगळे पडतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले? याचे आपण साक्षी आहोत.
एवढ्या मोठ्या त्यांच्या पक्षाला गड्ड्यात टाकण्याचे काम कोणी केले आहे? तर ते राहुल गांधींनी असे विरोधक हसतहसत सांगतात. काँग्रेसचा पराभव हा फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच झालाय हे एकवेळ मान्य केले तरी काँग्रेस विचारधारेला आणि संस्कृतीला डाग लागेल अशी वर्तणूक त्यांनी कधीच केली नाही. बोलण्यात नेहमीच तारतम्य राखलं. संयम सोडला नाही. कधी विखारी प्रचार केला नाही. बिकट अवस्थेत पोहोचलेल्या काँग्रेस ला सावरण्याचे काम ते करत आहेत. ज्या गतीने हे करायला हवे त्या गतीने ते करत नसतीलही.. आणि काँग्रेसला ते संजीवनी देऊ शकतील की नाही. हे येणारा काळच सांगेल. पण त्यांना पप्पू अशीच हाक मारणाऱ्या आणि आम्ही राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. असे म्हणणाऱ्यांना त्यांची भीती का वाटतेय? हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या देशभरातील दौर्ऱ्यांना, लोकांमध्ये जाण्याला हे भ्याड लोक का घाबरताय? हा पप्पू जर काँग्रेस ला मातीत गाडणार असेल. तर त्याच्या वाटा अडवण्याचे काम हे का करताय?
पप्पूला हे सिरियस घेत नाही तर अडवणूक कशासाठी? ,कॉलर पकडून धक्काबुक्की कशासाठी? मागेही गाडीवर दगडफेक कशासाठी? याचा अर्थ, अवघा देश काबीज करण्याच्या इराद्याने निघालेला आमचा विजयरथ कोणी अडवताच कामा नये, आणि त्याला विरोध करण्याचा जर कोणी प्रयत्न करेल तर आम्ही साम, दाम, दंड भेद वापरून तो हाणून पाडू.. विरोधकांचे अस्तित्वच संपवू पाहणाऱ्यांना टीका सहन होत नाही. हेच या कृतीने दाखवून दिलंय.. खरंतर यात एक गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. ती म्हणजे बऱ्याच दिवसानंतर राहुल रस्त्यावर दिसले, काँग्रेस विरोधी पक्ष आहे. हा विसर पडावा अशी परिस्थिती होती. पण रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी आणि त्यांचे नेते असणाऱ्या राहुल, प्रियंका यांनी लढाई आता अशीच लढावी लागेल हे दाखवलंय. हे इथेच थांबते की, विविध मुद्यांवर विरोधी पक्षाचे कर्तव्य म्हणून ट्विटरवरच मुद्दे न मांडता रस्त्यावर हल्लाबोल केला जातो. हे बघावे लागेल. कारण लोकशाहीत जिवंतपणा राहावा यासाठी विरोधकांचा आवाजही बुलंद असण्याची गरज आहे. आणि अशावेळी तर याचे महत्त्व जास्त वाटते.
ज्यावेळी दुसरा आवाजच दडपणारी व्यवस्था बनू पाहतेय. आपल्याला हे कसे दृष्टीआड करता येईल की, अलीकडच्या राजकारणाने विखारी स्वरूप धारण केल्यामुळे आणि "हम बोले सो कायदा" असे म्हणणाऱ्यांची संख्या फोफावत चालल्यामुळे हीच आपली लोकशाही संस्कृती का? असा प्रश्न उभा राहिल्या शिवाय राहत नाही. देशात आणि परदेशातही महात्मा गांधींचे नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे विद्यमान राज्यकर्त्यांनी ओळखले असले तरी गांधींचे विचार त्यांनी कधीच मानले नाहीत. याला त्यांची वागणूक साक्ष आहे. पण या देशाचा इतिहास सांगतो. दडपशाहीवर शेवटी लोकशाहीनेच विजय मिळवलाय. वेळ प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही.
विरोधकांचे आंदोलन दडपल्याने काहीही साध्य होणार नाही. आणि कोणाचा आवाज दाबता येणार नाही. हल्ले करणाऱ्यांनी हल्ले करावे, वाटा अडवणाऱ्यांनी वाटा अडवाव्यात. पोलिसांनी नको तिथे पोलीसी खाक्या दाखवाव्यात. पप्पू म्हणणाऱ्यांनी पप्पू म्हणावे पण लोकशाहीवर विश्वास असलेला इथला सामान्य माणूस सत्याच्या बाजूने उभे राहिल्या शिवाय राहणार नाही... उदयप्रतापसिंह यांनी लिहिलंय, उदय झुठी कहानी है सभी राजा और राणी की जिसे हम वक्त कहते है वही सुलतान सबका है..
-निलेश चव्हाण