Home > मॅक्स ब्लॉग्ज > भयात रहायचेच आहे तर...

भयात रहायचेच आहे तर...

भयात रहायचेच आहे तर...
X

आपण माणूस आहोत. यच्चयावत विश्वात अन्यत्र कोठे जीवसृष्टी आहे काय? याचा विज्ञान अविरत शोध घेते आहे. माणसापेक्षाही प्रगत जीव कोठेतरी सापडेल...न सापडला तरी अप्रगत का होईना जीवसृष्टी सापडेल याची अनिवार आशा वैज्ञानिकांना...म्हणूनच आपल्या सर्व मानवजातीला आहे.

परंतू याक्षणी तरी संपुर्ण विश्वात आपण एकटेच असल्यासारखी स्थिती आहे. पृथ्वीवरील अन्य बरीच जीवसृष्टी माणसापेक्षा अधिक पुरातन आहे. अनेक प्रकारची जीवसृष्टी कोट्यावधी वर्षांपुर्वीच नष्टही होऊन गेली आहे. मनुष्य तसा तुलनेने अत्यंत तरुण जीव आहे. त्याचे आगमनच पृथ्वीतलावर झाले. उत्क्रांतीमुळे झाले की जैवीक अपघातातून झाले हे आपल्याला निश्चयाने सांगता येणार नाही. पण त्याने सर्व पुरातन जीवसृष्ट्यांना मागे सारत, अक्षरश: पिंजरेबंद करत, संपुर्ण पृथ्वी व अवकाशावर सत्ता स्थापित केली हे मात्र खरे. ज्या हत्याराने तो हे करू शकला त्याला माणूस "बुद्धी" हे नांव देतो.

आजच्या माणसाला वाटते पुर्वीचे जीवन किती साधेसुधे होते. पण ते खरेच तसे आहे काय? ते साधेसुधे आज वाटते. पण त्या काळाच्या चौकटीत जेही काही उपलब्ध होते. त्या सर्वाचाच मन:पूत वापर करत अधिकाधिक भौतिक सूख मिळवण्यासाठीचा संघर्ष करण्यात तो दंग नव्हता काय? नक्कीच होता. त्याची जीवनविषयकची मुल्ये तो काळाप्रमाणे, गरजेप्रमाणे वाकवत राहिला, बदलत राहिला. आपल्या पूर्वजांचे महानता त्या त्या काळाच्या पिंज-यातील बंदिस्त महानता होती हे आम्हाला समजत नाही.

आपली पुरातन काव्ये-महाकाव्ये ही बव्हंशी भीषण युद्धांची व संघर्षांचीच वर्णने करतात. मायेच्या ओलाव्याची काव्ये तुलनेने कमीच सापडतील. संघर्ष हीच त्याच्या प्रतिभेची मूळ प्रेरणा आहे की काय?

सत्य-असत्य, हिंसा-अहिंसा, चांगले-वाईट... या सर्व संकल्पनांना माणसाने कवटाळले, त्यावरही तात्विक वाद-विवाद घातले... असत्यालाही सत्यात बदलवू शकण्याचे बुद्धीभेदी तत्वज्ञान शोधले. सत्य-असत्य, चांगले-वाईट च्या नैतिक व्याख्याहे सापेक्ष बनवून टाकल्या. अधमातम कृत्यालाही समर्थन देवू शकणारे तत्वज्ञान मनुष्यच शोधू जाणे!

माणसाने फक्त अन्य जीवसृष्टीचा विध्वंस केला नाही. असंख्य मानवी संस्कृतींचाही पुरातन काळापासून विध्वंस केला. काही संस्कृत्या आपल्याला तर फक्त अवशेषांतून माहित आहेत. कित्त्येक संस्कृती तर जमीनीखाली कायमच्या दफन आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला कसलीही माहिती नाही. प्राकृतिक उत्पातांत तर किती संस्कृती संपल्या याची गणती नाही. नष्ट होऊनही पुन्हा नव्या दमाने उभे हो नवीन संस्कृती निर्माण करण्याचे माणसाचे वेड अद्भुत असले तरी विनष्टाचे बीज किंवा विषाणू तो निरंतर सोबत का वागवत आलेला आहे. हे मात्र समाजात नाही. पण या संघर्षाने त्याचा सर्व इतिहास भरला आहे.

मनुष्य असा आहे. ते चांगले की वाईट हे कोणत्याही नीतिनियमांनी ठरवता येणे कठीण आहे. त्याचा संघर्ष बाह्य जगताशीच आहे असेही नाही. त्याचा संघर्ष स्वत:शीही राहिला आहे. किंबहूना बहुतेक मानवी नीतिनियम हे त्याच्या आंतरिक संघर्षाचेच दृष्य रूप आहे. त्याला संघर्ष हवा आहे पण शांतीही हवी आहे. त्याला हिंसा हवी आहे पण त्याच वेळीस सदय अहिंसाही हवी आहे. तो समाज करून राहतो कारण एकटे जगू शकण्याएवढे धैर्य त्याच्यात नाही. आणि तरीही एकटेपणा त्याला छळत राहतो. तो निरंतर भयभित आहे म्हणून तो त्या भयावर मात करण्यासाठी जशी शस्त्रे शोधतो तसेच धर्म-पंथही शोधतो.

प्राचीन कारखाने जे सापडले ते दगडापासून शस्त्रनिर्मितीचे. तो शासनव्यवस्था बनवतो ते समाजाला सुरक्षित वाटावे म्हणून. संरक्षणासाठी सैन्यदले उभारतो ते अन्य शत्रूचा मुकाबला करून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी... आणि गम्मत म्हणजे. मृत्यूचे भय असलेला माणूस माणसासाठीच धर्म/देशासाठी मरणे कसे श्रेय:स्कर असते याचे तत्वज्ञान बनवतो. ठसवतो. कारण त्याला सुरक्षित रहायचे असते. समाजांतर्गत तरी तो कोठे पूर्ण सुरक्षित असतो?

त्यासाठीही त्याला वेगवेगळ्या रचना कराव्या लागतात. टोळीचे वंशसातत्य दूर पडत व्यक्तीगत वंशसातत्यासाठी त्याने विवाहसंस्था शोधलेली असते. ती टिकावी म्हणून तिलाही "दैवी" नियमांनी जखडून टाकली जाते.

मनुष्य निरंतर बंधने निर्माण करत जातो... पण तरीही नियमांत बद्ध होणे त्याला मंजूर नसते. तो व्यभिचार करतो, पण दुस-याचा व्यभिचार त्याला अक्षम्य वाटतो. त्याला स्वत:ला भ्रष्ट व्हायला निसर्गत:च आवडत असते. कारण कमी श्रमात सुखासीन होण्याचा त्याचा स्वभाव आहे. पण दुसरा भ्रष्ट असेल तर आपल्या व्यक्तिगत अधिकारांवर कोठे तरी आच येते म्हणून तो भ्रष्टाचाराला विरोधही करत असतो. माणूस हा असा आहे. अत्यंत विरोधाभासाने भरलेला. अत्यंत विरोधाभासात असल्याने भयभित असलेला. जेरेमी बेंथ्याम यांनी एक बाब फार छान सांगितली आहे.

"माणूस कायदे कसे बनवतो? जे अपराध खरे समाजाचे नैतिक चारित्र्य ढासळवू शकतात. त्या अपराधांना सर्वात कमी शिक्षा असते. उदा. भ्रष्टाचार. कारण तो सर्वांनाच हवा असतो. पण असे अपराध जे अपराधी पुन्हा पुन्हा करण्याची शक्यता नसते. त्याला मात्र, कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. उदा. खून. कारण बहुतेक खून हे भावनेच्या भरात व व्यक्तिगत सुडापोटी होत असतात. पण त्याला अधिक शिक्षा, कारण तसे आपल्याशी झालेले आपल्याला आवडनार नाही."

याचा मतितार्थ एवढाच की ज्यामुळे समाज अध:पतीत होतो अथवा होऊ शकतो त्याला आणि ज्यामुळे समाजाचे अध:पतन होण्याचे कारण नाही. अशा अपराधांत मनुष्य सोयिस्कर फरक करत असतो व तशी नीतिमुल्ये बनवत असतो.

माणसाचा मेंदू अविरत अशा सोयिस्कर गोष्टी शोधण्यामागे असतो. वंश, धर्म, वर्ण, जाती, पोटजाती या तशा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना माणूस जपतो. कारण त्याला इतरेजनांपासून श्रेष्ठत्व-गंडही जपायचा असतो. त्यासाठीही तो तत्वज्ञान बनवतो. जमेल तेवढा तो गंड इतरांवर लादायचा प्रयत्न करतो. उन्मादी होत त्या भावनेत तो हिंसक होतो, क्रुर होतो आणि विनाश घडवत स्वत:चाही विनाश करून घेतो.

जगाचा इतिहास अशा हिंसक/सांस्कृतिक संघर्षाने भरलेला आहे... कोण श्रेष्ठ याचा निकाल लागत नसतांनाही, लागू शकत नसतांनाही पुरातन पोथ्यांत आपले नसलेले अस्तित्व शोधत बसतो... आणि हे सारे निरंतर भयभित असलेला माणुसच करु शकतो हे विशेष!

माणूस हा भयभित प्राणी आहे. हे मान्य करत भयनाशाचे परंपरेने चालत आलेले मार्ग वगळता नवीन कोणते मार्ग शोधता येतील. यावर आता माणसाने चिंतन करण्याची गरज आहे. आजवरचे मार्ग विफल झाले आहेत हे तर उघड आहे. आधुनिक काळातील माणसाचा संघर्ष... आतला आणि बाहेरचा अधिक टोकदार आणि हिंस्त्र होत आहे.

नैसर्गिक भयांची जागा कृत्रीम भयांनीही व्यापलेली आहेत. ती भये निर्माण करत त्याचा फायदा उचलणाराही माणुसच आहे. अन्य धर्मांचे भय, वंशांचे भय, वर्णांचे भय, जातींचे भय... समाजव्यवस्थेचे भय, व्यक्तीसंबंधांचे भय...संस्कृतीचे भय....अवचित धुमकेतू अवतरण्याचे भय, साथींचे भय... कृत्रीम भयांची यादी एवढी आहे की, माणसाला भयातच जगायला आवडते की काय हा प्रश्न पडावा.

भयात रहायचेच आहे तर किमान कृत्रीम भये तरी आम्ही दूर करू शकू काय? की मानवी मन हेच भयनिर्मितीचा कारखाना आहे? यच्चयावत विश्वात आपण सध्या तरी एकटेच आहोत. प्रगत आहोत अशी आपली तरी समजूत आहे. पण आपल्या प्रगतीच्या व्याख्या समूळ चुकीच्या आहेत. विश्वात खरेच अन्य जीवसृष्टी सापडली तर तिच्याही भयाने आपण कसे बनू हे आज तरी सांगता येणार नाही... पण जे बनू ते काही आजपेक्षा चांगले बनू याची काय शाश्वती आहे?

Updated : 2 Nov 2020 11:12 AM IST
Next Story
Share it
Top