मराठी माणूस हिंदी चित्रपटात साइड हिरोच का असतो?
बोटावर मोजण्या इतपत मराठी अभिनेते हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतात. मराठी माणसांच्या मुंबईत पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री असताना मराठी अभिनेते बॉलिवूड मध्ये झळकू का शकले नाही? वाचा वैभव छाया यांचा सवाल?
मनोज वायपेयी, नवाझुद्दीन(अपवाद), पंकज त्रिपाठी, राजपाल यादव सारखे अनेक कलाकार सामान्य घरातून, अत्यंत गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटूंबातून पुढे येऊन आज भारतातील कोट्यावधी प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले आहेत.
उमेदवारीच्या दिवसात वॉचमन, गेटकिपर, वेटर, डोअरकिपर, क्लिनर पासून पडेल ती कामं केलीत. संजय मिश्रासारख्या कलाकाराने ढाब्यावर जेवण बनवायचं काम केलं. थोडंथोडकं नव्हे तर कैक वर्ष ते काम इमानाने केलं. काहीच नव्हतं या लोकांकडे. ना पैसा, ना बापाचे नाव, ना मोठमोठे स्टूडीओ किंवा बॉलीवूडने सेट केलेले सौंदर्याचे मापदंड पूर्ण होतील असा रंग, रुप, शरिर काहीच नव्हतं. तरी देखील त्यांनी चिकाटी सोडली नाही.
लोकप्रियतेपेक्षा कंटेटवर भर दिला. स्टारडमपेक्षा अभिनयावर लक्ष कायम ठेवलं. मिळेल त्या चित्रपटांत एक्स्ट्राची भूमिका करता करता आज हीच लोकं एक्स्ट्रॉर्डीनरी झाली आहेत. ग्रेट एक्टर ते स्टार पर्यंतचा प्रवास पूर्ण होताना आजही ते तसेच आहेत आधी जसे होते तसे.
युपी बिहारच्या मातीतून आलेली ही लोकं जर यशस्वी होऊ शकतात तर कुणीही होऊ शकतं. हा विश्वास या लोकांनी सर्वांना दिला. दक्षिणेतही हाच प्रकार पहायला मिळतो. पण मराठीत मात्र, असं होताना दिसत नाही. हिंदी चित्रपटात मिळालेल्या दहा सेकंदाच्या रोलसाठीही स्वतःची पाठ थोपटून घेताना, त्याचा हिमालयाएवढा गवगवा करण्यात मराठी लोकांचा हात कुणीच धरू शकणार नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे.
हिंदी सिनेमात घरकामगाराचा, गरिब, कफ्फल्लक व्यक्तीरेखा साकारण्याच्या भूमिका मराठी कलाकार बऱ्याचदा करताना दिसतात. पण त्याहून पुढे आपणही लीड मध्ये यावं यासाठी करावी लागणारी मेहनत मात्र, करताना अभावानेच आढळतात.
प्रश्न राहीला संधीचा... तर, नेटकं वाचन असेल, स्वभावाला नीट कृती कार्यक्रम असेल, ठळक राजकीय भूमिका असेल तर सिनेमाला सायंस म्हणून जोपासणाऱ्या दिग्दर्शकांच्या नजरेतून तुमचं सुटणं जवळपास अशक्यच आहे.
ओम पुरी, अमरीश पुरी, नसीरूद्दीन शहा असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक आणि त्यांना मिळालेले दिग्दर्शक यांची यादी तपासून पाहीली तरी लक्षात येईल मुद्दा. आणि हाच नियम मराठीतील काही तुरळक कलाकारांच्या बाबतीतही लागू आहेच. जसे सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि इतर लोक. पण बहुतांश मराठी कलाकार कमजोर कण्याचेच आहेत.
शेवटी लक सर्व काही नसते. तुम्ही कोणत्या ठिकाणी कधी उपस्थित आहात हा मुद्दाही १० टक्केच काम करतो. सरतेशेवटी तुमची मेहनत, चिकाटी आणि विनम्रता ९० टक्के भूमिका निभावते. विनम्र माणसाला यशासाठी झगडावे लागत नाही. विनम्रता असेल तर यश ओरडून सांगावेही लागत नाही. एरोगंस ही गरजेचा आहे. पण तो माज म्हणून नसावा. सामाजिक न्यायासाठी आग्रही असताना असावा. नाहीतर आपण आहोत तिथेच राहू.